आजचे महत्वाचे (दि. 7/4/2020)
कोव्हीड - 19 आगामी उपाययोजनांबाबत आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांची विभागप्रमुखांशी चर्चा
कोव्हिड – 19 चे संक्रमण रोखण्यासाठी अधिक सतर्क राहून काम करण्याची गरज विषद करीत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी कोव्हीड - 19 बाधित व्यक्ती सापडल्यानंतर प्रत्येक विभागाने ॲक्शन प्लॅननुसार आपापल्या कामांची जबाबदारी नेटकेपणाने पार पाडावी असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता गरजू व्यक्तींच्या दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था वाढवावी लागली तरी त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचना आयुक्तांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिल्या.
कोव्हिड - 19 प्रतिबंधाच्या अनुषंगाने अधिका-यांचा टास्क फोर्स निर्माण केलेला असून त्यांच्या कामांचा आढावा घेत त्यामध्ये अधिक अचूकता व गतिमानता आणण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी निर्देश दिले व वाशी येथील महानगरपालिकेचे सार्वजनिक रूग्णालय पूर्णत: कोव्हीड-19 रूग्णांसाठीच वापरून सानापाडा येथील एम.जी.एम. रूग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये 200 बेड्स क्षमतेचा आयसोलेशन वॉर्ड निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देशित केले.
कोरोना पॉझिटिव्ह महिलेची व्यवस्थित प्रसूती करणा-या डॉक्टर व वैद्यकीय समुहाचे कौतुक
काल घणसोली येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गरोदर महिलेची सुव्यवस्थित प्रसूती करणा-या महानगरपालिकेच्या डॉक्टर व वैद्यकीय समुहाचे आयुक्तांनी विशेष अभिनंदन केले. सर्वसाधारण माणसाचे हृदय शरीरात डावीकडे असते, मात्र या महिलेचे उजव्या बाजूस असल्याने, अशी कठीण परिस्थिती हाताळत महानगरपालिकेच्या वैद्यकीय समुहाने सुरक्षेची सर्व काळजी घेत केलेल्या या सुलभ प्रसुतीबद्दल ते कौतुकास पात्र आहेत असे सांगत आयुक्तांनी या गरोदर महिलेला कोरोना पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला.
----------------------------------------------------------------------------
अन्नधान्य व किराणा मालाच्या साठ्याबाबत आयुक्तांनी घेतला आढावा
l कोव्हीड - 19 चा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरू असून या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सहजपणे उपलब्ध करून देण्याकडे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ विशेष लक्ष देत आहेत. या अनुषंगाने आयुक्तांनी आज किराणा मालाचे होलसेल व रिटेल दुकानदारांच्या संघटना प्रमुखांशी विस्तृत चर्चा करीत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व संबंधित प्राधिकरणांशी त्वरित चर्चा करून त्या सोडविण्याच्या दृष्टीने आश्वस्त केले.
l दुकानासाठी माल खरेदी करण्यासाठी जाताना संचारबंदीमुळे अडचणी निर्माण होत असल्याने महानगरपालिकेने त्याकरिता पास द्यावेत तसेच दुकानात काम करण्यासाठी येणा-या मोजक्या कामगारांनाही पास द्यावेत या दुकानदारांच्या मागणीबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दर्शविली.
l दुकाने सुरू राहण्यासाठी मर्यादित वेळ दिल्याने नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी किराणा मालाच्या दुकानांना सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत परवानगी असणेबाबतही आयुक्तांनी सहमती दर्शविली मात्र हे करताना सोशल डिस्टन्सींगचा कुठल्याही प्रकारे भेग होणार नाही याची काटेकोर काळजी घेणेबाबत व्यापा-यांनी निर्देशित केले.
l या पुढे जात नागरिकांना थेट घरपोच त्यांना हवा असलेला किराणा माल पोहचावा यादृष्टीने एक अभिनव ॲप सुरू होत असल्याचे सांगत या ॲपवर सर्व विभागातील दुकानदारांनी रजिस्टर व्हावे असेही आयुक्तांनी दुकानदारांना सूचित केले.
l रिलायन्स, डी मार्ट याठिकाणी सकाळी दूध घेण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी त्यांचे विशेष काऊंटर सुरू करावेत असे आयुक्तांनी निर्देशित केले.
l या बैठकीच्या अनुषंगीने व्यापा-यांची व नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने ए.पी.एम.सी., अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाशी एकत्रित चर्चा करून तातडीने मार्ग काढण्यात येईल असे आयुक्तांनी या बैठकीमध्ये सूचित केले.
----------------------------------------------------------------------------
महानगरपालिकेच्या कोव्हीड - 19 स्पेशल रूग्णालयात येणा-या नागरिकांसाठी निर्जंतुकीकरण मशीन
l नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रूग्णालयात कोव्हीड - 19 स्पेशल रूग्णालय सुरू करण्यात आलेले असून त्याठिकाणी येणा-या नागरिकांसाठी प्रवेशव्दाराजवळच निर्जंतुकीकरण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. आता रूग्णालयाच्या प्रवेशव्दारातून आत येणारा कोणतीही व्यक्ती निर्जंतुकीकरण करूनच आत प्रवेश करणार आहे.
|