महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी सादर केले स्थायी समितीस जमा व खर्चाचे सन 2019-20 चे सुधारित व सन 2020-21 चे मूळ अंदाज
नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2019-20 चा सुधारित आणि सन 2020-21 चे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी स्थायी समितीपुढे सभापती श्री. नविन गवते यांच्याकडे सादर केले. याप्रसंगी सर्व समिती सदस्य आणि अंदाजपत्रक निर्मितीत महत्वाची भूमिका असणारे महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड उपस्थित होते.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 95 नुसार सदर जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु. 1905.69 कोटी व रु. 2369.62 कोटी जमेचे आणि रु.3057.54 कोटी खर्चाचे सन 2019-20 चे सुधारित अंदाज, तसेच रु. 1217.76 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु. 3850 कोटी जमा व रु. 3848.91 कोटी खर्चाचे आणि रु.1.09 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2020-21 चे मूळ अंदाज मा. स्थायी समितीच्या समोर सादर करण्यात आले.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचेही अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महापालिका आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांचे निवेदनातील महत्वाचे मुद्दे –
³ मालमत्ता कर :- माहे नोव्हेंबर 2019 अखेर रू. 251.77 कोटी मालमत्ता कराची वसूली करण्यात आलेली आहे व मार्च-2020 अखेर रु. 700 कोटी वसूली होईल अशी अपेक्षा आहे. तसेच सन 2020-21 या वर्षामध्ये रु. 630 कोटी जमा होईल असा अंदाज आहे. शासन मान्यतेने मालमत्ताकर अभय योजना लागू करण्यात आली असून जानेवारी 2020 अखेरपर्यत रु.171 कोटी एवढा मालमत्ता कर, अभय योजनेअंतर्गत वसूल करण्यात आलेला आहे.
- स्थानिक संस्था कर :- प्रलंबित कर निर्धारणा व प्रलंबित वसूलीव्दारे उत्पन्न, शासनाचे सहाय्यकअनुदान व मुद्रांक शुल्क अनुदान मिळून एकत्रित सन 2020-21 करिता रू.1250 कोटी उद्दिष्ट प्रस्तावित करण्यात येत आहे.
- नगररचना विभाग :- नगररचना विभागाकडून माहे नोहेंबर 2019 अखेर रु. 63.65 कोटी ची वसूली करण्यात आलेली असून मार्च 2020 अखेर रु. 100 कोटी इतकी वसूली होईल अशी अपेक्षा आहे. तसेच सन 2020-21 या वर्षामध्ये रु. 125 कोटी जमा होईल असा अंदाज आहे.
- मालमत्ता विभाग :- सन 2020-21 या वर्षामध्ये मालमत्ता विभागाकडून रु. 80.41 कोटी जमा होईल असा अंदाज आहे. त्यामध्ये घणसोली नोड हस्तांतरण शुल्कापोटी येणारी रक्कम रू. 76 कोटी अंदाजित केली आहे.
भूखंड हस्तांतरण - सिडकोकडून विविध नागरी सुविधांचे 554 भूखंड हस्तांतरीत झालेले असून आणखी 520 भूखंडांची मागणी सिडकोकडे करण्यात आलेली आहे.
एम.आय.डी.सी. कडून महानगरपालिकेस विविध नागरी सुविधांचे एकूण 61 भूखंड हस्तांतरीत झालेले असून 233 भूखंडांची मागणी करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाकरीता 99.08 एकर जमीन हस्तांतरीत झालेली आहे. त्यापोटी जमिनीच्या कब्जे हक्काची रक्कम रु.216.35 कोटी महानगरपालिकेने शासनास अदा करणेबाबत शासनाची मागणी आहे. यामुळे घनकचरा व्यवस्थापनाची दूरगामी व्यवस्था कार्यन्वित करणे शक्य होणार आहे.
