टाकाऊ ई कचरा यापासून साकारली 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' कलात्मक शिल्पाकृती

'स्वच्छ सर्वेक्षण 2020' ला सामोरे जाताना मागील वर्षीचे देशातील सातवे मानांकन उंचाविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सर्व नागरिकांच्या सहयोगाने सज्ज झाली असून ओला व सुका कच-याप्रमाणेच ई कच-याची सुयोग्य विल्हेवाट लावण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. पर्यावरण विघातक अशा ई कच-याकडे बारकाईने लक्ष देत, त्याचे योग्य संकलन व शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट यांचे व्यवस्थापन सुनियोजित पध्दतीने करणारी नवी मुंबई ही अग्रणी महानगरपालिका असून स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या अनुषंगाने ई कच-यापासून बनविलेली मुख्यालयासमोरील कलाकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत ई कच-याविषयी जागरूकता निर्माण करेल असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केला.
टाकाऊ ई कच-यापासून 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' ही अक्षरे साकारलेल्या कलात्मक शिल्पाकृतीचे लोकार्पण उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसळ यांच्या शुभहस्ते महापालिका मुख्यालयासमोर संपन्न झाले. याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती श्री. नवीन गवते, क्रीडा समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका श्रीम. अनिता मानवतकर, प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. किरणराज यादव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, मुख्य लेखा परिक्षक श्री. दयानंद निमकर, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे तसेच शिल्पाकृती रचयिता ग्लोबल ग्रीन इनोवेटर्स आणि ग्रीन सोसायटी फोरमचे श्री. बनॉय के, श्री. जसपाल सिंग नेओल, श्री. निखिल एम. आणि सहकारी उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने “टाकाऊतून टिकाऊ” ही संकल्पना राबवत नवी मुंबई महानगरपालिका आणि ग्लोबल ग्रीन इनोवेटर्स व ग्रीन सोसायटी फोरम या संस्थेच्या माध्यमातून ई कचरा यापासून बनविलेले 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' अक्षरांचे अभिनव शिल्प साकारण्यात आले आहे.
यापूर्वीही 'टाकाऊतून टिकाऊ' ही संकल्पना राबवित ग्रीन सोसायटी फोरमने महापालिका मुख्यालयात आणि स्वच्छता पार्क कोपरखैरणे येथे संगणकाच्या टाकाऊ मदरबोर्डपासून भारत देशाच्या नकाशाची शिल्पाकृती साकारली होती. ज्याला 'मदर इंडिया बोर्ड' असे आकर्षक नाव देण्यात आले होते. त्याचेच पुढचे पाऊल टाकत कलात्मक विचारांच्या या समुहाने नागरिकांनी टाकून दिलेल्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांची 7 हजार झाकणे 5 दिवस शहरभर फिरून जमा केली व त्यामधून दहा दिवसात फिफा स्पर्धेच्या “रिसायकलेडेलिक फिफा म्युरल” हे अभिनव शिल्प महापालिका मुख्यालयासमोर साकारले होते.
त्यापुढे जात नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या या संस्थांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा ई कचरा यापासून 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' ही कलात्मक शिल्पाकृती ११० संगणकाच्या टाकाऊ मदरबोर्ड पासून आठ दिवसात बनवल़ी आहे. पंधरा फुट लांब आणि 7 फूट उंचीची ही वर्तुळाकार शिल्पाकृती 200 किलो वजनाची आहे. 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत 'शून्य कचरा' ही संकल्पना प्रत्यक्षात आणत पर्यावरणशील स्मार्ट कलात्मक शहर ही नवी मुंबईची ओळख या शिल्पामधून निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या शिल्पाच्या माध्यमातून मानवी वर्तनात पर्यावरणपूरक बदल घडावा यासाठी एका बाजूने ई कच-याची नीट विल्हेवाट लावणे व दुस-या बाजूने टाकाऊ ई कच-याचे कला स्वरुपात रुपांतर करणे ही भूमिका नजरेसमोर ठेवण्यात आली आहे. हे टाकाऊतून टिकाऊ शिल्प साकारणा-या श्री. बीनॉय के, श्री. जसपाल सिंग नेओल, श्री. निखिल एम, श्री. देवेंद्र सिंग, श्री. जयकर एलिस यांच्यासह व्हर्चुअल कलादिग्दर्शक श्री. मंजू चौहान आणि श्री. कुशल फ़ुरसूले व त्यांच्या सहका-यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
महापालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीच्या समोर साकारलेले हे शिल्प नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे, शिवाय भव्यतम आकर्षक इमारतीच्या पार्श्वभूमीवर सेल्फी पॉईंट म्हणूनही लोकप्रिय होत आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभदिन साजरा करण्यासाठी व मुख्यालय इमारतीची रोषणाई पाहण्यासाठी आलेल्या मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी या शिल्पाकृतीसोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. आताही पाम बिच मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी थांबून या शिल्पासोबत सेल्फी काढताना दिसतात.
Published on : 03-01-2020 11:09:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update