गर्दी होतील असे कार्यक्रम आयोजन करण्याचे व उपस्थित राहण्याचे टाळण्याबाबत जाहीर आवाहन
सदयस्थितीत जागतिक पातळीवर कोरोना विषाणुमुळे जिवित हानी झाली आहे. तसेच सदर विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातही झाला असून मुंबई, ठाणे व पुणे या ठिकाणी कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत व त्यांच्यावर वैदयकीय उपचार सुरु आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका शहर हे देखील अत्यंत गजबजलेले शहर असून या शहरातून बाहेर तसेच या शहरात बाहेरुन नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने येणा-या - जाणा-या लोकांची संख्या मोठया प्रमाणात आहे. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करणेकरिता महानगरपालिकेमार्फत शहरात विविध उपायायोजना करण्यात येत आहेत.
या अनुषंगाने शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, परदेशी जाण्याचे टाळावे व अनावश्यक प्रवास टाळण्यात यावा. तसेच शहरात गर्दी होणारे कार्यक्रम, जसे स्थानिक पातळीवरील क्रिकेट स्पर्धा, महिलांचे हळदी कुंकू समारंभ, शाळा / महाविदयालय या ठिकाणी होणारे कार्यक्रम तसेच इतर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठया प्रमाणावर गर्दी होत असल्याने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे टाळण्यात यावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
याविषयी रुग्णालयीन कर्मचा-यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आलेले असून, नागरिकांनी श्वसनसंस्थेचे आजार असणा-या व्यक्तीशी निकट सहवास टाळावा, हात वारंवार धुवावेत व नियमित स्वच्छता राखावी, शिंकताना, खोकताना नाका - तोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपरचा वापर करावा, अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये, फळे, भाज्या न धुता खाऊ नयेत तसेच करोना व्हायरस संसर्गाविषयी आवश्यक त्या माहितीसाठी महानगरपालिका नियंत्रण कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक 1800222309/310 ,022-27567270/7060 याचा वापर करावा. याविषयी काही आवश्यकता भासल्यास हेल्पलाईन नंबरवर 24 तास संपर्क उपलब्ध आहे याचा उपयोग करावा व अफवांवर विश्वास न ठेवता सावधगिरी बाळगावी व घाबरून जाऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 13-03-2020 14:17:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update