नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेत रेकॉर्डब्रेक सहभाग
नवी मुंबई महानगरपालिका राबवित असलेल्या विविध उपक्रमांमध्ये दरवर्षी वाढता सहभाग असून यावर्षीच्या नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेत नवी मुंबईसह संपूर्ण जिल्ह्यातील 360 हून अधिक जलतरणपटूंनी उत्साही सहभाग घेत जिल्हास्तरीय सहभागाचा विक्रम नोंदविल्याबद्दल नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी सहभागी जलतरणपट्टूंचे अभिनंदन केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशीतील एन.एम.एस.ए. स्पोर्ट्स असोसिएशनच्या तरण तलावामध्ये आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी महापौरांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, ठाणे जिल्हा जलतरण संघटक व राष्ट्रीय प्रशिक्षक, पंच श्री. संतोष पाटील, महाराष्ट्र राज्य जलतरण असो. सचिव श्री. किशोर शेट्टी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जलतरणपटू श्री. गोकुळ कामथ, जलतरण प्रशिक्षक श्री. संकेत सावंत, सागरकन्या श्रीम. रूपाली रेपाळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी साधारणत: जिल्हास्तरीय स्पर्धेत दोनशे ते अडीचशे पर्यंत जलतरणपटू सहभागी होतात मात्र नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेत यावर्षी 360 हून अधिक जलतरणपटूंनी सहभाग घेत रेकॉर्डब्रेक उपस्थिती दर्शविली त्याबद्दल कौतुक करीत नवी मुंबईच्या क्रीडा व सांस्कृतिक विकासासाठी राबविल्या जात असलेल्या नानाविध उपक्रमांची माहिती दिली.
29 फेब्रुवारी आणि 1 मार्च असे दोन दिवस चालणा-या या जलतरण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 1 मार्च रोजी सायं. 5.00 वा. संपन्न होत असून क्रीडा रसिकांनी या जलतरणपट्टूंचे कौतुक करण्यासाठी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा समिती सभापती डॉ. जयाजी नाथ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 02-03-2020 05:52:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update