*12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला नवी मुंबईत उत्साही सुरुवात*
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार आजपासून लसीकरणाच्या सहाव्या टप्प्याला म्हणजेच 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली या तिन्ही रुग्णालयांत दुपारी 2.30 वाजल्यापासून लसीकरणास उत्साहात सुरुवात झाली.
सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे दिया जॉन हिने, माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय नेरुळ येथे ऋषीकेश मोंडे व राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथे मुस्कान हंकारे ही मुले त्या त्या केंद्रावरील पहिल्या डोसचे मानकरी ठरले.
12 ते 14 वयोगटातील लसीकरणाची संपूर्ण तयारी नवी मुंबई महानगरपालिेकेने केलेली असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी लसीकरणाच्या नियोजनाविषयी घेतलेल्या विशेष बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार आज 3 रुग्णालयांमध्ये लसीकरणास प्रारंभ झाला. शिक्षण विभागामार्फत लसीकरणाविषयी सर्व शाळांना माहिती देण्यात आल्याने तसेच विविध प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमे याव्दारे करण्यात आलेल्या संदेश प्रसारणामुळे तिन्ही केंद्रांवर मुला-मुलींची उत्साही उपस्थिती होती.
लसीकरणासाठी 15 मार्च 2008 ते 15 मार्च 2010 या कालावधीत जन्मलेली मुले पात्र असून लसीकऱणासाठी येताना मुलांचे आधारकार्ड तसेच त्यांच्या जन्म तारखेची नोंद असलेले शाळेचे आयकार्ड अथवा तत्सम कागदपत्र सोबत असणे गरजेचे आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली या तिन्ही सार्वजनिक रुग्णालयात उद्या 17 मार्च पासून सकाळी 9 ते सायं 5 या वेळेत 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण केंद्रांमध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्याबाबतही आयुक्तांनी बैठकीत आरोग्य विभागास यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे.
तरी 12 ते 14 वयोगटातील नवी मुंबईतील प्रत्येक मुलाचे महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांवर जाऊन मोफत लसीकरण करण्याबाबत त्यांच्या पालकांनी काळजी घ्यावी व शाळांनीही याबाबत पुढाकार घेऊन कार्यवाही करावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 16-03-2022 13:47:11,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update