स्वच्छ भारत मिशन संचालक श्री.व्ही.के.जिंदाल यांनी केली नवी मुंबईतील स्वच्छतेची पाहणी
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2020” मध्ये सहभागी होत देशातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका व्यापक लोकसहभाग घेत सज्ज झाली असून स्वच्छ भारत मिशनचे संचालक श्री. व्ही. के. जिंदाल यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला भेट देऊन शहरातील स्वच्छता विषयक कामांची पाहणी केली. महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी त्यांचे स्वागत केले व स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.
यामध्ये स्वच्छता विषयक लोकसहभाग वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध जनजागृतीपर उपक्रमांची त्यांनी पाहणी केली. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘स्वच्छता मित्र’ या अभिनव संकल्पनेला भेट देत त्यांनी प्रकाशमान बॉलवर हात ठेवत स्वच्छतेची शपथ घेतली व या उपक्रमाच्या वेगळेपणाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे शहरभर फिरून स्वच्छता विषयक जनजागृती करणा-या एल.ई.डी. स्क्रीन लावलेल्या मोबाईल व्हॅनची त्यांनी पाहणी केली तसेच त्यावरील कचरासूराला चेंडू मारून स्वच्छतेचा संदेश मोठ्यांसह प्रामुख्याने मुलांमध्ये प्रसारित करणा-या ‘कचरासूर’ या आणखी एका वैविध्यपूर्ण उपक्रमाची प्रशंसा केली. नवी मुंबई महानगरपालिका राबवित असलेल्या जनजागृतीपर कार्यक्रम व उपक्रमांचे वेगळेपण नजरेस येण्यासारखे असून या उपक्रमांचे अनुकरण इतरांनीही करावे असे विशेष अभिप्राय त्यांनी नोंदविले.
वाशी येथील मिनी सी शोअर परिसराला भेट दिल्यानंतर तेथील निसर्गरम्य वातावरणाने प्रभावित होऊन श्री. व्ही. के. जिंदाल यांनी या परिसरात आणखी सुविधा वाढविण्याविषयी मौलीक सूचना केल्या.
जुनी क्षेपणभूमी शास्त्रोक्त पध्दतीने बंद करून त्याठिकाणी फुलविण्यात आलेल्या कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानाला भेट देऊन तेथील विस्तृत हिरव्यागार परिसराबद्दल समाधान व्यक्त करीत त्याठिकाणच्या स्वच्छता पार्क संकल्पनेची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अत्यंत अभिनव आणि माहिती व ज्ञानपूर्ण असा हा प्रकल्प असल्याचे अधोरेखीत करीत श्री. व्ही. के. जिंदाल यांनी त्यामधील आणखी परिपूर्णतेच्या दृष्टीने मौल्यवान सूचना केल्या. निसर्गोद्यान जवळील शौचालयाच्या अंतर्गत व बाह्य स्वच्छतेची त्यांनी बारकाईने पाहणी केली.
या वेळी शाळा-शाळांमध्ये ‘प्लास्टिमॅन’ ही अभिनव संकल्पना राबविणा-या अंकुर संस्थेच्या श्रीम. गीता देशपांडे आणि सहका-यांशी चर्चा करून त्यांनी इतक्या बारकाईने प्लास्टिक निर्मुलनाचा नवी मुंबईचे नागरिक विचार करीत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्याचप्रमाणे प्रा. वृषाली मगदूम संचलित स्त्री मुक्ती संघटनेच्या घरातच ओल्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा खतटोपली (कंपोस्ट बास्केट) ची पाहणी करून कचरा निर्मुलनाचे उत्तम साहित्य अशी प्रशंसा केली.
नेरुळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया कॉलनीला भेट देऊन तेथील कंपोस्ट पिट्सची बारकाईने पाहणी करत श्री. व्ही. के. जिंदाल यांनी सोसायटीच्या परिसरातील नीटनेटकेपणाचे व स्वच्छतेचे कौतुक केले. या सोसायटीचे अनुकरण इतरांनीही करावे असे अभिप्राय त्यांनी आनंदाने व्यक्त केले.
जुन्या चपला, बूट संकलीत करून त्याची दुरुस्ती करत त्यापासून नव्या चपला तयार करणा-या ग्रीन सोल या आणखी एका वेगळ्या उपक्रमाच्या कामाची त्यांनी पाहणी केली व समाजाच्या हिताचा एक आदर्श उपक्रम म्हणून या कामाची विशेष नोंद घेतली.
नवी मुंबई शहरात आल्यानंतर ठिकठिकाणी स्वच्छता संदेश लिहिलेल्या आकर्षक रंगविलेल्या चित्र भिंतीमधून नागरिकांच्या मनात स्वच्छतेचा संदेश चांगल्या प्रकारे रुजविला जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत स्वच्छ भारत मिशनचे संचालक श्री. व्ही. के. जिंदाल यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी व नवी मुंबईकर नागरिकांच्या एकत्रित सक्रिय सहभागामुळेच नवी मुंबई शहराचे रुप स्वच्छ व सुंदर दिसत असल्याचे विशेषत्वाने नमूद केले.
Published on : 17-01-2020 15:46:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update