नवी मुंबई महानगरपालिकेचा 28 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त मागील वाटचालीचा आढावा घेतानाच आगामी काळात करावयाच्या कामांचे नियोजन करण्याचा हा दिवस असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री.जयवंत सुतार यांनी यापुढील काळात नागरी सुविधांचा दूरगामी आराखडा तयार करणे व त्याची योग्य प्रकारे पुर्तता करणेकरिता सुयोग्य नियोजन करण्यासाठी आपण कटीबध्द राहूया असे आवाहन केले. आपण करीत असलेल्या संकल्पांची पूर्तता करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगत लोकप्रतिनिधी, प्रशासन व नागरिक आपण सर्व मिळून नवी मुंबईच्या नावलौकीकासाठी कटिबध्द राहण्याचा निश्चय महापौर महोदयांनी व्यक्त केला. विष्णुदास भावे नाटयगृह येथे संपन्न झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी विष्णुदास भावे नाटयगृहाचा नुतनीकरणोत्तर शुभारंभही संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर महापौर श्री.जयवंत सुतार यांच्या समवेत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार सौ.मंदाताई म्हात्रे, उप महापौर श्रीम.मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ, स्थायी समितीचे सभापती श्री. नविन गवते, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम.अंजली वाळुंज, श्रीम.श्रध्दा गवस, श्री.लिलाधर नाईक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, आरोग्य समिती सभापती श्रीम.शशिकला पाटील, नगरसेवक श्री.रामचंद्र घरत, श्री.देविदास हांडे पाटील, श्री.प्रकाश मोरे, श्री.शशिकांत राऊत, श्री.गिरीश म्हात्रे, श्री.संजू वाडे, ॲड.अपर्णा गवते, श्रीम.दिपा गवते, श्रीम.हेमांगी सोनावणे, श्रीम.मोनिका पाटील, श्रीम.अनिता मानवतकर, परिवहन समिती सदस्य श्री.राजू शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्री.रविंद्र पाटील व श्री.महावीर पेंढारी, शहर अभियंता श्री.सुरेंद्र पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम.मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई हे शहर आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहराच्या दिशेने झेपावत असून आगामी काळात नवी मुंबईत पर्यटनाच्या दृष्टीने दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाव्यात तसेच आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सेवा, महिला निर्मित साहित्यासाठी विक्री केंद्र, ज्वेल ऑफ नवी मुंबईचे अदययावतीकरण, ज्येष्ठ नागरिक भवन अशा विविध बाबींच्या उपलब्धतेची गरज व्यक्त केली. महानगरपालिकेने नेहमीच दर्जेदार सुविधा भरभरुन उपलब्ध करुन दिल्यात असे सांगत त्यांनी महानगरपालिकेच्या यशात सर्व घटकांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना 5 स्टार रेटींग मिळवणारी राज्यातील पहिली महानगरपालिका असल्याचा अभिमान व्यक्त करीत यापुढील काळात 7 स्टार रेटींगसाठी सर्वांच्या सहयोगाने आपला प्रयत्न असेल असा संकल्प व्यक्त केला. घनकचरा व्यवस्थापनातील अत्याधुनिक प्रकल्प, दर्जेदार रस्ते, क्रीडा अकादमी, उदयानांचा सर्वांगीण विकास, घणसोली ऐरोली ब्रिज, एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण, सायकल ट्रॅक, ऐरोली रुग्णालय आगामी तीन महिन्यांत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, ऑनलाईन ई हॉस्पिटल प्रणाली राबविणे, स्पर्धा परीक्षा केंद्र, विरंगुळा केंद्र, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, ऐरोली नाटयगृह, सेंट्रल लायब्ररी असे विविध प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आगामी नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार मार्फत स्वच्छतेच्या दुस-या तिमाहीत नवी मुंबई महानगरपालिका तिस-या क्रमांकावर असल्याचे सांगत हे मानांकन स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये उंचावण्यासाठी आपण सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून अथक प्रयत्नशील राहू असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
यावेळी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ करीता गीतकार धनश्री देसाई यांनी लिहिलेल्या व रोहित शास्त्री यांनी संगीतबध्द केलेल्या ‘नवी मुंबई चमकवूया’ या स्वच्छता जिंगलचे प्रसिध्दी प्रक्षेपण करण्यात आले. स्वच्छतेचा संदेश देणारी ही संगीतमय जिंगल यापुढील काळात सर्व ठिकाणी प्रसारित केली जाणार आहे.
याप्रसंगी डिसेंबर महिन्यात सेवा निवृत्त झालेल्या वाशी रुग्णालयातील सहा. अधिेसेविका श्रीम. सुनिता ढोबळे, सफाई कर्मचारी श्रीम. मंजुळा गवळी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सन्मान करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण दिवसभर महानगरपालिका अधिकारी - कर्मचारीवृंदाचे गीत, नृत्य, नाटय आदी कलागुणदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. यामध्ये महापालिका आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांनीही ‘पल पल दिल के पास’ हे गीत वन्स मोअरची दाद घेत सुरेल सादर करुन कलारंग प्रदर्शित केले. आयुक्तांनी सादर केलेल्या या वन्स मोअरची दाद मिळालेल्या गीताने अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या अंगभूत गुणांना वाव देणा-या क्रिकेट, कॅरम, व्हॉलीबॉल, 100 मी. धावणे, 50 मी. धावणे, गोळाफेक, रस्सीखेच अशा क्रीडा स्पर्धांच्या तसेच पाककला व महिलांसाठी विशेष स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन 2020 च्या दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन महापौर श्री.जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयकॉनिक महापालिका मुख्यालय इमारतीस करण्यात आलेली आकर्षक विदयुत रोषणाई पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मुख्यालय परिसराला भेट देत आहेत.
Published on : 03-01-2020 10:59:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update