आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केली विविध सुविधा कामांची पाहणी
विविध नागरी सुविधा कामांमध्ये गुणात्मक दर्जा राखून त्यांना गती देण्याचा महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांचा दृष्टीकोन असून त्या अनुषंगाने आज विविध कामांची पाहणी करून त्यांनी मौल्यवान सूचना केल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन काळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
तुर्भे एमआयडीसी येथील महानगरपालिकेच्या शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळावरील बांधकाम आणि पाडकाम कचऱ्यावरील (C & D Waste) प्रकल्प यंत्रणेची त्यांनी पाहणी केली व हा प्रकल्प तत्परतेने कार्यान्वित करणेबाबतचे निर्देश अभियांत्रिकी विभागास दिले. सेव्हन स्टार रेटींग शहराच्या मानांकनाकरिता शहरातील बांधकाम आणि पाडकाम निष्कासित कचऱ्याची (Construction & Demolition Waste) योग्य रितीने विल्हेवाट लावणे अनिवार्य असल्याचे लक्षात घेऊन आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष केंद्रीत केले आहे. या प्रकल्पामध्ये प्रतितास 20 टन बांधकाम आणि पाडकाम कच-यावर प्रक्रिया केली जाणार असून प्रकल्प रचना, उभारणी व चालविणे (DOB) या तत्वावर पुढील 5 वर्षे हा प्रकल्प चालविला जाणार आहे. 2031 पर्यंत या प्रकल्पाची कालावधी क्षमता असणार आहे.
याप्रमाणेच आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी तुर्भे रेल्वे स्टेशन नजिक उभारण्यात येत असलेल्या उड्डापुलाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली व निविदा प्रक्रियेत असलेले हे काम स्थानिक गरज लक्षात घेऊन विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशित केले. तुर्भे स्टोअर याठिकाणी रस्ता ओलांडताना नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी व त्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याच्या दृष्टीने तसेच वाहतुक नियोजनाच्या दृष्टीने हा पूल महत्वाचा असून त्याबाबत तत्पर कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी स्पष्ट आदेश दिले. याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयकिया सेंटर येत असल्याने वाहतुकीत वाढ होणार आहे. यादृष्टीने तेथे भविष्याची गरज लक्षात घेऊन सुविधा पुरविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यावेळी पुलाचे वास्तुविशारद अभिनव आकार यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. याचवेळी आयुक्तांनी त्या परिसरात सुरू असलेल्या पदपथ व गटाराच्या कामाची पाहणी करून उपयुक्त सूचना केल्या.
पुढे सेक्टर 9 ए वाशी येथील नाल्यालगत असलेल्या पार्कींग स्थळाचीही पाहणी करून आयुक्तांनी नागरिकांकरिता लवकरात लवकर पार्कींगची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे सूचित केले. याठिकाणी 179 चार चाकी वाहने आणि 65 दुचाकी वाहनांचे पार्कींग करण्यासाठी जागा उपलब्ध होऊन सर्वात वर्दळीचे क्षेत्र असणा-या या भागात विविध कामांसाठी वाहने आणणा-या नागरिकांची सोय होणार आहे.
अशाच प्रकारे वाशी सेक्टर 10 ए मिनी सी शोअर लगत अमृत प्रकल्पातून विकसित करण्यात आलेल्या उद्यान, उपवनाचीही पाहणी करीत आयुक्तांनी झाडांची योग्य निगा राखण्याकडे काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणा-या सुविधा गुणात्मक असाव्यात यासाठी आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ आग्रही असून त्यादृष्टीने विविध सुविधा कामांची पाहणी करीत दर्जा वाढीकडे लक्ष दिले जात आहे.
Published on : 17-12-2019 15:58:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update