‘स्वच्छांजली’ कार्यक्रमांतून महात्मा गांधीजींना अभिवादन आणि स्वच्छताकर्मींविषयी कृतज्ञता – सुलेखनकार श्री.अच्युत पालव
रोज सकाळी न चुकता शहराच्या स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरून काम करणा-या स्वच्छतामित्रांबद्दल माझ्यासह सर्व नवी मुंबईकर नागरिकांच्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज ‘स्वच्छांजली’ कार्यक्रमाला आनंदाने उपस्थित राहिलो असल्याचे सांगत जगप्रसिध्द सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांनी स्वच्छताकर्मींच्या सन्मानाची संस्कृती नवी मुंबई महानगरपालिका जपत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘स्वच्छांजली’ या विशेष कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्वच्छ नवी मुंबई मिशनचे आयकॉन सुलेखनकार अच्युत पालव तसेच तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारप्राप्त आंतराष्ट्रीय जलतरणपटू श्री. शुभम वनमाळी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, भांडार विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील, कार्यकारी अभियंता सर्वश्री अरविंद शिंदे, विजय राऊत, सुनिल लाड, प्रवीण गाढे, शुभांगी दोडे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. विनायक जुईकर, उपअभियंता श्री. वसंत पडघन व श्री. संतोष मोरजकर आणि इतर अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
महात्मा गांधी जयंती तसेच लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त या दोन्ही महापुरूषांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत 15 सप्टेंबरपासून आजच्या महात्मा गांधी जयंतीपर्यंत आपण स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविलेले असून 1 लाख 83 हजारहून अधिक विद्यार्थी सहभागाने यशस्वी झालेली स्वच्छ चित्रकला स्पर्धा, 26 हजारहून अधिक नागरिकांनी घेतलेली स्वच्छतेची डिजीटल शपथ तसेच शहरात आठ विभागांमध्ये 1 लाख 14 हजारहून अधिक नागरिकांनी एकाचवेळी घेतलेली सामुहिक स्वच्छता शपथ व खारफुटी स्वच्छता मोहीम अशा 3 भव्यतम व आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांची विक्रमी नोंद बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे. हे नवी मुंबईकर नागरिकांच्या स्वच्छताविषयक जागरूकतेचे व एकजुटीचे यश असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी स्वच्छता हा नवी मुंबईचा ब्रँड होण्यामागे तसेच नवी मुंबईच्या आजवरच्या सातत्यपूर्ण नावलौकिकात स्वच्छताकर्मी, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्याप्रमाणेच स्वच्छतेविषयी जागरूक नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे अशा सर्वच घटकांच्या नेहमीच मिळणा-या अनमोल योगदानाबद्दल आभार मानले. स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण मिळून व्यापक लोकसहभागातून आणखी नाविन्यपूर्ण काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी ‘स्वच्छांजली’ कार्यक्रमातून आपण स्वच्छतेमध्ये आपण आणखी चांगले काम करण्याचा दृढनिश्चय करूया असे आवाहन करीत ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांत 3 बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड करण्याप्रमाणेच आपण मा.पंतप्रधान महोदय व मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या आवाहनानुसार कालच्या विशेष स्वच्छता मोहीमेतही सव्वा लाखाहून अधिक संख्येने सहभागी होत नवी मुंबईत स्वच्छतेची व्यापक लोकचळवळ उभी केली त्याबद्दल सर्व नागरिकांचे आभार मानले. नवी मुंबईतील विद्यार्थीही स्वच्छतेचे महत्व पटवून सांगतात हे शहराच्या स्वच्छ व सुंदर भविष्यासाठी महत्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
प्रत्येक कार्यक्रमात श्रमप्रतिष्ठा वाढविण्याच्या दृष्टीने स्वच्छतेप्रमाणेच इतर सेवा पुरविणा-या कामगारांचा सन्मान करण्याची नवी मुंबई महानगरपालिकेची परंपरा आहे. त्यानुसार यावेळी पाणीपुरवठा व मोरबे धरण प्रकल्प विषयक काम करणा-या 15 पुरूष व महिला कामगारांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानीत करण्यात आले. सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांनी कामगारांचा सन्मान करण्याच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रथेची प्रशंसा केली.
घणसोली विभागातील सफाई कर्मचारी श्री. धनंजय कांबळे यांनी सादर केलेल्या ‘मेरे देश की धरती’ या गीत गायनाने सुरेल प्रारंभ झालेल्या या ‘स्वच्छांजली’ कार्यक्रमात पुणे विद्यार्थी गृह विद्याभवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘कचरा नव्हे संपत्ती’ ही नाटिका तसेच नमुंमपा माध्यमिक शाळा 111 तुर्भे स्टोअरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘माटी पुकारे तुझे देश पुकारे’ हे समुहनृत्य उपस्थितांची दाद मिळवून गेले.
स्वच्छताकर्मींच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्याप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून स्वच्छता संदेश प्रसारासाठी लहान वयापासूनच करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल मान्यवरांनी प्रशंसा केली. स्वच्छता ही सेवा उपक्रमाची रांगोळीही लक्षवेधी होती.
Published on : 02-10-2023 11:13:35,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update