नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा
केंद्रीय दक्षता आयोगाच्या परिपत्रकानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र तसेच ॲन्टी करप्शन ब्युरो नवी मुंबई यांच्यामार्फत सूचित करण्यात आल्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेबर 2023 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक वर्षी थोर स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभ्भाई पटेल यांच्या जयंतीदिनानिमित्त दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करुन भष्टाचार निर्मुलनाविषयी जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येते. या वर्षीच्या सप्ताहाकरिता शासनाने ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा; राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा (Say no to Corruption; Commit to the Nation)’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली असून हे घोषवाक्य लिहिलेले बॅनर्स नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये तसेच विष्णुदास भावे नाटयगृहात दर्शनी जागी नागरिकांच्या सहज दृष्टीस पडतील अशा प्रकारे प्रदर्शित करण्यात आले आहेत.
याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांत ‘प्रामाणिकपणा व सचोटी यांच्या उच्चतम मानकाप्रती वचनबध्द असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरुध्द लढा देण्यासाठी साथ दिली पाहिजे’, अशा आशयाची प्रतिज्ञा सामुहिकरित्या घेण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे ही प्रतिज्ञा अधिकारी - कर्मचारी यांच्या मोठया संख्येने उपस्थितीमध्ये सामुहिकरित्या ग्रहण करण्यात आली.
याशिवाय महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांत दर्शनी भागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पत्ता तसेच संपर्क ध्वनी 022-27833344 / 8355901447 त्याचप्रमाणे इ मेल आयडी dyspacbnm@gmail.com आणि dyspacbnavimumbai@mahapolice.gov.in असलेला कायमस्वरुपी लावण्यात आलेला फलक अद्ययावत करण्याचे निर्देश विभाग अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.
आपल्या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा प्रमुख अडथळा असून भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सरकार, नागरिक आणि खाजगी क्षेत्र अशा सर्व घटकांनी संगठीतपणे काम करण्याच्या दृष्टीने या दक्षता जनजागृती सप्ताहाचे औचित्य साधून जनजागृती करीत सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत.
Published on : 01-11-2023 11:55:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update