720 पथकांव्दारे 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहीमेत घरोघरी आरोग्य सर्वेक्षण
कोव्हीडमुक्त महाराष्ट्राचे ध्येय नजरेसमोर ठेवून मुख्यमंत्री ना.श्री. उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' ही राज्यव्यापी मोहीम 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर असा पहिला टप्पा आणि 14 ते 24 ऑक्टोबर असा दुसरा टप्पा अशी दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने ही मोहीम महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यात येत असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 720 हून अधिक पथकांच्या माध्यमातून 5 लाखाहून अधिक घरांना भेटी देऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रत्येक पथक दररोज 50 घरांना भेट देऊन माहिती संकलीत करेल अशा प्रकारे पथके तयार करण्यात आलेली आहे.
या एका पथकामध्ये दोन ते तीन कर्मचारी / स्वयंसेवक असणार असून त्यांस 'करोना दूत' असे संबोधले जाईल. या पथकाव्दारे घरोघरी भेटी देऊन घरातील प्रत्येकाचे शारीरिक तापमान व ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजले जाणार आहे. त्याचप्रमाणे, घरातील एखाद्या व्यक्तीला ताप , खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास अशाप्रकारचा त्रास होत आहे काय याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच कोणास मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा अशा सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) आहेत काय याचीही माहिती संकलित केली जाणार आहे. ही सर्व माहिती ॲपमध्ये दाखल केली जाणार असून सर्वेक्षण झाल्यानंतर घराला एक स्टिकर लावण्यात येणार आहे.
गृहभेटी दरम्यान कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेताना शासन निर्देशानुसार सामान्य व्यक्ती (कोव्हीड पूर्व व्यक्ती), कोव्हीड पॉझिटिव्ह व्यक्ती आणि कोव्हीड होऊन गेलेली व्यक्ती अशा तीन प्रकारांमध्ये माहिती संकलित केली जाणार आहे व त्यांच्या प्रकारानुसार त्यांस आरोग्य संदेश दिले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने नियमित मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, आजार न लपवता आवश्यकतेनुसार फिव्हर क्लिनिकला भेट देणे, सहव्याधी (कोमॉर्बिडिटी) असल्यास नियमित औषधोपचार घेणे, प्लाझमा डोनेशनबाबत माहिती देणे अशी विविध माहिती प्रसारीत केली जाणार आहे.
या सर्वेक्षणात एखाद्या व्यक्तीस ताप असून त्याचे तापमान 100.4 डिग्री फॅरेनहाईट तसेच ऑक्सिजन सॅच्युरेशन 95 टक्के पेक्षा कमी असल्यास तसेच एखाद्या सहव्याधी (कोमॉर्बिड) असणा-या व्यक्तीसही ताप असल्यास नजिकच्या फिव्हर क्लिनीकला पाठविले जाणार आहे. त्याचप्रमाणे, एस.ए.आर.आय. / आय.एल.आय. ची लक्षणे असल्यास त्यांनादेखील फिव्हर क्लिनीकला संदर्भित करण्यात येईल. ताप आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी व सहव्याधी (कोमॉर्बिडिटी) या तीनपैकी दोन लक्षणे असल्यास अशा व्यक्तींना अतिजोखमीचे (हाय रिस्क) समजून त्यांची कोव्हीड चाचणी करून त्यांस आवश्यकतेनुसार संबंधित वैदयकीय अधिकारी यांच्यामार्फत नजिकच्या कोव्हीड केअर सेंटर ला संदर्भित करण्यात येईल.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणा-या मोहीमेत 720 पथके 5,38,032 घरांचे सर्वेक्षण करणार असून गृहभेटींव्दारे संशयीत कोव्हीड तपासणी व उपचार, सहव्याधी (कोमॉर्बिड) व अतिजोखमीची व्यक्ती ओळखून त्यांना उपचार आणि प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, एस.ए.आर.आय. / आय.एल.आय. रुग्णांचे सर्वेक्षण व उपचार तसेच प्रत्येक नागरिकाचे कोव्हीड-19 बाबत आरोग्य शिक्षण अशी मोहिमेची उद्दिष्टये साध्य करणार आहेत.
सर्वेक्षणांतर्गात 14 ते 23 ऑक्टोबरच्या दुस-या टप्प्यात पथक पुन्हा घरांना भेटी देऊन दुस-यांदा सर्वांचे शारीरिक तापमान आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजणी करेल व नोंदी घेईल तसेच आरोग्य स्थिती लक्षात घेऊन योग्य कार्यवाही करेल. या सर्वेक्षणातून संकलीत होणा-या माहितीच्या आधारे पुढे महानगरपालिका क्षेत्रातील सहव्याधी (कोमॉर्बिड) असणा-या वा इतर नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास वेळेत व योग्य उपचार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासही मदत होणार आहे.
तरी सर्व सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी आपले नवी मुंबई शहर कोव्हीड मुक्त करण्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या भूमिकेतून स्वयंशिस्त पाळून आपल्या कुटुंबापर्यंत कोव्हीडचा विषाणू पोहचणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी तसेच आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकातील आरोग्य दूतांना सत्य माहिती देऊन संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 15-09-2020 13:19:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update