अनुभवी अधिकारी, कर्मचारी यांची सेवानिवृत्ती ही एक प्रकारे संस्थेची हानी – आयुक्त श्री. राजेश नार्वेकर
सेवानिवृत्ती ही प्रत्येक कर्मचा-याच्या जीवनातील अपरिहार्य बाब असते. मात्र अनुभवी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्या संस्थेच्या कामकाजात अशा कर्मचा-यांची कमतरता जाणवते. यामुळे अनुभवसंपन्न कर्मचारी सेवानिवृत्त होणे ही एकप्रकारे त्या संस्थेची हानी असून ही हानी भरुन निघायला काही कालावधी जातो असे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी चांगले कार्यक्षम अधिकारी आज सेवानिवृत्त् होत असून हा संमिश्र भावनांचा समारंभ असल्याचे मत व्यक्त केले. ऑक्टोबर महिन्यात सेवानिवृत्त होणा-या 8 अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती समारंभप्रसंगी आपल्या मनोगतात आयुक्तांनी सेवानिवृत्त होणा-या अधिकारी - कर्मचारी यांच्या कामाविषयीच्या आठवणी सांगत त्याच्या कार्यक्षमतेबद्दल गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी अतिरिक्त् आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त श्रीम. ललिता बाबर, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. दत्तात्रय घनवट, सहा.संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व श्री. शिरीष आरदवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
ऑक्टोबर महिन्यात सेवानिवृत्त होणारे नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी सहा.आयुक्त श्री. महेंद्र सप्रे, कार्यकारी अभियंता श्री. सुनिल लाड, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री अरविंद उरसळ, सुधाकर लोहार, रोहिदास जाधव तसेच मुख्याध्यापक श्री. व्यंकटेश कांबळे, प्राथमिक शिक्षक श्रीम. कामिनी आंग्रे व श्री. पद्माकर पाटील अशा 8 कर्मचा-यांचा आयुक्तांच्या शुभहस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र प्रदान करुन विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात सत्काराला उत्तर देताना सहा.आयुक्त श्री. महेंद्र सप्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका या आपल्या संस्थेप्रती निष्ठा बाळगून सोपविलेले काम प्रामाणिकपणे पार पाडले याचे सेवानिवृत्त होत असताना अतिशय समाधान वाटते असे सांगत नवी मुंबईच्या नावलौकिकात आपल्याही कामाचा खारीचा वाटा देता आला याचा आनंद आहे असे मत व्यक्त केले. प्रत्येक कर्मचा-याने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी व संस्थेच्या हिताला प्राधान्य देऊन काम करावे असेही आवाहन त्यांनी उपस्थित अधिकारी - कर्मचारीवृंदाला केले. आयुक्त महोदयांच्या मनोगतात सेवानिवृत्त होणा-या आम्हां कर्मचा-यांच्या कामाचे विश्लेषण ऐकून केलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान वाटले असेही श्री. महेंद्र सप्रे म्हणाले.
यावेळी अतिरिक्त् आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता श्री. संजय देसाई, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, विधी अधिकारी श्री. अभय जाधव, प्रशासकीय अधिकारी श्री. रवी जाधव यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त करीत सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांसोबतच्या कार्यालयीन कामकाजातील संस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद उरसळ व श्री. सुधाकर लोहार आणि मुख्याध्यापक श्री. व्यंकटेश कांबळे यांनीही सत्काराला उत्तर देताना आमच्या सेवानिवृत्तीप्रसंगी सभागृहात हाऊसफुल्ल उपस्थितीबद्दल सहकारी अधिकारी, कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.
Published on : 01-11-2023 11:24:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update