श्री गणेश कला सर्कल करावे महापालिका क्षेत्रस्तरीय नवी मुंबई महापौर चषक ब्रास बँड स्पर्धेचे विजेते
स्पर्धा होतच राहतात मात्र अंतिमत: कलाच जिंकते त्यामुळे कलावंतांनी आपल्यात गुणात्मक वाढ करीत रहावी अशा शब्दात शुभेच्छा देत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांनी नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार हे पूर्वी एक उत्तम बँड वादक कलावंत असल्याने त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या स्पर्धेमुळे ब्रास बँड वादक कलाकारांना एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ येथील वंडर्स पार्कच्या ॲम्फीथिएटरमध्ये संपन्न झालेल्या महापालिका क्षेत्रस्तरीय नवी मुंबई महापौर चषक ब्रास बँड स्पर्धेच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी आमदार श्री. गणेश नाईक यांचे समवेत महापौर श्री. जयवंत सुतार, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका श्रीम. अनिता मानवतकर, श्री. विनोद म्हात्रे, श्री. विशाल डोळस, श्री. गणेश म्हात्रे, उपआयुक्त श्री. नितीन काळे, स्पर्धेचे 3 परीक्षक सुप्रसिध्द संगीतकार श्री. राहुल रानडे, वाद्यवृंद संयोजक श्री. सचिन भांगरे, संगीत विशारद श्री. प्रवीण कोळी, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व श्रीम. अभिलाषा म्हात्रे, श्री. राजेंद्र कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वत: ट्रम्पेट वाजवून ब्रास बँड स्पर्धेचा खरा शुभारंभ करीत महापौर श्री. जयवंत सुतार यांनी संगीत ही अजरामर गोष्ट असून संगीतामुळे व्यक्तिमत्व विकासासाठी होणारे फायदे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेने विविध कलांना प्रोत्साहन देतानाच बेलापूर पट्टीतील परंपरागत मात्र काहीशा उपेक्षित राहिलेल्या बँड वादनाच्या कलेलाही व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले असल्याचे सांगितले. स्वच्छतेत राज्यात अग्रणी व देशात सतत मानांकन उंचाविणारे शहराचे नागरिक म्हणून आपल्याला अभिमान आहेच, तो या स्पर्धेच्या माध्यमातून संगीतकलेला प्राधान्य देणारे शहर असा अधिक उंचावला जाईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आणि स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये ॲपवर सकारात्मक फीडबॅक देऊन तसेच स्वच्छता कार्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.
सभागृहनेते श्री. रविंद्र इथापे यांनी वंडर्स पार्क सारख्या निसर्गरम्य ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने रसिकांना सूरांची मेजवानी मिळत असल्याबद्दल स्थानिक नगरसेवक म्हणून संतोष व्यक्त केला.
सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापाती डॉ. जयाजी नाथ यांनी मागील वर्षी केवळ नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रापुरत्या मर्यादित असलेल्या या स्पर्धेला कलारसिकांचा मिळालेला उत्साही प्रतिसाद पाहता यावर्षी पहिल्या दिवशी नवी मुंबई क्षेत्र मर्यादीत व दुस-या दिवशी उर्वरित ठाणे, रायगड व मुंबई जिल्ह्यांतील बँड वादकांसाठी स्पर्धा आयोजित केल्याची माहिती दिली.
स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिध्द संगीतकार श्री. राहुल रानडे यांनी बँडवादन ही एकल नव्हे तर समुहाने सादर करण्याची कला असल्याचे सांगत सर्वच समुहांची सादरीकरणाची एकतानता लक्षवेधी होती अशा शब्दात कौतुक केले. दोनशेहून अधिक पट्टीचे वादक नवी मुंबईत आहेत हे शहराचे संगीतवैभव आहे असे सांगत त्यांनी कोणत्याही प्रकारची सूरांची पट्टी जोडीला नसताना केवळ डोक्यात सूर ठेवून अचूक वाजविणा-या सर्व वादकांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. शहराचे महापौर स्वत: वाद्य वाजवून सुरूवात करतात त्यामुळे मन आदराने व आपुलकीने भरून आल्याची भावनाही श्री. राहुल रानडे यांनी व्यक्त केली.
सहभागी 8 पथकांमधून श्री गणेश कला सर्कल करावे हे महापालिका क्षेत्रस्तरीय नवी मुंबई महापौर चषक ब्रास बँड स्पर्धा विजेतेपदाचे मानकरी झाले. यशवंत कला सर्कल सारसोळे हे व्दितीय तसेच सूर संगम ब्रास बँड कोपरखैरणे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विजेते ठरले. श्री साई ब्रास बँड दिवाळे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. श्री गणेश कला सर्कल करावे यांचा ट्रम्पेट समुह सर्वोत्कृष्ट ट्रम्पेट वादन, यशवंत कला सर्कल सारसोळे यांचा क्लारिओनेट वादकांचा समुह सर्वोत्कृष्ट क्लारिओनेट वादन त्याचप्रमाणे सूर संगम ब्रास बँड कोपरखैरणे यांचा सॅक्सोफोन आणि रिदम समुह सर्वोत्कृष्ट सॅक्सोफोन व रिदम वादन पारितोषिकाचे मानकरी ठरले. ब्रास बँडच्या माध्यमातून उमलणा-या गीतांच्या सूरावटींना दाद देण्यासाठी संगीत रसिकांनी ॲम्फिथिएटर भरून गेले होते.
Published on : 26-01-2020 09:34:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update