नमुंमपा 6 सेवानिवृत्त कर्मचा-यांचा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केला सन्मान
कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना संस्थेच्या कामाशी संबंधित अनुभवी व्यक्ती निवृत्त होत असल्याने त्या संस्थेची काही प्रमाणात हानी होते. तथापि विहित वयोमानानुसार सेवानिवृत्ती अनिवार्य असल्याने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या सुरु होणा-या आयुष्याच्या दुस-या इनिंगसाठी शुभेच्छा देणारा व त्यांच्या आजवरच्या कामाचा यथोचित गौरव करणारा निरोप समारंभ हा त्या कर्मचा-याच्या आयुष्यातील अत्यंत समाधानाचा क्षण असल्याचे व त्याबरोबरच संस्थेशी त्याचा असलेला रोजचा संपर्क उद्यापासून नसणार त्यामुळे हळवा करणाराही क्षण असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी मार्च महिन्यात सेवानिवृत्त होणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या 6 अधिकारी, कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
31 मार्च रोची मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी सेवानिवृत्त होणारे 6 महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी लेखा अधिकारी श्री. रमेश सोनारे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते अग्निशमन केंद्र अधिकारी श्री. गणेश पाटील, प्राथमिक शिक्षिका श्रीम. वर्षा नरेश पाटील, स्टाफ नर्स / मिडवाईफ श्रीम. उषा पुष्पसेन सुर्यवंशी (शिंदे), माहिती नोंदणीकार लिपिक श्रीम. सरला सतीश देशमुख (भावसार), आरोग्य सहाय्यक श्रीम. गीता चंद्रकांत तांबडे यांना आयुक्त महोदयांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
लेखाधिकारी श्री. रमेश सोनारे यांनी आपल्या महानगरपालिकेतील 28 वर्षांच्या कार्यकालावधीत लेखा विषयक कामांमध्ये अत्यंत जबाबदारीने व सर्वांशी उत्तम संबंध ठेवून चांगली कामगिरी केली असल्याचे आयुक्तांनी विशेषत्वाने नमूद केले.
2007 मध्ये सावला कोल्ड स्टोरेज, सानपाडा याठिकाणी लागलेल्या आगीत श्री. गणेश पाटील यांनी साहसी कामगिरी केल्याबद्दल त्यांना 26 जानेवारी 2008 रोजी प्रजासत्ताक दिनी गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले होते. असे अनुभव संपन्न अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची कार्यालयीन हानी होत असल्याचेही आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी मत नोंदविले.
याशिवाय शिक्षण, आरोग्य, कार्यालयीन कामकाज यामध्येही चांगली कामगिरी करणा-या कर्मचा-यांच्या सेवेचाही गौरव आयुक्तांनी केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर, शहर अभियंता श्री. संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, डॉ. श्रीराम पवार, श्री. अनंत जाधव, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड तसेच इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on : 03-04-2023 10:28:09,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update