बंधुत्वाच्या भावनेतून राष्ट्र उभे राहते ही बाबासाहेबांची भूमिका मांडत श्री. दिलीप मंडल यांनी व्याख्यानातून उभे केले राष्ट्रनिर्माते बाबासाहेब
दुस-यांच्या संवेदना जाणून घेणे, त्यात सहभागी व्हावेसे वाटणे यामधून परस्परांमध्ये बंधुभाव वाढतो, आपुलकीची भावना वृध्दिंगत होते व देश उभा राहतो ही राष्ट्र या शब्दामागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका विशद करीत सुप्रसिध्द लेखक, विचारवंत श्री. दिलीप मंडल यांनी बाबासाहेबांच्या आभाळाएवढया व्यक्तिमत्वाकडे आपण ठराविक नजरेतून एकाच दृष्टीने पाहून चालणार नाही तर त्यांच्या व्यक्तित्वाचा सर्वांगीण विचार केला पाहिजे असे मत व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेअंतर्गत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर और राष्ट्रनिर्माण’ या विषयावर सुप्रसिध्द पत्रकार, लेखक श्री. दिलीप मंडल यांनी अभ्यासपूर्ण भाष्य करीत बाबासाहेबांची राष्ट्रनिर्माता ही प्रतिमा विविध उदाहरणे देत उभी केली.
बाबासाहेबांना समजून घेताना त्यांचे काळानुरुप बदलत गेलेले विचार, त्या - त्या कालखंडातील सामाजिक स्थिती लक्षात घेऊन समजून घेतले पाहिजेत असे सांगत राष्ट्रनिर्माण ही बाबासाहेबांची विचारयात्रा आहे, त्या अनुषंगाने त्यांच्याकडे एक यात्रिक म्हणून पाहा असे श्री. दिलीप मंडल म्हणाले.
विशिष्ट समुहाच्या न्याय व हक्कांसाठी लढणारा नेता ते संपूर्ण देशाच्या हिताचा एकत्रित विचार करणारा राष्ट्रव्यापी नेता ही बाबासाहेबांची उंच उंच होत गेलेली प्रतिमा त्यांच्या काळानुरुप बदलत गेलेल्या विचारांचा समग्र अभ्यास करुन एकत्रितपणे समजून घेतली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
बाबासाहेबांना गुरुस्थानी असलेल्या महात्मा फुले यांनी सार्वजनिक सभा बनवायची तर सर्व नागरिकांना अधिकार मिळाले पाहिजेत ही सर्वसमावेशक राष्ट्राची व्याख्या पहिल्यांदा मांडली. तोच विचार पुढे नेत बाबासाहेबांनी सर्वांना मताचा अधिकार असला पाहिजे हे प्रथमत: सांगितले. समता, स्वातंत्र्य व बंधुता या त्रिसूत्रीला प्राधान्य देत बाबासाहेबांनी सांस्कृतिक राष्ट्रीयत्व महत्वाचे मानले व यातूनच भारताचा राष्ट्र म्हणून विचार होऊन संविधान साकारले हे श्री. दिलीप मंडल यांनी विविध उदाहरणे देत स्पष्ट केले.
लोकशाही विचारांचे सबलीकरण, समाजातील सर्व घटकांना न्यायाची भूमिका, कटुता निर्माण करणाऱ्या विचारांचा निषेध आणि एकात्मतेची भावना या चार मूल्यांना प्राधान्य देणारा बाबासाहेबांच्या जीवन प्रवासातील वैचारिक विकासाचा काळाच्या प्रत्येक टप्प्यागणिक अभ्यास केला पाहिजे. अशा पध्दतीने बाबासाहेबांकडे साकल्याने पाहिल्यानंतर एक राष्ट्रव्यापी नेतृत्व आपल्या नजरेसमोर उभे राहते असे श्री. दिलीप मंडल यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिकेने उभे केलेले बाबासाहेबांचे हे स्मारक त्यांच्या विचारांना समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची उपलब्धी असून येथील पुस्तकांनी सजलेले ग्रंथालय, दूर्मीळ छायाचित्रांमधून माहितीसह मांडलेले विशेष दालन, भाषणाचा होलोग्राफिक शो हे सर्व बघत स्मारकातून नुस्ता फेरफटका जरी मारला तरी बाबासाहेबांच्या प्रेरणादायी स्मृतींनी आपण भारुन जातो असा अभिप्राय देत श्री. दिलीप मंडल यांनी प्रत्येकाने स्मारकाला भेट देऊन त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले. ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका विविध क्षेत्रातील विद्वानांना आमंत्रित करुन आपल्या शहरातील नागरिकांना वैचारिकदृष्टया समृध्द करीत असल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने श्री. दिलीप मंडल यांचे स्वागत केले. स्मारकाचा आज दुसरा वर्धापनदिन असल्याचे सांगत मागील दोन वर्षात दोन लाखाहून अधिक नागरिकांनी स्मारकाला भेट देऊन प्रशंसा केली आहे व आपल्या संपर्कातील इतरांनाही या स्मारकाला भेट दयावी असे आवर्जून सांगितलेले आहे यातून स्मारकाची महती सर्वदूर पसरली असल्याचे ते म्हणाले. स्मारकाचा आत्मा असलेले येथील ग्रंथालय व सातत्याने सुरु असलेली व्याखानमाला यामधून हे स्मारक आता ‘ज्ञानस्मारक’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे याचा विशेष आनंद आयुक्तांनी व्यक्त केला. ‘लेट्स रिड फाऊन्डेशन’चे प्रमुख श्री.प्रफुल्ल वानखेडे यांच्या वतीने व्याख्यान आयोजनात महत्वपूर्ण सहकार्य करण्यात आले. सुप्रसिध्द लेखक, पत्रकार व विचारवंत श्री. दिलीप मंडल यांनी स्मारकाला प्रत्यक्ष भेट देत आपल्या व्याख्यानातून बाबासाहेबांच्या चरित्राकडे बघण्याची चौफेर दृष्टी विकसित केल्याबद्दल याप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात आभार मानले.
Published on : 06-12-2023 15:29:29,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update