घणसोलीतील अभिनव सेंट्रल पार्कचे लोकार्पण
सुनियोजित रचनेचे आधुनिक शहर असा नावलौकीक असणारे नवी मुंबई शहर 109 चौ.कि.मी. क्षेत्रातील 225 हून अधिक उद्याने, सुशोभित स्थळे यामुळे उद्यानांचे शहर अशीही वेगळी ओळख ठेवून आहे. या ओळखीत लक्षणीय भर घालणा-या घणसोली सेक्टर 3 येथील प्रशस्त व विविध सोयी सुविधांनी युक्त अशा सेंट्रल पार्कचा लोकार्पण समारंभ नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते, सध्याच्या कोरोना विषाणू आजारावरील प्रतिबंधित परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने फीत कापून संपन्न झाला.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्यासमवेत उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, उद्यान व शहर सुशोभिकरण समिती सभापती श्रीम. शशिकला सुतार, स्थानिक नगरसेविका श्रीम. सुवर्णा पाटील, नगरसेवक श्री. प्रशात पाटील, श्रीम. कमलताई पाटील, श्रीम. उषा पाटील, श्रीम. निलम जगताप, कार्यकारी अभियंता श्री. अनिल नेरपगार, विभाग अधिकारी श्री. सुबोध ठाणेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
घणसोली सेक्टर 3 येथे रेल्वे स्टेशनसमोर 39135.71 चौ.मी. च्या विस्तृत भूखंडावर विकसित करण्यात आलेल्या या सेंट्रल पार्कमध्ये वायू, भूमी, अग्नी, जल व आकाश ही निसर्गातील पंचतत्वांची संकल्पना अत्याधुनिक पध्दतीने साकारण्यात आली आहे. यामध्ये उद्यानाच्या उंच भव्य अशा मुख्य प्रवेशव्दारावर व्ह्यूवींग गॅलरी रचना करण्यात आली असून त्यावरून संपूर्ण पार्कचे विहंगम दृश्य पाहण्याची सोय करण्यात आली आहे. प्रवेशव्दारातून आत प्रवेश करताक्षणीच पंचव्दीप स्क्वेअर स्वरूपातील कारंजाची रचना करण्यात आली असून ठिकठिकाणी पाषाणशिल्पांची लक्षवेधी रचना करण्यात आलेली आहे.
क्रीडाप्रेमी नागरिकांसाठी याठिकाणी 25 मी. x 20 मी. आकाराचा सेमी ऑलिम्पिक तरण तलाव सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी व चेंजींग रूम्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय 150 मी. x 6 मी. आकाराची स्केटिंग रिंग असून फिटबॉल व क्रिकेट खेळासाठी 825 चौ.मी.चा मल्टी स्पोर्टस् एरिया नेटसह उपलब्ध आहे. लहान मुलांसाठी वैविध्यपूर्ण खेळण्यांसह दोन जागी खेळण्यांची ठिकाणे विकसित करण्यात आली असून दुखापत होऊ नये म्हणून त्या क्षेत्रात रबर मॅटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे आरोग्याविषयी सजग असणा-या नागरिकांकरिता 665 मी. x 4.20 मी. चा जॉगिंग ट्रॅक पार्कच्या सभोवताली उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्यासोबतच 310 मी. x 3 मी. चा सायकल ट्रॅकही उपलब्ध आहे. यासह 15 मी.x16 मी. क्षेत्रात ॲक्टिव्हिटी कॉर्नर विकसित करण्यात आले आहेत.
हिरवळ आणि वृक्षसंपदेने संपन्न असलेल्या या सेंट्रल पार्कमध्ये विविध कार्यक्रमांसाठी ॲम्फिथिएटर, पार्टी लॉन क्षेत्र अशा सुविधाही असून महिला व पुरूषांसाठी प्रसाधनगृह व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 50 चारचाकी वाहनांचा व 60 दुचाकी वाहनांचा प्रशस्त वाहनतळ आहे.
अभिनव अशा या सेंट्रल पार्कला स्थानिक स्वराज्य संस्था निर्मित देशातील सर्वोत्तम नागरी सुविधेचा “इपीसी वर्ल्ड पुरस्कार” हा राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला असून नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी ही अत्यंत उत्कृष्ट अशी उद्यान सुविधा उपलब्ध झाली आहे.
आजोबांसह नातू व संपूर्ण कुटूंबाने एकत्र येऊन आपला वेळ मजेत घालवावा असे सर्वांना सामावून घेणारे हे ठिकाण असून त्याचा उपयोग घणसोली, कोपरखैरणेतील नागरिकांप्रमाणेच इतरांनाही मोठ्या प्रमाणात होईल याबद्दल समाधान व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी या लोकार्पणाप्रमाणेच सेक्टर 7 येथील मैदानास माजी नगरसेवक संजय बालाजी पाटील क्रीडांगण तसेच सेक्टर 7 येथील नमुंमपा शाळा क्र. 76 व 105 ला अरविंदभाई मफतललाल प्राथमिक व माध्यमिक शाळा असे नामकरणही नगरसेविका श्रीम. कमलताई पाटील यांनी सूचविलेल्या व महापालिका सर्वसाधारण सभेने मंजूरी दिलेल्या ठरावांच्या अनुषंगाने झाल्याचे यावेळी जाहीर केले.
सेंट्रल पार्क लोकार्पण झाल्याचा आनंद नागरिकांनी त्यातही बच्चे कंपनीने मोठ्या उत्साहाने साजरा केला.
Published on : 13-03-2020 13:18:00,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update