नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा क्रीडा जल्लोष
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असून महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्रीडा गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचा उपक्रम प्रोत्साहक असल्याचे मत व्यक्त करीत यापुढील काळात गुणवंत खेळाडूंना विविध खेळांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा प्रबोधिनी सारखा अभिनव उपक्रम राबविण्याची संकल्पना असल्याचे नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि क्रीडा व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने सी.बी.डी. बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा 2020 च्या उद्घाटनप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका श्रीम. अनिता मानवतकर, शिक्षण व क्रीडा सांस्कृतिक विभागाचे उपआयुक्त श्री.नितीन काळे, क्रीडा अधिकारी अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू श्रीम. अभिलाषा म्हात्रे व श्री. रेवप्पा गुरव, आंतरराष्ट्रीय खो-खो पट्टू महाराष्ट्राचा कर्णधार श्री. योगेश मोरे, विस्तार अधिकारी श्रीम. रुतिका संखे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 49 ऐरोली येथील विद्यार्थ्यांच्या सुरेल स्वागत गीताने प्रारंभ झालेल्या स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात ज्ञानपुष्प विद्यानिकेतन सी.बी.डी. बेलापूर येथील आर.एस.पी. विद्यार्थी तुकडीने शिस्तबध्द रितीने मार्चपास केले. शाळा क्र. 31 कोपरखैरणे येथील विद्यार्थ्यांनी 'सबसे आगे होगे हिंदूस्थानी' या गीताच्या धूनवर ह्युमन पिरॅमिड प्रात्यक्षिके करून स्वच्छता अभियानाचा झेंडा फडकवत 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' मध्ये नवी मुंबई महानगरपालिका अग्रस्थानी राहील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उप आयुक्त श्री. नितिन काळे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील 4 हजाराहून अधिक विद्यार्थी या महापालिका स्तरावरील आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असल्याचे सांगत खो-खो, कबड्डी व क्रिकेट या खेळांतील शालेय स्तरावरील संघांचे सामने केंद्रस्तरावर आयोजित करण्यात आले होते. त्यामधील 10 केंद्रांतून सर्वोत्कृष्ट विजेते संघ या महापालिका स्तरावरील क्रीडा महोत्सवात खेळत असल्याची माहिती दिली.
क्रीडा समिती सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी महानगरपालिका कटिबध्द असल्याचे सांगत यापुढील काळात अधिकाधिक चांगले उपक्रम समितीच्या माध्यमातून राबविण्यात येतील असे सांगितले.
घणसोली येथील नमुंमपा शाळा क्र. 105 आणि सेक्टर 4 नेरूळ येथील नमुंमपा शाळा क्र. 102 या दोन संघांमध्ये 17 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट सामन्याचा शुभारंभ महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते नाणेफेक करून करण्यात आला. क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे यांच्या समवेत सर्व खेळाडूंनी क्रीडा स्पर्धेची सामुहीक शपथ ग्रहण केली. अत्यंत उत्साहासत संपन्न झालेल्या या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 27 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी होणार आहे.
Published on : 23-01-2020 14:41:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update