ऐरोली रूग्णालयात 1 जानेवारीपासून आयसीयू, मेडिकल व सर्जिकल वॉर्ड सुरू करण्याचे नियोजन
नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी रुग्णालय नॉन कोव्हीड उपचारांसाठी परावर्तीत करण्यात आले असून ऐरोली व नेरुळ येथील रुग्णालयांचा सध्या माता बाल रुग्णालय म्हणूनच वापर होत आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये सार्वजनिक रुग्णालय सुरु करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने या रुग्णालयांचे सक्षमीकरण करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ऐरोली सेक्टर 3 येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची बारकाईने पाहणी केली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व उपआयुक्त श्री. अमरिश पटनिगिरे आणि रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड यांचे समवेत आयुक्तांनी तेथे सुरु असलेल्या रुग्णालयीन सेवांची व इतर सेवांसाठी राखीव ठेवलेल्या उपलब्ध जागांची बारकाईने पाहणी केली.
सन 2015 मधील उद्घाटनापासून या रुग्णालयात केवळ विविध आरोग्य सेवांच्या बाह्यरुग्ण सेवा (OPD) उपलब्ध आहेत मात्र प्रसुती व बालरुग्ण सेवा वगळता इतर आंतररुग्ण सेवा (IPD) उपलब्ध नाहीत याबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ही रूग्णालये पूर्ण क्षमतेने वापरात आणण्यासाठी याठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असून काही प्रमाणात डॉक्टरही उपलब्ध आहेत. त्यामुळे पॅनलवर डॉक्टर घेऊन तसेच नर्सेस व इतर आवश्यक मनुष्यबळाचे सुयोग्य नियोजन करून सर्जिकल, मेडिसीन व आयसीयू वॉर्ड्स 1 जानेवारीपर्यंत सुरु करण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी वैद्यकीय अधिक्षक यांना दिले. त्याबाबतचा कृती आराखडा तयार करून त्यावर तत्परतेने चर्चा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
रूग्णालयात उपचारासाठी येणा-या काही रूग्णांना आरोग्यविषयक विविध तपासण्या करण्याची गरज भासते. सद्यस्थितीत या चाचण्या आऊटसोर्सींगव्दारे करण्यात येतात. त्यातील काही चाचण्या करण्यासाठी रूग्णांना खर्च करावा लागतो. महानगरपालिका रूग्णालयात येणारा रूग्ण हा आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य गटातील असल्याने कराव्या लागणा-या चाचण्यांपैकी जास्तीत जास्त प्रमाणाच कराव्या लागणा-या चाचण्या रूग्णालयातील लॅबमध्येच करण्याबाबतचे नियोजन करावे असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
तसेच रूग्णालयात नवजात बाळांसाठी अतिदक्षता कक्ष (एन.आय.सी.यू.) सुरु आहे. सध्या त्याची 5 बेड्स सुविधा जाहीर करण्यात आली आहे. तथापि त्याची क्षमता 12 बेड्सची असून ती जाहीर करणे व पूर्ण क्षमतेने वापरणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी सूचित केले.
त्याचप्रमाणे ऐरोली रुग्णालयात नेत्र तज्ज्ञ कार्यरत असून ओपीडी प्रमाणेच त्याठिकाणी आयपीडी देखील सुरु करून लहान वयातच केली जाणारी स्क्वींट (Squints) सर्जरी तसेच मोतिबिंदू सारख्या सर्जरी करण्याचे नियोजन करण्यात यावे असे आयुक्तांनी निर्देशित केले.
रूग्णालयामध्ये 1 नोव्हेंबर पासून बाह्ययंत्रणेव्दारे डायलेसीस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र त्याची माहिती पुरेशा प्रमाणात नागरिकांना नसल्याने त्याठिकाणी लाभार्थ्यांची संख्या कमी असल्याची नोंद घेत त्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले.
तशाच प्रकारे ऐरोली रुग्णालयाच्या तळमजल्यावर कार्यानिवत असलेल्या 'पोस्ट कोव्हीड क्लिनीक'ची माहितीही नागरिकांना होण्यासाठी दर्शनी भागात फलकाव्दारे प्रदर्शित करावी असेही वैद्यकीय अधिक्षक यांना सूचित करण्यात आले. या पाहणी दौ-यात रुग्णालयातील स्वच्छतेबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
नवी मुंबईकर नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने महानगरपालिकेचे स्वत:चे मेडिकल कॉलेज सुरु करून त्यामधून महानगरपालिकेस उत्तम डॉक्टर उपलब्ध होण्यासाठी नियोजन केले जात आहे. त्याकरिता शासकीय निकषामध्ये आवश्यक असलेली बेड्स उपलब्धता लक्षात घेऊन ऐरोली व नेरूळ ही दोन्ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरु करण्याच्या दृष्टीने ही पाहणी कऱण्यात आली.
महानगरपालिकेकडे ऐरोली व नेरूळ येथे मोठ्या क्षमतेच्या रुग्णालय इमारती व पायाभूत सुविधा उपलब्ध असून डॉक्टरही उपलब्ध आहेत. त्यामध्ये अधिक आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस व पूरक आरोग्य कर्मचारी घेऊन या सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर व्हावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी याकरिता ठोस प्रयत्न करण्यात येत आहेत.
ऐरोली व नेरूळ रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात येत असून दर आठवड्याला संबंधितांची आढावा बैठक घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अशा प्रकारच्या अचानक भेटी देऊन आरोग्यासह इतरही विभागांच्या सेवा सुविधांची प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेण्यात येईल व त्यामध्ये नागरिकांना अपेक्षित सुधारणा करण्यात येईल असे स्पष्ट केले.
Published on : 04-12-2020 14:35:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update