आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांची करोना विषाणू जागरुकतेबाबत विशेष बैठक
चीनसह अनेक देशात करोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रसार लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत तातडीची उपाययोजना म्हणून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार वाशी येथील महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालयात 8 आयसोलेशन बेड्सचा विशेष कक्ष तयार केला असून करोना संसर्गाविषयी महापालिका क्षेत्रातील वैद्यकिय व्यावसायिक, खाजगी रुग्णालयांचे प्रमुख, हॉटेल मालक, आय.टी. कंपन्यांचे व्यवस्थापक, उद्योग समुहांचे व्यवस्थापक, स्मॉल स्केल असोसिएशन अंतर्गत उद्योजक यांची विशेष बैठक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी करोना विषाणूची लागण होऊ नये तसेच त्याचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगत याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता तशा प्रकारची लक्षणे आढळल्यास आवश्यक तपासण्या करून योग्य उपचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. याकरीता वैद्यकिय व्यावसायिकांनीही आपल्याकडे येणा-या रुग्णाची लक्षणे बघून, त्याची तपासणी करून त्याला योग्य मार्गदर्शन करावे असे सूचित केले. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असणा-या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगत नियमितपणे हात स्वच्छ धुणे, हॅंड सॅनिटायझरचा वापर करणे, संशयीत रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर व संपर्कातील व्यक्तींनी एन. 95 या विशिष्ट मास्कचा वापर करणे. स्वच्छ व पूर्ण शिजविलेले अन्न खाणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
याविषयी महानगरपालिेकेमार्फत होर्डींग, पॅंप्लेट्स, सोशल मिडीया, केबल वाहिन्या याव्दारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देश आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्येही याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात 8 आयसोलेशन बेड्सचा विशेष कक्ष निर्माण करण्यात आला असून मोठ्या खाजगी रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयात तशा प्रकारचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. महापालिका क्षेत्रातील डॉक्टर्स आणि त्यांचे कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्याबाबतही त्वरीत कार्यवाही करण्यात यावी असे आयुक्तांनी सूचित केले.
यावेळी उपस्थितांनीही विविध अनुषांगिक प्रश्न विचारून करोना विषाणु संसर्ग उपचारांविषयी अधिक माहिती करून घेतली. करोना विषाणूचा प्रसार श्वसनातून, अस्वच्छ हातांमुळे होत असून ताप, खोकला, श्वास घेण्यास अडथळा अशी लक्षणे आढळत असल्यास तात्काळ वैद्यकिय उपचार घ्यावेत असे स्पष्ट करण्यात आले. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय याठिकाणी शासनाच्या वतीने विशेष कक्ष तयार करण्यात आला असून त्याठिकाणी करोना विषाणू बाधीत रुग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. चीन मधील करोना विषाणू बाधीत क्षेत्रामधून येणा-या प्रवाशांमध्ये तसेच करोना विषाणू बाधीत रुग्णाच्या संपर्कात आल्यास या आजाराची शक्यता उद्भवू शकते याकरीता सर्व विमानतळे, बंदरे याठिकाणी परदेशातून येणा-या प्रवाशांची या अनुषंगाने विेशेष तपासणी केली जात आहे.
करोना विषाणू संसर्गाविषयी सावध राहून लक्षणे दिसल्यास उपचार घ्यावेत असे आवाहन करतानाच प्रत्येकाने काळजी घेऊन स्वत:ला व इतरांना सुरक्षित ठेवावे. याकरीता साबण व पाणी वापरून किमान 20 सेकंद आपले हात स्वच्छ धुवावेत, शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरावा, सर्दी किंवा फ्ल्यू सदृष्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजिकचा संपर्क टाळावा, मांस व अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्यावीत, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळावा अशी काळजी घ्यावी. या बैठकीस महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ, अतिरिक्त आयुक्त श्री. महावीर पेंढारी, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे, उपआयुक्त तथा शिक्षणाधिकारी श्री. नितीन काळे, परिमंडळ उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व डॉ. अमरिश पटनिगिरे उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका याबाबत सतर्क असून नागरिकांकरीता 1800222309 / 1800222310 हे विनामुल्य टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जाहीर करत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी करोना विषाणूला घाबरून न जाता नागरिकांनी सावध राहून लक्षणे दिसल्यास उपचार घेण्याचे आवाहन केले.
Published on : 06-03-2020 13:28:23,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update