कोरोनाचा अहवाल 1 ते 2 दिवसात मिळण्यासाठी खाजगी लॅबशी कराराचा आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांचा महत्वाचा निर्णय
कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रभावी उपाययोजना केल्या जात असताना कोरोना संशंयितांचा स्वॅब घेऊन शासनाने नेमून दिलेल्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्याठिकाणी इतरही शहरांतील स्वॅब तपासणीचे काम होत असल्याने तपासणी अहवाल प्राप्त होण्यासाठी लागणारा विलंब टाळण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी कृष्णा डायग्नोसिस या खाजगी लॅबशी करार केला असून त्यामुळे आता एक ते दोन दिवसात स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त होणार आहे.
कोव्हीड 19 बाधितांची माहिती शक्य तितक्या लवकर प्राप्त झाल्यास त्यांचे विलगीकरण करून त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची काळजी घेणे शक्य होते. तथापि शासकीय लॅबमध्ये एकाच वेळी अनेक शहरांतील सॅम्पलच्या तपासणीची मोठी संख्या बघता तपासणी अहवाल प्राप्त होण्यास काहीसा विलंब होत होता. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 12 विशेष प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात येऊन त्याठिकाणी घरोघरी जाऊन मास स्क्रिनींग सुरू करण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत स्वॅब तपासणीची संख्या वाढेल हे लक्षात घेऊन लवकरात लवकर अहवाल प्राप्त व्हावेत याकरिता महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी ठोस पावले उचलत कृष्णा डायग्नोसिस या आयसीएमआर मान्यताप्राप्त खाजगी लॅबशी करार केला असून यामध्ये लॅबच्या सीएसआर निधीतून शासनमान्य दरामध्ये महानगरपालिकेस सवलत देण्यात येणार आहे. या करारानुसार लॅबने महानगरपालिका स्थापित सीसीसी, डिसीएचसी, डिसीएच कोव्हीड 19 रूग्णालयीन सुविधांमधून दररोज किमान 500 स्वॅब सॅम्पल घेऊन जाण्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची टेस्टींग लॅब सुरू करण्याची कार्यवाही गतीमानतेने सुरू असून कोरोना संशयितांची शीघ्र तपासणी करण्यासाठी 40 हजार अँटीजेन किट्स खरेदी करण्यात आल्या आहेत. ज्यामधून पॉझिटिव्ह व्यक्तींचे अहवाल त्वरीत प्राप्त होऊन उपचारांना लगेच प्रारंभ करणे शक्य होणार आहे.
त्याचप्रमाणे मेट्रोपोलीस लॅबमार्फत 15 हजार स्वॅब तपासण्या मोफत करून दिल्या जात असून त्यामध्ये आता कृष्णा डायग्नोसिस या खाजगी लॅबकडे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी स्वॅब तपासणी व त्यांचे अहवाल 1 ते 2 दिवसात प्राप्त करून देण्याची जबाबदारी सोपविल्याने व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे लवकर कळणार असून याचा लाभ कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी होणार आहे.
Published on : 01-07-2020 12:51:04,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update