नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग
नवी मुंबई महानगरपालिकेस शालेय क्रीडा स्पर्धांसाठी जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाल्याने नवी मुंबईतील विद्यार्थी खेळाडूंना थेट विभाग स्तरावर व तेथून पुढे थेट राज्य स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध होत असल्याने स्पर्धेत सहभागी होणा-या विद्यार्थांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आढळून येते.
याच उत्साही वातावरणात यावर्षी ‘नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा’ जल्लोषात संपन्न होत असून मागील वर्षीपेक्षा मोठ्या संख्येने 35000 हून अधिक खेळाडू विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात सहभागी झालेले आहेत.
यामधील जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा या डॉ. सी.व्ही.सामंत विद्यालय व डी.आर.पाटील प्राथमिक विद्यालय, तुर्भे येथील मैदानात उत्तम आयोजनात संपन्न झाल्या.
या स्पर्धेत 14,17 व 19 वर्षाआतील गटांमध्ये मुलांच्या 134 व मुलींच्या 88 इतक्या मोठ्या प्रमाणात संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा शुभारंभ शिक्षण संस्थेचे सचिव श्री. कमलाकर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी स्पर्धेत सहभागी संघांना शुभेच्छा देत अशा शासकीय स्पर्धा आयोजनासाठी संस्था नेहमीच तयार असेल असे सांगितले. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले क्रीडागुण प्रदर्शित करण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे सांगत त्यांनी जास्तीत जास्त खेळाडू नवी मुंबईमधून तयार व्हावेत यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केले.
यावेळी क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव, संस्थेचे सदस्य श्री.चंद्रकांत पाटील व श्री.ललीत म्हात्रे, मुख्याध्यापक श्री.कोळी, पर्यवेक्षक श्री.धनगर, उप मुख्याध्यापिका श्रीम. कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धा आयोजनासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. दुबल व इतर सहका-यांनी मोलाचे योगदान दिले.
महानगरपालिका क्षेत्रातच जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत असल्याने शाळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून त्यामुळे विद्यार्थी संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून अनुभवी पंचाची व्यवस्था करुन देण्यात आल्याने अत्यंत निकोप वातावरणात या स्पर्धा संपन्न होत आहेत.
या स्पर्धेत 14 वर्षाआतील मुलांच्या गटात झालेल्या अंतिम कबड्डीच्या सामन्यात डॉ. सामंत विद्यालय संघाने 22 गुण संपादन करीत 16 गुण मिळविणा-या हायस्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज, सानपाडा संघावर 06 गुणांनी मात करीत अंतिम विजय मिळवला.
14 वर्षाआतील मुलींच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.31,कोपरखैरणे संघाने 19 गुण संपादन करीत 17 गुण मिळविणा-या रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणे संघावर 06 गुणांनी मात करीत अंतिम विजय मिळवला.
17 वर्षाआतील मुलांच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणे संघाने 35 गुण संपादन करीत 23 गुण मिळविणा-या डॉ. सी.व्ही. सामंत विद्यालय तुर्भे संघावर 12 गुणांनी मात करीत अंतिम विजय मिळवला.
17 वर्षाआतील मुलींच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणे संघाने 28 गुण संपादन करीत 25 गुण मिळविणा-या नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.104,रबाले संघावर 03 गुणांनी मात करीत अंतिम विजय मिळवला.
19 वर्षाआतील मुलांच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणे संघाने 23 गुण संपादन करीत 08 गुण मिळविणा-या डॉ. सी.व्ही. सामंत विद्यालय तुर्भे संघावर 15 गुणांनी मात करून अंतिम विजय मिळवला.
19 वर्षाआतील मुलींच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणे संघाने 26 गुण संपादन करीत व 05 गुण मिळविणा-या के.बी.पी.कॉलेज,वाशी संघावर 21 गुणांनी मात करीत अंतिम विजय मिळवला.
या स्पर्धेत विजयी झालेल्या संघानी मुंबई विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेतून विजयी होत पुढील स्पर्धेकरिता पात्र झालेल्या संघांचे अभिनंदन करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी पुढील उत्तम कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत.
Published on : 01-11-2023 11:01:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update