केरळ राज्यतील मलाप्पुरम जिल्हा पंचायतीच्या अभ्यासगटाने केले नवी मुंबईतील स्वच्छता व सुशोभिकरणाचे कौतुक.
देशातील स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई शहर ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये तिस-या क्रमांकावर असून स्वच्छतेमधील मानांकन सातत्याने उंचविणारे शहर म्हणून ओळखले जाते. नवी मुंबईतील स्वच्छता व सुशोभिकरणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेने केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी देशातील विविध भागांतून अभ्यासक, जाणकार व्यक्ती, मान्यवर लोकप्रतिनिधी नवी मुंबईस भेट देत असतात.
या धर्तीवर केरळ राज्यातील मलाप्पुरम जिल्हा पंचायत अध्यक्ष एम. के. राफिखा आणि इतर पदाधिकारी व अधिका-यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास भेट देत येथील स्वच्छता, सुशोभिकरण व पर्यावरण विषयक विविध प्रकल्पांना भेट देत प्रशंसा केली.
या पाहणी दौ-यात त्यांनी आयकॉनिक इमारत असलेल्या नमुंमपा मुख्यालयास तसेच कोपरखैरणे येथील अत्याधुनिक सी-टेक तंत्रज्ञावर आधारित मलप्रक्रिया केंद्र व टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांट यांची पाहणी करीत सांडपाण्याची शुध्दीकरण प्रक्रिया जाणून घेतली.
त्याचप्रमाणे जमीन भरणा पध्दतीवर आधारित तुर्भे एमआयडीसी येथील शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व तेथील सी अँड डी वेस्ट प्रकल्प यांची पाहणी करत समाधान व्यक्त केले. सेक्टर 14 कोपरखैरणे येथील पूर्वीची क्षेपणभूमी शास्त्रोक्त पध्दतीने बंद करून त्या ठिकाणी निर्माण केलेल्या निसर्ग उद्यानाला भेट देत या अभ्यासगटाने महानगरपालिकेच्या दूरगामी विचारप्रणालीचे कौतुक केले. त्या ठिकाणी असलेल्या स्वच्छता पार्कलाही भेट देत त्यांनी या आगळ्यावेगळ्या संकल्पनेची विशेष नोंद घेतली.
या भेटीमध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेल्या केरळ राज्यातील मलाप्पुरम जिल्हा पंचायतीच्या अभ्यासगटाने नवी मुंबईतील रस्ते, चौक, उड्डाणपूल, भूयारी मार्ग अशा विविध ठिकाणी केलेल्या सुशोभिकरणाची प्रशंसा केली तसेच वंडर्स पार्क, ज्वेल ऑफ नवी मुंबई या नवी मुंबईतील आकर्षक स्थळांना भेट देत आनंद व्यक्त केला.
या भेटीमध्ये केरळीयन अभ्यासगटाने स्वच्छता ही नवी मुंबईची ओळख असून त्यामध्ये नागरिकांचेही सहकार्य मिळते. त्यामुळे नवी मुंबईचा आलोकिक टिकून राहील असे मत व्यक्त केले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी महानगरपालिकेमार्फत या अभ्यासगटाचे स्वागत केले. मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. विनायक जुईकर यांनी पाहुण्यांना विविध प्रकल्पस्थळी नेऊन तेथील माहिती दिली.
या अभ्यास गटामध्ये जिल्हा पंचायत मलाप्पुरमचे अध्यक्ष एम के रफिखा, सचिव तथा सहसंचालक बायजू, उपाध्यक्ष श्री. इस्माईल मुथेडेम, वेल्फेयर राज्य समिती प्रमुख श्री.करीन, पीडब्ल्यूडी राज्य समिती प्रमुख श्रीम. जामेदे, डेव्हलपमेंट राज्य समिती प्रमुख श्रीम. सरिना, राज्य स्वच्छता मिशनचे संचालक मोहम्मद जे.टी.एम. आणि राज्य स्वच्छता मिशनचे कार्यक्रम अधिकारी श्री.सदालिरा हे उपस्थित होते. नवी मुंबईचे विहंगम दर्शन हे स्वच्छतेचा ठसा मनावर उमटविणारे असल्याचे मत अभ्यासगटमार्फत व्यक्त करण्यात आले.
Published on : 04-12-2023 06:56:14,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update