सेक्टर 14, कुकशेत येथे नुतन शाळा इमारतीचे भूमिपुजन संपन्न
स्थलांतरित झाल्यानंतर कुकशेत गाव नव्या ठिकाणी, नव्या स्वरूपात वसले आणि आता अद्ययावत सोयी सुविधांनी परिपूर्ण होत असल्याचा आनंद व्यक्त करीत आमदार श्री. गणेश नाईक यांनी महानगरपालिकेच्या शिक्षण व्हिजनच्या माध्यमातून प्रशस्त व आकर्षक इमारती उभारणीसोबतच विद्यार्थ्यांनी सादर केलेला कलाविष्कार पाहिल्यानंतर त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे धोरण चांगल्या रितीने राबविले जात असल्याचे दिसून येते अशा शब्दात कौतुक केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. 85, कुकशेत मध्ये सेक्टर 14, नेरूळ येथे उभारण्यात येत असलेल्या नुतन शाळा इमारतीचे भूमीपुजन, माजी नगरसेवक कै. रामचंद्र लक्ष्मण पाटील नागरी आरोग्य केंद्र नामकरण आणि कुकेशेतगांव प्रवेशव्दार बांधणे कामाचा शुभारंभ याप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांच्या समवेत महापौर श्री. जयवंत सुतार, माजी खासदार श्री. संजीव नाईक, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, स्थानिक नगरसेविका श्रीम. सुजाता पाटील, नगरसेवक श्री. सुरज पाटील, श्री. गिरीश म्हात्रे, श्रीम. जयश्री ठाकूर, श्रीम. रूपाली भगत, परिवहन समितीचे माजी सभापती श्री. प्रदीप गवस, कार्यकारी अभियंता श्री. सुभाष सोनावणे, माजी नगरसेवक कै. रामचंद्र पाटील यांच्या पत्नी श्रीम. रंजना पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महापौर श्री. जयवंत सुतार यांनी नवी मुंबईतील प्रत्येक गावाला एक इतिहास असल्याचे सांगत कुकशेत गांवाच्या वैशिष्ट्यांविषयी भाष्य केले. नवी मुंबई महानगरपालिकेने सन 2000 साली आपल्या क्षेत्रातील जिल्हा परिषदेकडे असलेल्या शाळा हस्तांतरित करून एक व्हिजन डोळ्यांसमोर ठेवत शिक्षणाचा विकास केला आणि त्याची फलश्रुती म्हणजे आता प्रत्येक वर्षी महापालिका शाळांतील पटसंख्या वाढत असल्याचा अभिमान व्यक्त केला.
नगरसेवक श्री. सुरज पाटील यांनी कुकशेत गावाच्या विकासासाठी प्रभागात होत असलेल्या विविध सुविधा कामांची माहिती दिली तसेच कार्यपूर्तता होत असल्याबद्दल मान्यवरांचे व नागरिकांचे आभार मानले.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 11 व 92 च्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सादर झालेल्या नृत्याविष्कारालाही मान्यवरांसह उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली. यानिमित्त 'वेचली काव्यफुले' या मुलांनी संकलित केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन संपन्न झाले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
Published on : 23-02-2020 08:32:48,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update