*विशेष दक्षता पथकांनी 11 दिवसात 4377 व्यक्तींवर कारवाई करीतवसूल केला 25 लाखापेक्षा अधिक दंड* *10 ऑगस्टपासून एकूण 34988 जणांवरील कारवाईतून 1 कोटी 61 लाखाहून अधिक दंडवसूली*

* कोरोनाच्या दुस-या लाटेवर मात करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने मिशन ब्रेक द चेन'च्या अधिक प्रभावी अंमलबजावणीव्दारे टेस्टींगमध्ये वाढ करीत आयसोलेशन आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर भर देण्यास सुरूवात केली आहे. त्यासोबतच कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीयरित्या होत असलेली वाढ लक्षात घेऊन तात्पुरत्या बंद करण्यात आलेली कोव्हीड केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.
* या उपाययोजनांप्रमाणेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर आणि हात धुणे या सुरक्षा नियमांचे पालन करावे याकरिता विविध माध्यमांतून प्रचार, प्रसार करण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करून सामाजिक आरोग्याला अपाय पोहचविणा-या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
* यासाठी विभाग कार्यालय पातळीवर पोलीसांसह दक्षता पथके तैनात असून याव्यतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार मुख्यालय स्तरावरून 31 विशेष दक्षता पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत.
* प्रत्येक पथकात 5 कर्मचारी अशाप्रकारे प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात सकाळी 1 व रात्री 1 अशी 2 पथके कार्यरत असून एपीएमसी मार्केट क्षेत्राकरीता सकाळ, दुपार, रात्र अशा तिन्ही शिफ्टमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये 5 पथके कार्यरत आहेत. याशिवाय 5 विशेष पथके रात्री 8 नंतर जारी करण्यात आलेल्या वेळेच्या प्रतिबंध नियंत्रणासाठी दक्ष आहेत.
* या विशेष दक्षता पथकांकडून विशेष कारवाई केली जात असून 21 मार्चपासून 31 मार्चपर्यंत या विशेष दक्षता पथकांमार्फत 4377 व्यक्ती / व्यावसायिक यांच्यावर कारवाई करीत 25 लक्ष 84 हजार 200 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
* यामध्ये मास्क नसणा-या 1536 व्यक्तींकडून 7 लक्ष 68 हजार इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.
* सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघन करणा-या 128 व्यावसायिकांकडून 12 लक्ष 67 हजार इतकी दंडात्मक रक्कम तसेच 2705 व्यक्तींकडून 5 लक्ष 41 हजार 200 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
* तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 8 व्यक्तींकडून 8 हजार इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.
* या व्यतिरिक्त विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथकांकडूनही सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-यांविरोधात कारवाई करण्यात येत असून 10 ऑगस्टपासून 31 मार्चपर्यंत 30 हजार 621 व्यक्ती / व्यावसायिक यांच्याकडून एकूण 1 कोटी 36 लक्ष 13 हजार 150 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
* अशाप्रकारे कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या एकूण 34 हजार 988 व्यक्ती / व्यावसायिक यांच्याकडून 1 कोटी 61 लक्ष 97 हजार 350 इतकी एकूण दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
* कोव्हीड रूग्णांची वाढती संख्या पाहता एका बाजूला अतिरिक्त बेड्स उपलब्ध करण्याचे नियोजन केले जात असताना रूग्णवाढीचा दर नियंत्रणात यावा यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी नियंत्रणात ठेवणे व सार्वजनिक ठिकाणी कोव्हीड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच आस्थापना यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. याबाबत कोणत्याही प्रकारे कुचराई होणार नाही यादृष्टीने प्रयत्न केला जात आहे.
Published on : 01-04-2021 15:49:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update