सर्वसमावेशक वाहनतळ धोरण (स्मार्ट पार्किंग पॉलिसी) :- शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करीत असून यावरील उपाययोजनांच्या अनुषंगाने सर्वसमावेशक "स्मार्ट पार्किंग पॉलिसी" तयार करण्याचे व "सर्वसमावेशक वाहनतळांचे नियोजन" करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. यामध्ये वाहनतळाच्या जागा विकसीत करण्यावर भर देणे, निधीची उपलब्धता व पार्किंगची गरज याचा विचार करुन शक्य तेथे बहुमजली पार्किंग व्यवस्था करणे, नागरिकांना शहरामध्ये प्रवेश करतांना किंवा अंतर्गतरित्या पार्कींगसाठी कुठे जागा उपलब्ध आहेत याची माहिती सहजपणे ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी मोबाईल ॲप विकसित करणे अशा विविध बाबींचा समावेश आहे.
दिव्यांग स्टॉल :- दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी 103 दिव्यांगांना, अत्यल्प शुल्क आकारुन जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय, दिव्यांगांमार्फत प्राप्त 714 अर्जांची "प्रतिक्षा यादी" तयार करून सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आलेली आहे.
बहुउद्देशीय इमारत विनियोग :- बेलापूर, नेरुळ, जुईपाडा, कोपरखैरणे, ऐरोली या 5 ठिकाणी बहुउद्देशीय इमारतींमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध कार्यक्रमांकरीता अत्यंत सवलतीच्या दरात जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या सुविधेमुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर सोय झाली असल्याने यास मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
जन सायकल सहभाग प्रणाली (Public Bicycle Sharing System) :- पर्यावरणपूरक शहराची संकल्पना राबविण्यासाठी M/s.YULU BIKES PVT. LTD. या संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या “जन सायकल सहभाग प्रणाली (Public Bicycle Sharing System) व इलेक्ट्रीक बाईक प्रणाली” यांस नवी मुंबईकर नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. यामधून 38,61,07,732 इतके ग्रॅम कार्बन क्रेडीट मिळालेले आहे. जन सायकल प्रणालीव्दारे सायकलचा वापर करणारे नवी मुंबई हे भारतातील सर्वात जास्त प्रतिसाद देणारे शहर ठरले आहे.
नौका विहार :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये मनोरंजनाची स्थळे निर्माण व्हावीत व पर्यटनाला चालना मिळावी याकरिता वाशी सेक्टर 10 ए येथील मिनी सी शोअर, कोपरखैरणे सेक्टर 19 येथील श्री गणेश विर्सजन तलाव आणि दिघा येथील खोकड तलाव यामध्ये नौकाविहाराची सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत या 3 तलावांमध्ये 1,00,300 एवढे नागरिक व त्यांच्या कुटुंबियानी नौकाविहाराचा आनंद लुटलेला आहे. नेरुळ से-26 येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई धारण तलावामध्ये नौकाविहार सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.
मार्केट :- महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागांमध्ये भाजी व मासळी मार्केटची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून यामुळे शहराच्या सुनियोजितेत भर पडलेली असून यामुळे फेरीवाल्यांवर नियंत्रण राहून नागरिकांचीही सोय झाली आहे.
- परवाना विभाग:- परवाना विभागामार्फत सन2019-20 मध्ये नोव्हेंबर 2019 पर्यत रु. 5.30 कोटी इतका महसूल प्राप्त झाला आहे, व मार्च 2020 अखेर रु. 6.45 कोटी महसूल प्राप्त होणे अंदाजित आहे.
ऑनलाईन परवाना :- ई गव्हर्नन्सव्दारे नागरिकांना सहज, सुलभ व गतीमान सेवा पुरविण्याच्या महानगरपालिकेच्या धोरणानुसार, विविध परवाने / परवानगी पारदर्शकरित्या ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अशाप्रकारे ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महानगरपालिका आहे.
जाहिरात व आकाशचिन्ह परवाना :- शहर सौंदर्यीकरणाच्या तसेच महानगरपालिकेस भरीव उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक खाजगी सहभाग (PPP) तत्त्वावर विविध जाहिरात माध्यमे (होर्डींग) उभारणे, नमुंमपा क्षेत्रातील एकूण 3824 विद्युत खांबांवर जाहिरात लावणे, 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सामुदायिक / सार्वजनिक शौचालयांच्या भिंतीवर जाहिरात करणे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या 154 बसथांब्यांवरील जाहिरातींचे हक्क देणे, महापे उड्डाणपूल पॅनलवर जाहिरात करणे अशा ठेक्यांपासून 7 वर्षांच्या कालावधीत महानगरपालिकेस एकूण रक्कम रू.57.08 कोटी एवढे भरीव उत्पन्न प्राप्त होणार असून माहे नोव्हेंबर 2019 पर्यंत रु.3.83 कोटी इतके उत्पन्न प्राप्त झालेले आहे.
