‘मेरी माटी मेरा देश‘ अभियानात 2.5 लाख नवी मुंबईकर विद्यार्थ्यांनी जागविला मातृभूमी व वीरांविषयीचा अभिमान
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 9 ते 14 ऑगस्ट या कालावधीत “माझी माती, माझा देश” अर्थात “मेरी माटी, मेरा देश” या अभियानांतर्गत काल 9 ऑगस्ट रोजी ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे भव्यतम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आज अभियानाच्या दुसऱ्या दिवशी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महापालिकेच्या व खाजगी 432 शाळांमध्ये एकाच वेळी “मेरी माटी, मेरा देश” अभियानांतर्गत 2 लाख 45 हजार 151 विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या 5 हजारहून अधिक शिक्षकांनी विविध उपक्रमांत सहभागी होत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार, नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत नमुंमपा कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व शाळा व्यवस्थापनांच्या बैठका घेऊन त्यांना अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या सूचना करण्यात आल्या होता.
त्यानुसार आज नमुंमपा व सर्व बोर्डाच्या 432 शाळांमध्ये 2 लाख 45 हजार 151 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत मातृभूमीविषयीचे प्रेम आणि मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांबद्दलचा अभिमान व्यक्त करीत सहभाग घेतला.
या अंतर्गत वसुधा वंदन, वीरांना वंदन तसेच पंच प्रण शपथ ग्रहण आणि ध्वजारोहण व राष्ट्रगान असे विविध कार्यक्रम शाळांशाळांमधून संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी माती हातात घेऊन, तिरंगा झेंडा हातात घेऊन व काही ठिकाणी वृक्षारोपण करून त्या क्षणाचे सेल्फी व फोटो काढून शासनाच्या https:/merimaatimeradesh.gov.in या वेबपोर्टलवर अपलोड केले. वेबपोर्टलवर फोटो अपलोड करून शपथ घेतल्यानंतर ऑनलाईन प्रमाणपत्र उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्रे प्राप्त करून घेतली.
इको सिटी, क्लीन सिटी, ट्वेन्टि फर्स्ट सेन्चुरी सिटी अशा विविध नावांनी नावाजले जाणारे नवी मुंबई शहर सुशिक्षितांचे शहर आणि ‘एज्युकेशनल हब’ म्हणून ओळखले जात असून अशा नवी मुंबई नामक ज्ञाननगरीतील 432 शाळांतील 2.5 लाखाहून अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी “मेरी माटी, मेरा देश” अभियानात एकाच वेळी घेतलेला सहभाग नवी मुंबईकरांचे मातृभूमीविषयाचे प्रेम आणि वीरांविषयीचा मनात असलेला अतीव अभिमान व्यक्त करणारे आहे.
Published on : 10-08-2023 16:30:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update