आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी रस्ते खोदकाम आणि दुरुस्ती सुसूत्रतेसाठी घेतला आढावा
विविध प्राधिकरणे तसेच नागरिक यांचेमार्फत वेगवेगळ्या कामांसाठी रस्ते खोदण्यात येत असल्यामुळे रस्ते खराब होतात, असुविधा निर्माण होते तसेच त्यासाठी खर्च केलेल्या निधीचाही अपव्यय होतो. या महत्वाच्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी रस्ते खोदकाम व त्यांची दुरुस्ती याविषयी सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे तसेच सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता उपस्थित होते.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतूदीनुसार आवश्यक कामांसाठी रस्ते खोदाई करण्यासाठी परवानगी देण्यात येते. याबाबत 2015 च्या परिपत्रकानुसार 1 ते 100 मिटरच्या रस्ते खोदकामासाठी संबंधित विभाग अधिकारी यांचेमार्फत परवानगी देण्यात येते. तसेच 101 ते 1000 मिटर पर्यंतच्या रस्ते खोदाईसाठी संबंधित परिमंडळाचे उपआयुक्त व 1000 मिटरपासून पुढील रस्ते खोदकामासाठी संबंधित अतिरिक्त आयु्क्त यांना परवानगीचे अधिकार आहेत. ही परवानगी देताना दि. 17 फेब्रुवारी 2018 रोजीच्या महासभेतील ठराव क्र. 233 नुसार नागरिक / शासकीय संस्था / उपक्रम यांच्याकरीता डांबरी रस्ता व पदपथ यांचे पुनर्स्थापना शुल्क प्रति चौ.मी. रु.2795/- तसेच खाजगी संस्थांकडून प्रति चौ.मी. रु.9600/- निश्चित करण्यात आले आहे. शासकीय संस्थांमध्ये वीज, पाणी, गॅस अशा आवश्यक नागरी सेवा पुरविणा-या शासकीय संस्थांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विनापरवानगी व अनधिकृतरित्या रस्ते खोदल्यास रस्ता खोदाई शुल्काच्या दुप्पट दंड आकारण्यात येतो.
याबाबत आयुक्तांनी सविस्तर आढावा घेत रस्ते खोदाई परवानगी शुल्काव्दारे महानगरपालिकेस शुल्क रक्कम मिळण्याइतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त लक्ष अभियंत्यांनी रस्ता कमीत कमी कसा खराब होईल याकडे द्यावे असे आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी स्पष्ट केले. नवीन रस्ते, पदपथ, गटारे यांचे बांधकाम करताना त्यांची लांबी संपल्यानंतर अथवा रस्ता क्रॉसींगच्या ठिकाणी कॉरीडॉर घ्यावा व पेव्हर ब्लॉकचा उपयोग करावा, जेणेकरून रस्ता खराब होणार नाही असे आयुक्तांनी सूचित केले. याव्दारे आवश्यक त्या वाहिन्या टाकण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होईल व त्यासाठी संपूर्ण रस्ता खोदावा लागणार नाही.
खोदकाम केल्याने पूर्ण रस्ता खराब होतो याकडे लक्ष वेधत एखाद्या संस्थेला रस्ता खोदकामाची परवानगी देताना ते किती रस्ता खोदणार आहेत व त्याच्या आसपासची किती जागा रस्ता पूर्ववत करण्यासाठी दुरुस्त करावी लागणार आहे याकडे कटाक्षाने लक्ष देत परवानगी देण्यापूर्वीच खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. रस्ते खोदकामाची परवानगी देताना त्याच वेळी रस्ते दुरुस्त करणा-या एजन्सीला दुरुस्तीचा कार्यादेश द्यावा असेही आयुक्तांनी सूचित केले.
रस्ता दुरुस्ती लवकर होण्यासाठी प्री कास्ट डक्ट / प्री फॅब्रीकेटेड अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा जेणेकरून काम लवकर होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित करीत आयु्क्तांनी सर्व विभाग कार्यालयांमध्ये या कामी समन्वय असावा असे निर्देश दिले.
नवी मुंबई शहर खड्डेमुक्त असावे तसेच आवश्यक सुविधांसाठी नागरिकांना वा संस्थांना खड्डे करावयाचे झाल्यास ते तत्परतेने दुरुस्त होऊन रस्ते पूर्ववत व्हावेत आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी रस्त्यावरील खोदकामाची परवानगी व त्याची तत्पर दुरुस्ती यामध्ये सुसुत्रता असावी असे निर्देश संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना दिले आहेत.
Published on : 18-12-2019 12:38:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update