24 महिला कर्करोग निदान तपासणी शिबिराचा 1846 महिलांनी घेतला लाभ
अलिकडे कर्करोग झपाटयाने वाढत असून त्याबाबत काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियमित वाढीमुळे उद्भवणारा रोग असून तो कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन कॅन्सर सोसायटी, मुंबई या सामाजिक संस्थेमार्फत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांकरीता महापौर श्री. जयवंत सुतार व आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांचे मार्गदर्शनानुसार प्रभागनिहाय कर्करोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकूण 111 ठिकाणी प्रभागनिहाय तसेच नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे नगरसेविका व अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता 02 अशाप्रकारे एकूण 113 महिला विशेष कर्करोग निदान शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार दि. 16 जानेवारी 2020 पासून शिबीरांचा शिरवणे प्रभागातून शुभारंभ करण्यात आलेला आहे. तेव्हापासून 1 फेब्रुवारी, 2020 पर्यत एकूण 24 शिबीरांचे आयोजन विविध प्रभागांत करण्यात आले असून त्यामध्ये 1846 महिलांनी तपासणी करुन घेतलेली आहे.
सर्वसाधारणपणे कुटुंबातील इतरांच्या आरोग्याची काळजी घेताना स्वत:च्या आरोग्याप्रती महिला तितक्याशा प्रमाणात जागरूक नसतात असे निदर्शनास येते. त्यामुळे 31 मार्चपर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात विविध प्रभागांत आयोजित करण्यात येणाऱ्या या महिलांसाठी विशेष कर्करोग निदान शिबीरांचा लाभ महिलांनी करून घ्यावा आणि आपल्या स्वआरोग्याप्रती दक्ष रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 01-02-2020 14:29:57,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update