फेरीवाला परवाना :- पदपथावरील विक्रेते (उपजिविका संरक्षण व पदपथावरील विक्री विनियम) अधिनियम 2014 ला अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिकेने राज्यात प्रथमच बायोमॅट्रिक पद्धतीने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण दोन फे-यांमध्ये पूर्ण केले आहे. महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या आधार क्रमांकाशी निगडीत ॲपचा वापर करुन हे सर्वेक्षण पूर्ण करणारी नवी मुंबई महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.
विनापरवाना व्यवसायांना परवाना कक्षेत समाविष्ट करण्यासाठी नोटीस बजाविणे, व्यवसायाच्या जागेचा वापर थांबविणे अशा उपायांचा सदयस्थितीत अवलंब करण्यात येत आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतूदीनुसार नोटीस बजावल्याच्या दिनांकापासून व्यवसाय सुरु असल्याच्या कालावधीसाठी प्रतिदिन दंडात्मक शुल्क आकारण्याबाबत धोरणात्मक निर्णय प्रस्तावित असून त्याव्दारे महानगरपालिकेस भरीव उत्पन्न प्राप्त होणे अपेक्षित आहे.
³ पाणीपुरवठा :-
स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण जलसमृध्द शहर ही नवी मुंबईची ओळख असून नागरिकांना समाधानकारक पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या पुरविण्यात येणा-या पाण्यावर अत्यंत कमी पाणीपट्टी आकारण्यात येते. त्यानुसार पाणीपट्टीपोटी सन 2018-19 मध्ये रु.105.24 कोटी इतकी जमा व रु.119.58 कोटी इतका खर्च झाला आहे. पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेच्या जमा-खर्चाचा विचार करता गतवर्षात रु.14.34 कोटी एवढी तूट झालेली आहे. तथापि शासन निर्देशानुसार पाणीपुरवठा व्यवस्थेचा खर्च हा 100% पाणीपट्टी इ. उत्पन्नातून करणे आवश्यक आहे. शिवाय नागरिकांना इतर दर्जेदार सोयी सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक निधीची पूर्तताही अशा पाणीपट्टी व इतर कर दरवाढीतून करण्याचे विचाराधीन असून पाणीपट्टीचे दर सुरळीत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
सन 2019-20 मध्ये रु. 86.07 कोटी जमा होतील अशी अपेक्षा आहे व सन 2020-21 मध्ये रक्कम रु. 115.59 कोटींचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे.
³ प्रशासन विभाग :-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी/ कर्मचारी यांना “महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019” हा नियम शासनाच्या धर्तीवर दिनांक 1 जानेवारी 2016 पासून लागू करणेबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे. शासन मान्यता प्राप्त झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. त्यानुसार होणा-या वाढीव खर्चाची तरतूद सन 2020-21 च्या अंदाजात करण्यात आलेली आहे.
महानगरपालिका अधिकारी/ कर्मचारी यांच्या कामात गती यावी व नियमानुसार कुशलतेने कामकाज व्हावे याकरीता अधिकारी/कर्मचारी यांच्या कार्यक्षमता वृध्दीच्या दृष्टीने विविध विषयांवरील प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.
****************************************************************************************
l खर्चाच्या बाबी l
³ महानगरपालिकेस प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून दर्जेदार नागरी सेवा, सुविधा पुरविताना शहरातील लहान मुले, विद्यार्थी, तरूण, प्रौढ, ज्येष्ठ नागरिक, महिला, सर्वसामान्य घटक व मागासवर्गीय घटक अशा समाजातील सर्व वर्गांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत खर्चाच्या बाबींचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेला आहे.
