प्रजासत्ताकदिनानिमित्त महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ, स्थायी समिती सभापती श्री. नविन गवते, सभागृह नेता श्री. रविंद्र इथापे, अ प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. स्वप्ना गावडे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक श्री. अविनाश लाड, श्री. गिरीश म्हात्रे, श्रीम. सरोज पाटील, श्रीम. सलुजा सुतार, अतिरिक्त आयुक्त श्री. महावीर पेंढारी, ब प्रभाग समिती सदस्य श्री. विजय साळे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस व अग्निशमन पथके तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत महापौर श्री. जयवंत सुतार यांनी नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छतेमध्ये देशात अग्रभागी आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन करीत सर्वांनी ठरविले तर हे सहज शक्य आहे असा विश्वास व्यक्त केला. महात्मा गांधी यांचे 150 वे जयंती वर्ष आणि 73 व 74 व्या घटना दुरूस्तीचे 25 वे वर्ष साजरे होत असताना आजपासून 10 फेब्रुवारीपर्यंत लोकशाही पंधरवडा सुरू होत असून राज्यघटनेने आपल्याला दिलेला मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा आणि लोकशाही बळकट करावी असे आवाहन त्यांनी केले. विशेषत्वाने नुकतीच 18 वर्ष पूर्ण करणा-या तरूण पिढीला पहिल्यांदाच मतदानाचा हक्क मिळणार असून त्यांनी उत्साहाने मतदान करावे असे आवाहन महापौर महोदयांनी केले.
आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी लोकशाही, निवडणुका आणि सुशासन ही परस्परपूरक अशी त्रिसूत्री असून यामधून लोकशाही अधिकाधिक मजबूत होत असते असे सांगत प्रत्येक नागरिकाने निवडणूकीमध्ये मतदान करून आपला मतदानाचा हक्क अबाधित राखायला हवा व त्याकरिता इतरांनाही प्रोत्साहित करायला हवे असे आवाहन केले. प्रजासत्ताक दिनापासून सुरू होणा-या लोकशाही पंधरवड्यात मा.राज्य निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार विविध जनजागृतीपर उपक्रम महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सहभागी झाली असून आपले शहर देशात नंबर वन असावे हा आपला संकल्प आहे, त्यादृष्टीने शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत नियमित स्वच्छता राखण्याचा संदेश पोहचविण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यांना मिळणारा उत्साही प्रतिसाद सतत कायम रहावा असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यालयाप्रमाणेच महानगरपालिकेची विभाग कार्यालये, रुग्णालये याठिकाणीही महापालिका पदाधिकारी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी दैनंदिन स्वच्छतेचे काम उत्तम रितीने करणा-या श्री. चंद्रकांत कोळी, श्री.हनुमंत पाटील, श्री.गणेश मुंडे, श्री.प्रवीण राऊत, श्री. हितेश लोंढे, श्री. कमलाकर म्हात्रे, श्री. अनिल पाटील, श्री. कुंदन म्हात्रे, श्री. बालाजी माने या कामगारांना प्रातिनिधीक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 25 ते 27 जानेवारी या काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयकॉनिक मुख्यालयास तिरंगी रंगाची आकर्षक रोषणाई करण्यात आली असून मुख्यालय इमारतीसोबत तसेच 225 फूट उंच प्रतिकात्मक राष्ट्रध्वजस्तंभासोबत सेल्फी छायाचित्रे काढण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
Published on : 26-01-2020 09:44:47,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update