05 मार्चला सायक्लोथॉनव्दारे नवी मुंबईकर नागरिक माझी वसुंधरा अभियानासाठी सज्ज
माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यातील पर्यावरणशील शहराचा प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून यावर्षी माझी वसुंधरा अभियान 3.0 ला सामोरे जाताना हा प्रथम क्रमांक कायम राखण्याचा निश्चय महानगरपालिकेने केलेला आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामांना गती देण्यात आलेली असून लोकसहभागातून पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
सायकल हे प्रदूषणविरहित वाहन आरोग्य रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने लाभदायक आहे. शिवाय यामुळे पर्यावरणाचीही जपणूक होते. त्यामुळे सायकलच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रसारित करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आणि सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सायक्लोथॉन 2023 या अभिनव उपक्रमाचे रविवार दि.05 मार्च 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई शहराचा क्विन्स नेक्लेस म्हणून ओळखल्या जाणा-या पामबीच मार्गावर सकाळी 7 वाजल्यापासून सायक्लोथॉन 2023 संपन्न होणार असून मोराज सर्कल सानपाडा ते नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय सीबीडी बेलापूर या दरम्यानचे 8 कि.मी. अंतर स्पर्धकांना सायकलींग करावयाची आहे.
स्पर्धा सहभागासाठी https:/docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeuw4OkJ7v2UIhhQIxOeUUOOxCh66O3rkWZER9PWugkkEEqWA/viewform या लिंकवर स्पर्धकांनी आपल्या नावाची पूर्वनोंदणी करावयाची असून स्वत:ची सायकल आणावयाची आहे. या उपक्रमात सहभागी होणा-या पर्यावरणप्रेमी सायकलपटूंना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये वय वर्षे 12 ते 25 असा पहिला गट तसेच वय वर्षे 25 पुढील दुसरा गट असणार आहे.
आपले नवी मुंबई शहर पर्यावरणशील म्हणून सतत नावाजले जावे हे आपले ध्येय असून सायक्लोथॉन सारख्या पर्यावरणशील उपक्रमात सहभागी होऊन संवर्धन पर्यावरणाचे – संवर्धन वसुंधरेचे हे आपले उपक्रमाचे घोषवाक्य सार्थ ठरविण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तथा माझी वसुंधरा अभियान 3.0 च्या नमुंमपा नोडल अधिकारी श्रीम. सुजाता ढोले यानी केले आहे.
Published on : 03-03-2023 13:00:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update