- अभियांत्रिकी :-
- रस्ते, पदपथ व गटारे :- रस्ते हा शहराचा आरसा असतात हे लक्षात घेऊन प्रामुख्याने शहरातील सर्वात वर्दळीचा व मध्यवर्ती अशा ठाणे - बेलापूर मार्गाची अत्याधुनिक साधने व साहित्याचा वापर करून शाश्वत सुधारणा करण्याचे नियोजन आहे.
अशाचप्रकारे नवी मुंबईचा “क्वीन नेकलेस” म्हणून सुपरिचीत अशा पामबीच मार्गावर मिसींग लिंक प्रस्तावित आहे.
नवी मुंबई शहर खड्डेमुक्त राहण्यासाठी दर्जेदार रस्ते बनविणे तसेच मूळ गांवठाणांमधील रस्त्यांचे टी.डब्ल्यू.टी. पध्दतीने क्राँक्रिटीकरण करण्याकरिता अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.
त्यासोबतच शहरातील पदपथ हे स्टँम्प क्राँक्रिटने बनविणे तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य रितीने होण्याकरिता गटारांची सुधारणा करण्याचा मानस असून त्याकरिता आवश्यक तरतूद करण्यात आलेली आहे.
याशिवाय औद्योगिक क्षेत्रात सेवासुविधा पुरविण्याच्या दृष्टीने टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील 15 कि.मी. रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण करण्यात येत असून त्याकरीता भरीव तरतूद करण्यात आली आहे.
- उड्डाणपूल :- शहर गतीमानतेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करीत वाशी से.17 येथे महात्मा फुले चौक ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत उन्नत मार्ग बांधणे, घणसोली ते ऐरोली पामबीच रस्त्यावर पूल बांधणे, आग्रोळी तलाव ते कोकण भवन येथे उड्डाणपूल बांधणे व शहरातील आवश्यक ठिकाणी पादचारी पूल व भुयारी मार्ग बांधण्याकरीता भरीव तरतूद करण्यात आली आहे.
- सायन्स पार्क :- अभिनव 'सायन्स पार्क' उभारण्याचे नियोजन नेरुळ से.19 ए, मध्ये वंडर्स पार्क येथील50 एकर क्षेत्रात करण्यात आले आहे. या प्रकल्पाकरिता रु. 87.26 कोटी इतका खर्च अपेक्षित असून याकरिता भरीव तरतूद करण्यात आली आहे.
- अद्ययावत क्रीडा संकुल :- नवी मुंबई शहराच्या क्रीडा विकासासाठी घणसोली भूखंड क्र. 1, से. 13 येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.
- मैदाने विकास :- नवी मुंबईतील मुले आणि युवक यांच्यामधील क्रीडा गुणवत्तेला वाव देण्यासाठी विविध विभागांमधील मैदानांच्या विकासाप्रमाणेच नेरुळ से.19 येथील यशवंतराव चव्हाण मैदानामध्ये विविध खेळ खेळण्यासाठी लॉन टेनिस, मल्टी स्पोर्टस् कोर्ट, कबड्डी, व्हॉलीबॉल व क्रिकेट अशा सुविधा विकसित करणे प्रस्तावित आहे.
- तरणतलाव :- महापालिका क्षेत्रात वाशी से.12 येथे ऑलिंपिक आकाराच्या (50 मी x 25 मी) तरण तलावासह अद्ययावत आंतरक्रीडा संकुल बांधण्याचे काम निविदा प्रक्रियेत आहे. या कामाकरिता रु. 124.73 कोटी खर्च अपेक्षित आहे.
- पावसाळी नाल्यांची सुधारणा व सुशोभिकरण :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पर्जन्य जलवाहिनी प्रणालीचे नुतनीकरण करुन त्याचे सुशोभिकरण करण्याचे नियोजन असून त्याकरीता तरतूद करण्यात आलेली आहे.
- पशुवधगृह (Slaughter House) :- नागरिकांची गरज लक्षात घेऊन नेरुळ येथील टी.टी.सी.औद्योगिक क्षेत्रामध्ये पशुवधगृह (Slaughter House) बांधण्याचे नियोजन असून त्याकरीता तरतूद करण्यात आलेली आहे.
