नवी मुंबईची पार्कींग समस्या सोडविण्यासाठी नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांची गतीमान कार्यवाही

नवी मुंबई शहरातील पार्कींग समस्येची सोडवणूक करण्यासाठी नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नियोजनबध्द पावले उचलण्यास सुरुवात केली असून सातत्याने आढावा बैठका घेत वाहतूक पोलीस विभागाच्या सहयोगाने नवी मुंबई शहराचे पार्कींग धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही केली जात आहे.
या अनुषंगाने विशेष बैठक घेत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी 28 जून रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार विभागीय पातळीवर स्थानिक वाहतूक पोलीसांच्या समवेत करण्यात आलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास आलेल्या पार्कींगयोग्य जागांच्या तपशीलाचा सविस्तर आढावा घेतला. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, मालमत्ता विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर, वाहतूक पोलीस उपआयुक्त श्री. तिरुपती काकडे तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
28 जूनच्या बैठकीत आयुक्तांमार्फत विभाग अधिकारी यांनी त्या विभागातील वाहतूक पोलीस निरीक्षक यांच्या समवेत संयुक्त आढावा घेऊन नो पार्किंग झोन, सम - विषम पार्किंग, समांतर पार्किंग झोन निश्चित करण्याबाबत व ज्या ठिकाणी असे झोन निश्चित केलेले आहेत, त्या ठिकाणची सद्यस्थिती तपासण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पहाणी करुन सादर करण्यात आलेल्या पार्कींगयोग्य जागांवर या बैठकीत विचारविनीमय करण्यात आला.
यातील सध्या पार्किंग होत असलेल्या व सुचविलेल्या जागांबाबत भविष्यात पुढे कोणतीही अडचण येऊ नये या करीता एक पथक निर्माण करण्यात यावे आणि त्यांच्यामार्फत पार्किंगच्या दृष्टीने कोणते रस्ते अदयाप राहिले आहेत तसेच नो पार्कींग फलक आहेत मात्र तिथे पार्कींग होत आहे, रिक्शा स्टँड – टॅक्सी स्टँड असलेल्या पण सूचीत नसलेल्या जागा अशा विविध गोष्टींची अधिक बारकाईने तपासणी व्हावी असे निर्देश आयुक्त् श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले.
या पथकामध्ये त्या त्या विभाग क्षेत्रातील कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, विभाग अधिकारी तसेच वाहतुक पोलीस विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिका-यांचा समावेश असावा असे निश्चित करण्यात आले. या पथकाने काय तपासणी करावयाची याबाबत चेकलिस्ट तयार करून कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले. पथकाने आपला अहवाल 1 आठवड्यात 12 जुलैपर्यंत सादर करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले असून या नियोजित अहवालावरील चर्चात्मक बैठकीस प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिका-यांसही पाचारण करावे असे आयुक्तांनी सूचित केले.
जागा निश्चित करण्याप्रमाणेच या बैठकीत पार्कींगच्या जागांचे परिचलन करण्यासाठी कंत्राटदार पुढे यावेत यादृष्टीने पार्कींग जागांचा बेसरेट सिडकोप्रमाणे असण्याबाबत विचार करण्यात आला. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेने निश्चित केलेल्या दराप्रमाणेच कंत्राटदार पार्कींग चार्जेस घेईल, अतिरिक्त कोणतीही रक्कम घेणार नाही याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला. जागानिश्चिती व बेसरेट निश्चितीनंतर नव्याने कंत्राट काढण्यात येईल याविषयी विचारविनीमय झाला.
विभागीय पातळीवर पाहणीअंती सादर केलेल्या पार्कींगच्या जागांची उपयोगिता तपासणे व त्यामधून सुटलेल्या जागा सूचविणे असे दुहेरी काम नव्याने स्थापन केले जाणारे पथक करणार आहे. त्याचप्रमाणे जागा निश्चित करण्यासोबतच त्या जागेवर किती दुचाकी आणि किती चारचाकी वाहनांचे पार्कींग होऊ शकते याचाही तपशील सादर करणेविषयी आयुक्तांनी सूचित केले. या सर्व जागांची आखणी गुगल मॅपवर करण्याचे निर्देश देण्यात आले असून हे काम अत्यंत काळजीपूर्वक करण्याच्या सूचनाही संबंधित घटकांना देण्यात आल्या.
याशिवाय बृहन्मुंबई, पुणे व नाशिक महानगरपालिकेचे पार्कींग धोरण कार्यान्वित असून त्यांचाही अभ्यास करावा आणि पुढील बैठकीत त्याविषयी माहिती सादर करण्याचे आयुक्तांनी मालमत्ता विभागास निर्देशित केले. तसेच सिडकोकडून पार्कींगसाठी आलेल्या भूखंडांवरील पार्कींग सुविधेबाबत अभियांत्रिकी विभागाने नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेचे पार्कींग धोरण तयार करताना ते सर्वंकष असावे तसेच इतरांसाठीही मार्गदर्शक ठरावे अशाप्रकारे प्रत्येक बाबीचा बारकाईने सांगोपांग विचार व्हावा आणि नवी मुंबईकर नागरिकांना व नवी मुंबईला भेट देणा-या प्रवाशांना ते सुविधाजनक होईल हे आपले प्राधान्य असल्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
Published on : 04-07-2023 12:56:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update