“ रस्त्यावरील वाढत्या अपघातामुळे राष्ट्र उत्पन्न विकास कामात अडथळा निर्माण होत आहे ” सौ. हेमांगिनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांचे प्रतिपादन.
सन 1961 साली रस्त्यावरील वाहनांची संख्या एक लाख होती. आज त्यामध्ये कोटयावधी वाहनांची भर पडली आहे. मात्र त्या प्रमाणात रस्त्यांची वाढ व आवश्यक रस्ते दूरूस्ती होत नसल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून जवळपास 80% अपघात चालकांच्या निष्काळजीपणामुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात मृत्युमुखी पडणाऱ्या 25 ते 35 वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक असल्याने राष्ट्र उत्पन्न विकास कामात मोठया प्रमाणावर अडथळा निर्माण होत असल्याची खंत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल सौ. हेमांगिनी पाटील, यांनी व्यक्त केली.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम व हिनो मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11ते 17 जानेवारी 2020 या कालावधीत आयोजित 'रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान 2020' निमित्त चालकांसाठी बचावात्मक वाहन वाहन चालविण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शनपर कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. 'अपघात विरहित 2020' साठी वाहन चालकांची मानसिकता बदलण्याची गरज असून त्यांनी रस्त्यावर वाहन चालविताना संयम, समय सूचकता, आदर, प्रेम व एकाग्रता या पंचसूत्रीचा अवलंब करून वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन सौ.पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते 'तंबाखुमुक्त बस आगार' फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल सौ. हेमांगिनी पाटील, सहा.पोलीस आयुक्त (वाहतुक, नवी मुंबई) श्री.राजेंद्र चव्हाण, संचालक हिनो मोटर्स श्री. हिदेयुकी फुकामाची, सहाय्यक महाव्यवस्थापक हिनो मोटर्स श्री. जॉन कोशी, सलाम मुंबई फाऊंडेशनचे डॉ.अभिराम मेंहदळे या मान्यवरांचे परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड यांनी स्वागत केले.
आपल्या प्रास्तविकपर मनोगतात एनएमएमटी व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड यांनी परिवहन उपक्रम वाहन चालकांसाठी रोड सेफ्टी बरोबरच हेल्थ सेफ्टीला सर्वोच्च प्राधान्य देत असून सलाम मुंबई फाऊंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून परिवहन उपक्रमाच्या सर्व आगारातील चालक, वाहक व सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यात व्यसनमुक्ती तसेच तंबाखुमुक्त बस आगार मोहीमेबाबत जनजागृती करण्यासाठी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 ची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगितले. याशिवाय परिवहन उपक्रमाने नवी मुंबईकरांना सातत्याने नवनवीन तंत्रप्रणालीची बस सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला असून अत्याधुनिक ITMS प्रणालीच्या माध्यमातून वाहतुकीच्या दैनंदिन बस संचलनावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचे सांगितले. चालकाच्या मिस बस स्टॉप, ओव्हर स्पीड, रुट व्हायलेशनवर याव्दारे नियंत्रण करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रणालीद्वारे प्रवाशांना NMMT Bus Tracker द्वारे सर्व मार्गावरील बसेसची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच मोबाईल ॲप, ऑन लाईन तिकीट, डिजीटल पास, न्यूज अलर्ट व आणीबाणी प्रसंगी संदेश पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
श्री. हिदेयुकी फुकामाची, संचालक, हिनो मोटर्स यांनी आपल्या भाषणात परिवहन उपक्रमाने रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत चालकांना हिनो मोटर्स पुरस्कृत सलग 7 दिवस प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल परिवहन व्यवस्थापकांचे आभार व्यक्त केले. तसेच सलाम मुंबई फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने सर्व चालकांची मुख व फुप्पुस तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन हिनो मोटर्सचे प्रशिक्षक श्री.विनय मोर यांनी केले. यांत्रिक उपअभियंता श्री.विवेक अचलकर यांनी आभार प्रदर्शन केले.
Published on : 20-01-2020 15:06:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update