‘माझी वसुंधरा अभियान’2022-23 मध्ये नवी मुंबई क वर्ग महानगरपालिकांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाची मानकरी

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या 'माझी वसुंधरा अभियान 3.0 सन 2022-23' यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका 'क' वर्ग महानगरपालिकांमध्ये राज्यात सर्वप्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. पुरस्काराची रु.7 कोटी रक्कम नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यातील मोठ्या शहरांच्या अ,ब, क वर्ग एकूण महानगरपालिकांमधून नवी मुंबईस द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, मुंबई येथील एनसीपीएमध्ये झालेल्या विशेष समारंभात विधानसभा अध्यक्ष ना.अॅड. राहुल नार्वेकर, महसूल मंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. श्री शंभूराज देसाई, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी हा मानाचा पुरस्कार स्विकारला.
याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे हे पुरस्कार स्विकारताना उपस्थित होते.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रीय सहभागाला समर्पित केला असून पर्यावरण विषयक विविध उपक्रमांमध्ये मनापासून सहभागी होणारे लोकप्रतिनिधी, विविध स्वयंसेवी संस्था व मंडळे यांचे सदस्य, पर्यावरणप्रेम जपणारे नागरिक तसेच अधिकारी आणि त्यातही विशेषत्वाने स्वच्छता, उद्यान व विविध विभागांतील कर्मचारी त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमे या सा-यांच्या एकत्रित कार्याचा हा सन्मान असल्याचे म्हटले आहे. या यशाबद्दल आयुक्तांनी समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन करीत मौलिक सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने पर्यावरणशील शहर निर्मितीकरिता प्रभावी घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना, हरित क्षेत्रामध्ये वाढ तसेच प्लास्टिक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर अशी पर्यावरणपूरक उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून अनेक नाविन्यपूर्ण उपाययोजना राबविल्या आहेत. तसेच वृक्षारोपणाप्रमाणेच वृक्षसंवर्धनाकडेही विशेष लक्ष देत मागील 2 वर्षात दोन लाखांहून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे.
शहरी भागांमध्ये वृक्ष तसेच हिरवळ संवर्धनासाठी जाणवणारी जागेची कमतरता लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने कमी जागेत दाट जंगल निर्माण करणा-या मियावाकी पध्दतीच्या शहरी जंगल निर्मितीला प्राधान्य दिले. यामध्ये जैवविविधता वाढविण्यासाठी पशूपक्ष्यांचा अधिवास वाढविणा-या देशी प्रजातींच्या वृक्ष लागवडीवर व त्यांच्या संवर्धनावर भर देण्यात आला.
यामध्ये सेक्टर 14, कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानामध्ये मियावाकी पध्दतीने 62 हजार झाडे लावण्यात आली त्याचप्रमाणे सेक्टर 28 नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथेही मियावाकी पध्दतीने 1 लक्ष 23 हजार देशी प्रजातीच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आलेला ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा मियावाकी पध्दतीचा शहरी जंगल प्रकल्प आहे. यामुळे शहराच्या हरित क्षेत्रात लक्षणीय वाढ झालेली आहे.
नवी मुंबई शहराच्या 109.59 चौ.कि.मी क्षेत्रफळात 39 टक्के हरित क्षेत्र निर्माण झाले असून 225 बागा, उद्याने, पार्क, हरित क्षेत्रे यामुळे नवी मुंबई उद्यानांचे शहर म्हणून नावाजले जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र निर्मितीमुळे नागरिकांना आरोग्यदायी आणि नजरेला सुखावणारे हिरवाईचे वातावरण उपलब्ध झाले आहे.
शहरातील वायु प्रदुषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवितानाच नवी मुंबई महानगरपालिेने सुरु केलेली युलू ई- बाईक्स ही संकल्पना वायु प्रदुषण कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरली आहे. यापूर्वीची युलू सायकल ही संकल्पना देखील लोकप्रिय ठरली होती. युलू ई बाईकव्दारे 5 महिन्यात 40090 ग्रॅम कार्बन उत्सर्जनाची बचत झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 35 कोटी ग्रॅम्सपेक्षा अधिक कार्बन फूटप्रिटंची बचत झालेली असून सार्वजनिक सायकल सेवेचा मोठ्या प्रमाणावर वापर करणारे नवी मुंबई हे देशातील अग्रगण्य शहर आहे. शहरात 15 किमी सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ही युलू ई बाईक तरूणांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली असून वाहतुकीच्या पर्यावरणशील पर्यायांचा उपयोग केला पाहिजे हा विचार भावी पिढीच्या मनात रुजविण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरलेली आहे.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने फेम 2 अंतर्गत 20 ठिकाणी इलेक्ट्रिकल चार्जींग स्टेशन्स व त्यामध्ये 120 चार्जींग पॉईंट्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची प्रवासी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एनएमएमटी बस सेवेनेही पर्यावरणशील भूमिका जपत इलेक्ट्रीक मोबॅलिटीमध्ये पुढाकार घेतला आहे. सद्यस्थितीत 180 इलेक्ट्रिकल बसेसव्दारे विश्वासार्ह प्रवासी सेवा पुरविली जात असून मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना कार्बन उत्सर्जन कमी करणारी पर्यावरणशील प्रवासी सेवा पुरविली जात आहे.
