आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश
गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देत नवी मुंबई महानगरपालिका 55 प्राथमिक आणि 19 माध्यमिक शाळांच्या माध्यमातून साधारणत: 40 हजार विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा पुरवित आहे. यामध्ये एका शाळेतील काही विद्यार्थीनींशी सी.एस.आर. फंडातून कार्यान्वीत असलेल्या संगणक प्रयोगशाळेतील संस्थेमार्फत नियुक्त संगणक प्रशिक्षक लोचन परुळेकर याने गैरवर्तणुक केल्याने त्याच्यावर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आल्याचे वृत्त काही वृत्तपत्रात व वृत्तचित्रवाहिन्यांवर प्रसिध्द झाले आहे. याबाबतची वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका शाळेत नामांकीत उद्योग समुहाच्या सी.एस.आऱ. फंडातून संगणक प्रयोगशाळा चालविली जाते. येथे उद्योग समुहामार्फत वात्सल्य ट्रस्ट सानपाडा यांच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षक म्हणून लोचन परूळेकर याची नियुक्ती संस्थेमार्फत करण्यात आली होती. हा प्रशिक्षक महानगरपालिकेचा कर्मचारी नसून त्याचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.
हा संगणक प्रशिक्षक विद्यार्थीनींशी गैरवर्तणूक करीत असल्याचे त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महानगरपालिका शिक्षण विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि त्यास अनुसरून ज्या संस्थेमार्फत या प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात आली होती त्या संस्थेस संबंधित संगणक प्रशिक्षकास त्वरीत बडतर्फ करण्यात येऊन त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करणेबाबत पत्राने लेखी कळविण्यात आले होते. त्यास अनुसरून तुर्भे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वांगीण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही आवश्यक काळजी घेण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सी.सी.टि.व्ही. कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून निविदेचे काम अंतिम टप्यात आहे. याशिवाय मुलांमध्ये वाढत्या वयात जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र भूषण डॉ. राणी बंग यांची 'तारुण्यभान' या विषयावर मार्गदर्शन सत्रे आयोजन करण्यात आली होती. त्याचप्रमाणे महापालिका शाळेतील विद्यार्थिनींसाठी 'अभया' या नाटकाचा विशेष प्रयोगही आयोजित करण्यात आला होता. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग विविध उपक्रमांचे आयोजन करीत असतो.
त्या अनुषंगाने सदर निंदनीय घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता व निकोप शैक्षणिक वातावरण कायम राखण्यासाठी काटेकोर कार्यवाही करण्याचे तसेच यापुढील काळात सी.एस.आर.फंडातून सुविधा पुरविताना त्यामध्ये संस्थेमार्फत नेमणूक करण्यात येणा-या कर्मचा-यांचीही पोलीस विभागामार्फत चारित्र्य पडताळणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी शिक्षण विभागाला दिलेले आहेत.
Published on : 28-02-2020 16:16:11,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update