पार्किंग धोरणाच्या अनुषंगाने गतीमान कार्यवाही करण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सुनियोजित पार्किंग व्यवस्थापनाकडे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष असून याबाबत सातत्याने आढावा बैठकांद्वारे पार्किंग पॉलिसी नियोजनाला गतिमानता दिली जात आहे.
याविषयी आज झालेल्या विशेष बैठकीत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी शहरातील पार्किंग विषयक नियोजन कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने वाहतूक पोलीस विभागासमवेत केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील वाहनांची संख्या आणि पार्किंगच्या जागा यांच्या उपलब्ध माहितीचा अभ्यास करून उपाययोजना सुचवून त्याची अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. पार्किंग नियोजनाविषयी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा दोन पातळ्यांवर काम करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. शॉर्ट टर्ममध्ये सध्या उपलब्ध सुविधांच्या अनुषंगाने सुनियोजित पार्किंग उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असून लाँग टर्ममध्ये भविष्याचा वेध घेऊन शहरासाठी पार्किंगच्या आवश्यक सोयी-सुविधांची उपलब्धता करून देण्याचे आयुक्तांचे नियोजन आहे.
या बैठकीस शहर अभियंता श्री संजय देसाई, उद्यान विभागाचे उपायुक्त श्री दीपक नेरकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगी पाटील, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, वाहतूक पोलीस सहा.आयुक्त श्री. सुनील बोंडे, कार्यकारी अभियंता श्रीम. शुभांगी दोडे, इस्टेट मॅनेजर श्री. अशोक अहिरे उपस्थित होते.
नवी मुंबई सारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नागरिकांचा आर्थिक स्तरही उंचावल्यामुळे वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. एकीकडे सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची भूमिका जपण्यासोबत उपलब्ध पार्किंग जागांचा विकास करण्याकडेही लक्ष दिले जात आहे.
याविषयी नवी मुंबई महानगरपालिका, वाहतूक पोलीस विभाग व प्रादेशिक परिवहन विभाग या तिन्ही विभागांच्या समन्वयाने नवी मुंबईतील पार्किंग धोरणाला आकार मिळावा ही भूमिका नजरेसमोर ठेवून आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने वारंवार आढावा बैठकांचे आयोजन करून गतिमान पावले उचलली जात आहेत.
पार्किंग पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी करताना स्थळनिहाय सर्वेक्षण करून तेथील आवश्यकता तपासण्याची गरज असल्याचे लक्षात घेत शहर नियोजनातील पार्किंगचे महत्व, आर्थिकदृष्ट्या लाभदायित्व तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे पार्किंग नियोजनाची उत्तम अंमलबजावणी अशा विविध बाबींचा सांगोपांग विचार या बैठकीत करण्यात आला.
शहरातील सध्याची पार्किंगची स्थिती लक्षात घेऊन अभियांत्रिकी व वाहतूक पोलीस विभागाने केलेल्या पाहणी अहवालाचा साकल्याने विचार करून उपाययोजना सूचवाव्यात असे सूचित करीत याबाबतची कार्यवाही तत्परतेने करावी असे महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांनी निर्देश दिले.
Published on : 18-07-2023 14:39:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update