’मेरी माटी मेरा देश’ अभियानाचे नवी मुंबईत भव्यतम आयोजन
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ हे राष्ट्रीय अभियान राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज 9 ऑगस्ट रोजी अभियानाच्या पहिल्या दिवशी नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या पर्यटनस्थळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या अंतर्गत देशासाठी हौतात्म्य पत्क्रलेल्या शहीद आणि वीरांचा नामोल्लेख असणारा शिलाफलक उभारण्यात आला असून त्यासमोर प्रज्वलीत दीप ठेवून वीरांना वंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे पंचप्रण शपथ, अमृत वाटिकेची वृक्षारोपणाव्दारे निर्मिती, शहीद वीरांच्या कुटूंबियांचा सन्मान, ध्वजारोहण व राष्ट्रगान असे विविध कार्यक्रम 1 हजाराहून अधिक नागरिक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी ऐंरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, विधानपरिषद सदस्य आमदार श्री. रमेश पाटील, नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, सह पोलीस आयुक्त श्री. संजय मोहिते, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक श्री. मनोज रानडे, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, माजी खासदार श्री. संजीव नाईक, माजी आमदार श्री. संदीप नाईक, माजी महापौर श्री. सागर नाईक तसेच लोकप्रतिनिधी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकपर मनोगतात नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी मा. पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणा-या ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाच्या माध्यमातून आपल्या मातृभूमीला नमन आणि वीरांना वंदन केले जात आहे. नवी मुंबईकर नागरिक नेहमीच कोणत्याही उपक्रमात सहभागी होण्यात आघाडीवर असतात. त्यानुसार आजही इतक्या मोठया संख्येने नागरिक व विशेषत्वाने विदयार्थी उपस्थित राहिल्याबद्दल आयुक्तांनी कौतुक केले. या कार्यक्रमानिमित्त शासनामार्फत प्राप्त सूचनेनुसार मातृभूमीच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या वीरांचा नामोल्लेख असणारा शिलाफलक उभारण्यात आला असून हा फलक पाहिल्यानंतर आपल्या मनात वीरांबद्दल असलेली आदराची व कृतज्ञतेची भावना जागृत होईल असे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ‘वसुधा वंदन’ या उपक्रमांतर्गत 75 देशी वृक्षरोपांची लागवड करुन अमृत वाटिका निर्माण केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबई हे देशाच्या विविध राज्यातील नागरिकांना एकात्म भावनेने बांधून ठेवणारे शहर असून ‘मिनी भारत’ म्हणून ओळखले जात असल्याचे सांगत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांनी शहीदांबद्दल आपल्या मनात असलेला आदर व मातृभूमीविषयीचे प्रेम व्यक्त् करण्यासाठी मा. पंतप्रधान महोदयांनी जाहीर केलेला ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम त्यागातून निर्माण झालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची सदैव प्रेरणा देत राहील अशी भावना व्यक्त केली.
बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी ‘मेरी माटी मेरा देश’ हा सर्वांना देशप्रेमाच्या भावनेतून जोडणारा उपक्रम असल्याचे सांगत देशाचे भविष्य असणारे विदयार्थी या कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी झाल्याबद्दल प्रशंसा केली. मा. पंतप्रधान महोदयांना अभिप्रेत असलेला विकसीत भारत घडविण्यासाठी हा उपक्रम महत्वाचे असल्याचे सांगत त्यांनी मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
*शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान – वीरांच्या शिलाफलकासमोर प्रज्वलीत दीप ठेवून अभिवादन*
याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते 1971 च्या भारत पाकिस्तान युध्दात शहीद झालेले इंडियन नेव्हीचे लिडींग सिमेन आर एस सिंग यांच्या पत्नी श्रीम. मिरादेवी, पेट्टी ऑफिसर एन एस कठैत यांच्या कन्या श्रीम. अनिता गांधी, इंडियन आर्मीतील दफादार भोपाल सिंग यांच्या पत्नी श्रीम. हरमिंदर कौर तसेच 2001 मध्ये जम्मू काश्मिर येथे संरक्षण कार्य करताना शहीद झालेले इंडियन आर्मीतील नायक लक्ष्मण बाबू शेळके यांचे पुत्र श्री. अर्जुन शेळके यांच्यासह 2006 मध्ये ऐरोली येथील बँक दरोडयात कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करताना वीरमरण प्राप्त झालेले पोलीस उप निरीक्षक बाबासाहेब ज्ञानदेव आढाव यांच्या पत्नी श्रीम. शुभांगी आढाव या शहीद वीरांच्या नातेवाईकांना सन्मानीत करण्यात आले. या शहीद वीरांच्या नावासह इंडियन नेव्हीतील पेट्टी ऑफिसर मॅकेनिकल इंजिनियर राम सिंग, चिफ पेट्टी ऑफिसर एस के वर्मा तसेच इंडियन आर्मीतील लेफ्टनंट कोलोनल मनोजकुमार पिल्लई या शहीद वीरांच्या नावाचा आदरपूर्वक उल्लेख असणारा शिलाफलक ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे उभारण्यात आलेला आहे. या शिलाफलकासमोर प्रज्वलीत दीप ठेवून मान्यवरांप्रमाणेच उपस्थित नागरिक व विदयार्थ्यांनी शहीद वीरांना अभिवादन केले. याप्रसंगी 19 जुलै 2023 रोजी मध्यरात्री इर्शाळवाडीत झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत मदत कार्यवाही करताना निधन झालेले नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलातील सहा. केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांच्या पत्नी श्रीम. कविता ढुमणे यांनाही सन्मानीत करण्यात आले.
*पंचप्रण शपथ सामुहिकरित्या ग्रहण*
शासन निर्देशानुसार सकाळी 10 वा. या कार्यक्रमामध्ये ‘भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणा-यांप्रती सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू’ - अशी शपथ महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या समवेत सर्वांनी मातीचे प्रज्वलीत दिवे हातात धरुन सामुहिकरित्या ग्रहण केली.
*ध्वजारोहण व राष्ट्रगानव्दारे वंदना*
हे मातीचे उजळते दिवे शहीद व वीरांचा नामोल्लेख असणा-या शिलाफलकासमोर ठेवून मान्यवरांसह सर्व उपस्थितांनी आदरांजली अर्पण केली. यानंतर आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न् झाले व राष्ट्रगानानंतर ‘भारतमाता की जय’ या नामघोषात संपूर्ण परिसर निनादून गेला.
*75 देशी वृक्षारोपणाव्दारे अमृत वाटिका निर्मिती*
याप्रसंगी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात ‘वसुधा वंदन’ या उपक्रमांतर्गत 75 देशी वृक्षरोपांची मान्यवर व उपस्थितांच्या शुभहस्ते लागवड करुन अमृत वाटिका निर्माण करण्यात आली. यावेळी ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमाची माहिती सर्वदूर प्रसारित होण्याकरिता तिरंगी रंगाचे फुगे मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले.
केंद्र सरकारच्या सूचनेनूसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्वेल ऑफ नवी मुंबई सारख्या लोकप्रिय पर्यंटनस्थळी भव्यतम स्वरूपात आयोजित केलेला ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाचा हा विशेष कार्यक्रम एक हजाराहून अधिक नागरिक व विदयार्थ्यांनी उपस्थित राहत यशस्वी केला.
*शासकीय पोर्टलवर सेल्फी अपलोड करून सहभागाचे आवाहन*
यावेळी अनेक जणांनी माती किंवा मातीचे दिवे हातात घेऊन सेल्फी व छायाचिेत्रे काढली आणि आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन प्रसिध्द केली. ही मातीचे दिवे अथवा माती हातात घेऊन किंवा वृक्षारोपण करताना किंवा राष्ट्रध्वज हातात घेऊन फडकवितानाचे सेल्फी किंवा छायाचित्रे काढून ती छायाचित्रे https:/merimaatimeradesh.gov.in या शासनाच्या पोर्टलवरही अपलोड करावयाची असून त्यानंतर या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल केंद्र सरकारमार्फत ऑनलाईन प्रमाणपत्रही वितरीत केले जात आहे. तरी 9 ते 14 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरिकाने मातृभूमीविषयीचे व शहीद वीरांविषयीचे आपले प्रेम व अभिमान आपले छायाचित्र अभियानाच्या वेबसाईटवर अपलोड करुन सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त् श्री. राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
Published on : 09-08-2023 11:58:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update