- प्रवेशव्दारे :- नवी मुंबई शहराच्या हद्दींमध्ये प्रवेश करण्याच्या ठिकाणी शहराच्या लौकिकाला साजेशी आकर्षक रचनेची प्रवेशव्दारे उभारण्याचे नियोजन आहे व त्याकरीता तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे येथील 29 मूळ गावांची ओळख अधोरेखित होण्यासाठी गावांठिकाणी प्रवेशव्दारे उभारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.
- शाळा इमारती :- गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कास धरत आवश्यक त्याठिकाणी शाळा इमारती बांधणे तसेच वाढीव वर्गखोल्या बांधण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
- बायोगॅस युनिट :- ऐरोली प्रभाग क्र.7, चिंचपाडा येथे खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम 2015-16 अंतर्गत घनकचरा, सांडपाणी व इतर टाकाऊ वस्तूंच्या वापरातून सामुहिक बायोगॅस युनिट बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या युनिटमधून साधारणत: 400 m3 बायोगॅस निर्मिती होणे अपेक्षित असून याव्दारे साधारणत: 500 KWH एवढी वीज निर्मिती होऊन ती परिसरातील रस्त्यांवरील पथ दिव्यांसाठी वापरता येईल.
- सायकल ट्रॅक :- पर्यावरणशील इंधनरहित वाहन असलेल्या सायकलला प्राधान्य देण्यासाठी पामबीच मार्गालगत सायकल ट्रॅक बनविणे तसेच जागेची उपलब्धता व त्याठिकाणची आवश्यकता यानुसार इतर ठिकाणीसुध्दा सायकल ट्रॅक बनविण्याचे नियोजन करण्याकरीता तरतूद करण्यात आली आहे.
- दिवाबत्ती व पथसंकेत :- नवी मुंबई शहरातील सिडकोकालीन जुने विद्युत खांब बदलणे व वाहतुक पोलीस विभागाच्या अभिप्रायानुसार आवश्यक त्या ठिकाणी पथसंकेत बसविणे आणि त्यात सुधारणा करणे प्रस्तावित असून त्याकरीता तरतूद करण्यात आली आहे.
- प्रशासकीय इमारती :- विभाग कार्यालयांच्या इमारती अद्ययावत करण्याकरीता तसेच मुख्यालयात सर्व आवश्यक सुविधायुक्त आपत्कालीन कक्ष निर्माण करण्याकरीता अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.
- समाजमंदिर :- बेलापूर विभागातील से.8 बी, भू.क्र.20 सी येथे नागरिकांच्या विविध कार्यक्रमांसाठी प्रशस्त समाजमंदिर बांधण्याचे काम निविदा प्रकियेत असून हे काम येत्या आर्थिक वर्षात पूर्ण होणार आहे.
- मध्यवर्ती ग्रंथालय:- वाचनसंस्कृतीच्या वाढीसाठी तुर्भे विभागातील सानपाडा सेक्टर 11, भूखंड क्र. 1 येथे मध्यवर्ती ग्रंथालय बांधणे कामाकरिता तरतूद करण्यात आली आहे.
- वाहनतळ विकास :- नवी मुंबई शहरात वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन पार्कींगचे नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विविध ठिकाणी वाहनतळांच्या जागांचा विकास करणे, मोठ्या रस्त्यांवरील रहदारीचे सर्वेक्षण करून वाहतुकीला अडथळा होऊ न देता त्याठिकाणी लेनमार्कींग करुन पार्कींगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे विविध विभागांमध्ये वाहनतळांसाठी उपलब्ध झालेल्या भूखंडांवर वाहनतळ विकसित करण्याचे नियोजन असून त्याकरीता आवश्यक तरतूद करण्यात आली आहे.
- वृध्दाश्रम :- ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव व आपुलकीची भूमिका जपत नेरूळ से.38 मध्ये भू.क्र.13 येथे वृध्दाश्रम बांधणे प्रस्तावित आहे.
- मार्केट :- नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी उपलब्ध झालेल्या भूखंडांवर मार्केट विकसित करण्याचे नियोजन असून त्याव्दारे फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लागेल व नागरिकांचीही उत्तम सोय होईल. त्याकरीता तरतूद करण्यात आली आहे.
- तलाव सुशोभिकरण:- नवी मुंबईतील तलावांची सुशोभिकरण कामे हाती घेण्यात येत असून नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून तलावांचा विकास करण्याची कार्यवाही करण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे तलाव आणि जलाशय यांची नियमित स्वच्छता राखण्याकडेही विशेष लक्ष देण्यात येईल.