सायकलसारख्या इंधन विरहित पर्यावरणशील वाहनाचा वापर करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहिन करण्याच्या दृष्टीने नागरिकांकरिता सायक्लोथॉन 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी शेकडो सायकल स्वारांनी आठवड्यातून किमान एकदा तरी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची शपथ घेतली व सायकलसारख्या वाहनाचा वापर करून प्रदूषण कमी करणे व स्वत: चे आरोग्य जपणे या दोन्ही गोष्टींना दुजोरा दिला.
अशाच प्रकारे स्थानिक पातळीवर विभागाविभागांमध्ये स्वयंसेवी संस्थांमार्फत कचरा वर्गीकरण, एकल प्लास्टिकच्या वापराला प्रतिबंध असे विविध प्रकारचे जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून वृक्षारोपण, स्वच्छता विषयक मोहिमाही मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. या व अशा अनेक उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनासाठी सामुहिक जबाबदारीची भावना वाढीस लागली आहे.
विविध प्रकारच्या कच-यांमध्ये माशांच्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने फिशफेड हा अत्यंत वेगळा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास दिवाळे येथील मार्केटपासून सुरुवात केली असून त्याची विशेष नोंद केंद्र व राज्य स्तरावर घेण्यात आलेली आहे. दररोज 1 टन मासळी बाजारातील कच-यावर याठिकाणा प्रक्रिया केली जाते आणि याव्दारे स्वयंसहाय्यता गटांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झालेल्या आहेत.
ऐरोली व कोपरखैरणे येथील अत्याधुनिक मलप्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रियाकृत 40 द.ल.लि. पाण्यावर टर्शिअरी ट्रिटमेट करून त्यामधील 6 द.ल.लि. टर्शिअरी प्रक्रियाकृत पाणी एमआयडीसी क्षेत्रातील 14 उद्योगांना पुरविण्यास सुरुवात झालेली आहे व इतर उद्योग समुहांशी चर्चा सुरु आहे. तशा प्रकारचा करार एमआयडीसी सोबत झालेला आहे.
प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये याकरिता नागरिकांमध्ये विविध माध्यमांतून जनजागृती केली जात असून प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमाही प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जात आहे.
'थ्री आर' अर्थात कच-याचा पुनर्वापर (Reuse), कचरा निर्मितीत घट (Reduce) व कच-यावर पुनर्प्रक्रिया (Recycle) या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात असून शहरात नको असेल ते द्या आणि हवे असेल ते घ्या या संकल्पनेवर आधारित माणुसकीचे देणे – घेणे अशी 92 थ्री आर सेंटर्स शहरात ठिकठिकाणी उभारली गेली आहेत. त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एलईडी आणि सौर दिवे बसवून विजेचा वापर कमी केला जात आहे तसेच सरकारी इमारतींच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात येत आहेत तसेच ऊर्जा ऑटिड करण्यात येत आहे.
पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये सजगता यावी व माझी वसुंधऱा अभियानांतर्गत आयोजित उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रीय सहभाग रहावा यादृष्टीने पथनाट्यासारख्या प्रभावी माध्यमाचा वापर केला जात असून त्यासोबतच स्वच्छता मोहीमा, प्लास्टिक प्रतिबंध मोहीमा, विविध स्पर्धांचे आयोजन, माझी वसुंधरा सामुहिक शपथ ग्रहण, चित्रभिंती व शिल्पाकृतींव्दारे शहर सौदर्यीकरणावर भर असे विविध माहिती, शिक्षण व संवाद उपक्रम राबविले जात आहेत.
‘माझी वसुंधरा अभियानात’ नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यातील क वर्ग महानगरपालिकांमध्ये राज्यात लाभलेला प्रथम क्रमांकाच्या शहराचा बहुमान हा पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांच्या सातत्यपूर्ण कामाचा परिणाम असून हा पुरस्कार नागरिकांनाच समर्पित असल्याची भावना व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई ही स्वच्छतेप्रमाणेच निसर्गातील भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या पंचतत्वांच्या संवर्धनासाठी जागरूकतेने काम करीत असल्याचे म्हटले आहे.
Published on : 05-06-2023 15:11:11,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update