मतदार जनजागृती करिता एनएमएमटीचा पुढाकार
20 मे रोजी होणाऱ्या 25 ठाणे लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत मतदार जनजागृतीपर नानाविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने अर्थात एनएमएमटीनेही व्यवस्थापक श्री.योगेश कडुसकर यांच्या नियंत्रणाखाली पुढाकार घेतला असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसेस मधील चालक, वाहक यांच्याप्रमाणेच एनएमएमटी अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी यांना 'माझे मत माझा अधिकार' आणि 'मी मतदान करणारच' असे संदेश दोन्ही बाजूने छपाई केलेल्या गांधी टोपी वितरित करण्यात आल्या आहेत. या टोप्यांचा वापर विशेषत्वाने चालक, वाहक व इतर सर्वांकडून केला जात असल्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तसेच महापालिका क्षेत्राबाहेर जाणाऱ्या बसेसमुळे महापालिका क्षेत्राबाहेरही मतदान करणेविषयी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. या लक्षवेधी उपक्रमाचे प्रवाशांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये मतदान जनजागृतीचे जिंगल प्रसारित करण्यात येत आहेत. या अनुषंगाने एनएमएमटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मतदान करण्याचे आवाहन गीतसंगीत स्वरूपात केले जात आहे.
याशिवाय परिवहन उपक्रमाच्या बसेस आणि बस शेल्टरवर मतदान विषयक जाहिराती प्रसिद्ध करण्यात येऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरता जनजागृती केली जात आहे.
यासोबतच परिवहन उपक्रमाच्या विविध नियंत्रण कक्षांवर व आगारांमध्ये सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. त्या सेल्फी पॉईंटवर 'माझं मत - माझं भविष्य', 'तुमचे मत - तुमचा अधिकार', 'वृद्ध असो किंवा जवान - सर्वजणांनी करा अवश्य मतदान', 'मतदार राजा ठेव कर्तव्याचे भान - सशक्त लोकशाहीसाठी कर मतदान' - अशा आशयाचे संदेश प्रसारित करून नागरिकांना मतदानाकरिता प्रोत्साहित करण्यात येत आहे.
20 मे रोजी होणाऱ्या 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार हक्काने बजावावा याकरिता विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने अर्थात एनएमटीनेही यामध्ये पुढाकार घेतलेला आहे.
Published on : 30-05-2024 07:18:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update