- शहर सुशोभिकरण :- नवी मुंबई शहराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडावी यादृष्टीने अंतर्गत भागात विविध ठिकाणी चौक/मोकळया जागांचे सुशोभिकरण करणे, आकर्षक शिल्पे उभारणे, नयनरम्य कारंजी बसविणे याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
- पाणीपुरवठा :-
- मोरबे धरणाव्दारे जलसमृध्द असलेल्या नवी मुंबई शहरासाठी दूरगामी विचार करून पाण्याचे स्त्रोत वाढविण्याचा मानस आहे. त्याचप्रमाणे आवश्यकता लक्षात घेऊन जुन्या झालेल्या सिडकोकालीन भूमिगत तसेच उच्चस्तरीय जलकुंभांची पुनर्बांधणी करण्याचे नियोजन आहे. पारसिक हिल ते महापे पर्यंत एक्सप्रेस फिडर पाईपलाईन टाकणे, सिडकोकालीन कळंबोली ते ऐराली जुनी जलवाहिनी बदलणे तसेच मूळ गावठाणे व झोपडपट्टी भागात जलवाहिनी टाकण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- मलनि:स्सारण :-
- नवी मुंबई महानगरपालिकेतील मूळ गावांमध्ये उर्वरित ठिकाणी मलनि:स्सारण वाहिनी टाकणे त्याचप्रमाणे झोपडपट्टी क्षेत्रात मलनि:स्सारण वाहिनी टाकणे तसेच पॅकेज ट्रिटमेंट प्लान्ट बांधणे त्याकरीता तरतूद करण्यात आली आहे.
- प्रक्रियाकृत सांडपाणी पुनर्वापर :- नवी मुंबई शहरातील मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याकरीता पायाभूत सुविधा निर्माण करुन उद्याने, सार्वजनिक शौचालये, रस्ते दुभाजकांमधील व इतर सुशोभीत जागा यांना पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी पुरविण्याचे नियोजन असून त्याव्दारे पिण्याच्या पाण्याचीही बचत होण्याचा हेतू साध्य होणार आहे.
- टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट :- केंद्र / राज्य शासनाच्या अमृत मिशन प्रकल्पांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोपरखैरणे व ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी 20 द.ल.लि. क्षमतेचे टर्शिअरी ट्रिटमेंट (Teritiary Treatment) प्लान्ट बांधणे, त्यांची सर्वसमावेशक देखभाल-दुरुस्ती करणे व चालविणे तसेच पुनर्प्रक्रियायुक्त सांडपाणी टी.टी.सी. औद्योगिक क्षेत्रात (वाशी,कोपरखैरणे,ऐरोली) औद्योगिक संस्थाना पुरविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
- क्षेपणभूमी :-
- तुर्भे येथील शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी अत्याधुनिक पध्दतीचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून त्याकरीता आवश्यक तरतूद करण्यात आलेली आहे.
- शहरातील बांधकामातून व पाडकामातून निघालेल्या साहित्याची योग्य विल्हेवाट लावण्याकरीता धोरण ठरविणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन तशा प्रकारचा सर्वसमावेशक प्रस्ताव मा. सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्याचे प्रस्तावित आहे.
- C&D waste प्रक्रिया प्रकल्प - आपापल्या क्षेत्रातील बांधकाम आणि पाडकामाचा कचरा विल्हेवाट लावणे सर्व स्थानिक संस्थांना बंधनकारक असून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत याविषयी सकारात्मक पाऊल उचलत तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळी 150 MT क्षमतेचा बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प (C&D waste) उभारणे व त्याची 5 वर्ष देखभाल व दुरूस्ती करणे हे काम पूर्ण झाले आहे. त्यापासून उपलब्ध होणारी खडी व रेती ही महानगरपालिकेमार्फत पदपथ, गटारे, रस्ते बांधकाम करण्याकरिता वापरता येईल व Sludge पासून विटा तयार करण्याचे नियोजन आहे. रेती व खडी यांचा पुनर्वापरामुळे पर्यावरणाचा होणारा –हास टळेल.
Ø तुर्भे क्षेपणभूमी येथे MSW Rule 2016 प्रमाणे सातवा सेल विकसित करण्याचे काम निविदा प्रक्रियेत आहे.
Ø ॲनारोबीक डायजेस्टर पध्दतीने बायोगॅस पासून वीज निर्मिती करणे प्रस्तावित आहे. सदर कामामध्ये नवी मुबई महानगरपालिका क्षेत्रात निर्माण झालेला व वर्गीकरण केलेला ओला कचरा तसेच हॉटेल व इतर व्यापारी आस्थापनांतून मिळणारा ओला कचरा व मलनि:स्सारण केंद्रात निर्माण होणारा मैला (SLUDGE) एकत्रितपणे प्रक्रिया करण्याकरीता 50 टन क्षमतेची दोन प्रक्रिया केंद्र तुर्भे व कोपरखैरणे येथील मलनि:स्सारण प्रक्रिया केंद्रात उभारणे प्रस्तावित आहे.
Ø नवी मुंबई क्षेत्रात निर्माण होणा-या घनकच-याचे यांत्रिकी पध्दतीने Material Recovery Facility (MRF) वर्गीकरण करणे प्रस्तावित आहे.
- पर्यावरण :-
- सुनियोजित शहराप्रमाणेच पर्यावरणशील शहर ही नवी मुंबईची ओळख दृढ होण्यासाठी नियोजनबध्द काम करण्यात येत असून महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागांत हवामान मापन यंत्रणा (Air Monitoring system) उभारणे प्रस्तावित आहे. नवी मुंबई शहरातील प्रदूषण, वातावरण बदल व बदलती पर्जन्य स्थिती या विविध परिमाणांच्या मापनाची गरज वेळोवेळी लागत असते. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक नोडमध्ये एक हवा मापन यंत्र उभारणे प्रस्तावित असून त्याकरिता 16.84 कोटी खर्च अपेक्षित आहे. नागरी मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येकी 5 चौ.कि.मी. ला 1 याप्रमाणे शहरात पर्जन्य मापन यंत्रणा उभारणे प्रस्तावित आहे.
- 'इको सिटी' प्रकल्पांतर्गत रेल्वे स्थानकापासून विविध भागात बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्याचे नियोजन असून शहरात ठिकठिकाणी चार्जींग स्टेशन्स उभारणे प्रस्तावित आहे.
- बेलापूर येथे नवीन अत्याधुनिक साधनसामुग्रीने सुसज्ज पर्यावरण प्रयोगशाळा उभारण्याचे नियोजित आहे.
- माहिती तंत्रज्ञान / संगणक -
विविध विभागांच्या दैनंदिन कामकाजाकरिता इन्टिग्रेटेड इंटरप्राईज सोल्युशन प्रणाली :- जनतेच्या वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम, समयोचित, तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीतील ई-गव्हर्नन्स प्रणालीमध्ये बदलते तंत्रज्ञान लक्षात घेऊन सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा जास्तीत जास्त वापर करून प्रस्तावित करण्यात येणारी ठळक वैशिष्ट्ये -
- महापालिकेच्या दैनंदिन कामकाजाची गती वाढविणे व कार्यपध्दतीमध्ये पारदर्शकता आणणे.
- नागरिकांना कमीत कमी क्लिकवर सेवा उपलब्ध होतील याबाबत कार्यवाही करणे.
- सर्व माहिती सॉफ्टवेअरव्दारे कायमस्वरुपी उपलब्ध करून देणे.
- कॅशलेस व्यवहार वाढविणे.
- नागरिकांना कार्यालयात यावे न लागता त्यांची महानगरपालिकेशी संबंधित कामे विनासायास ऑनलाईन होणे.
- वेळेची व कागदाची बचत करून सुलभ व्यवसायाकरिता उपयुक्त यंत्रणा राबविणे.
- सर्व प्रणाली एकत्रित असणे.
- सर्व संगणक प्रणालीमध्ये भक्कम अशी सुरक्षा यंत्रणा वाढविणे.
- क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करणे.
- ५ वर्षे देखभाल व दुरूस्तीसह नमुंमपातील विविध विभागांच्या दैनंदिन कामाकाजाकरिता इन्टेग्रेटेड इंटरप्राईज सोल्युशन विकसित करणे. याकरिता रक्कम रु. 22.63 कोटी इतका अंदाजित खर्च अपेक्षित आहे.
- शहर सुरक्षेच्या दृष्टीने सी.सी.टि.व्ही. यंत्रणा सक्षमीकरण :-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये Surveillance करिता 954 हाय डेफिनेशन कॅमेरे, 396 पीटीझेड कॅमेरे, वाहनांची गती देखरेखीकरिता 80 स्पीडींग कॅमेरे, खाडी व समुद्र किनारे या ठिकाणांवर देखरेखीकरिता 9 थर्मल कॅमेरे, 43 ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स सुविधा, सार्वजनिक घोषणेकरिता 126 ठिकाणी Public Announcement System व्यवस्था, 59 ठिकाणी डायनामिक मेसेजिंग साईनचा वापर तसेच स्वयंचलित क्रमांक प्लेट ओळख (एएनपीआर), Automatic number plate Recognition / लायसन्स प्लेट कॅपचरिंग, व्हिडीओ सर्व्हिलन्स मॅनेजर, कमांड कंट्रोल संगणक प्रणाली, डेटा सेंटर, ५ वर्ष देखभाल व दुरूस्ती, अशाप्रकारे सी.सी.टि.व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता एकूण रू. 154.34 कोटी खर्च अपेक्षित आहे या कामांकरिता अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
- घनकचरा व्यवस्थापन विभाग :-
- “स्वच्छ सर्वेक्षण-2019” मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस “नागरिक प्रतिसाद (Citizen Feedback)” क्षेत्रात देशातील सर्वोत्तम शहराचा बहुमान प्राप्त झाला असून, स्वच्छ शहरांच्या तालिकेमध्ये देशात सातवा क्रमांक व महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे.
- नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मोठया गृहनिर्माण संस्था, हॉटेल, वाणिज्य संकुले, शैक्षणिक संस्था, औदयोगिक क्षेत्र इत्यादींमध्ये कचरा वर्गीकरण करण्यात येत असून वर्गीकृत केलेला ओला व सुका कचरा वेगवेगळया वाहनांमार्फत क्षेपणभूमीवर नेण्यात येत आहे.
- घरगुती घातक कचरा:- हिरव्या व निळया कचराकुंडी सोबतच घरगुती घातक कचरा (Hazardous waste) गोळा करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांना लाल रंगाच्या कचराकुंडया पुरविण्यात येत असून, या घातक कचऱ्याचे संकलन करुन, त्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया केली जाणार आहे.
- कार्यक्षेत्रातील लहान सोसायट्यांनी व सदनिकांमधील नागरिकांनीही खत टोपली (Compost Basket) वापरुन घरातील ओल्या कचऱ्याचे खतामध्ये रुपांतर करुन, दैनंदिन कचऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
- महानगरपालिका कार्यक्षेत्रातील चारपदरी तसेच मोठया रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने व्यवस्थितपणे साफसफाई करण्यासाठी नवीन 8 अत्याधुनिक वाहने तसेच दिशादर्शक फलक, बसथांबे साफ ठेवण्यासाठी 2 वॉशर घेण्याचे प्रस्तावित असून, त्याद्वारे प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे.
- घनकचरा व्यवस्थापन विभागात कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगार व अधिकारी/कर्मचारी यांच्यावर प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी Geo Fencing व Tracking प्रणाली (घडयाळ) राबविण्यास सुरवात करण्यात आली असून, याव्दारे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ झालेली आहे.
- शून्य कचरा झोपडपट्टी संकल्पना :- दैनंदिन वर्गीकृत कचरा संकलन करुन, या कचऱ्यावर त्याच कार्यक्षेत्रात प्रक्रिया करण्यासाठी “शून्य कचरा झोपडपट्टी मॉडेल” ही अभिनव संकल्पना नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सद्यस्थितीत तीन ठिकाणी राबविण्यात येत असून, टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व झोपडपट्टयांमध्ये ही संकल्पना राबविण्याचे प्रस्तावित आहे. सदर सं?
Published on : 18-02-2020 13:17:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update