कोरोनाचा प्रतिबंध करताना नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन

जागतिक आरोग्य संघटनेने "जगभर प्रसारित झालेला साथीचा रोग" म्हणून कोव्हिड - 19 (कोरोना विषाणू) व्दारे पसरलेल्या रोगास घोषित केलेले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात "साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897" ची अंमलबजावणी सुरु झाली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात याबाबत उपाययोजना करण्याकरिता महापालिका आयुक्त यांस सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले असून या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी त्वरीत विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. याविषयी प्रसार माध्यमांमार्फत जनतेला घाबरून न जाता सावधगिरी बाळगून काळजी घेण्याचे आवाहन करण्यासाठी आयुक्तांनी विविध वृत्तपत्र व वृत्तचित्रवाहिन्या यांच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करीत महानगरपालिका करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेने प्राथमिक संदर्भ रुग्णालय वाशी याठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करून 38 बेड्सची सुविधा उपलब्ध करून ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे नेरूळ येथील डॉ. डि.वाय.पाटील रुग्णालयातही विलगीकरण कक्ष सुविधा उपलब्ध केलेली आहे. त्याचप्रमाणे विविध रुग्णालयांना याबाबत तयार राहण्यास सूचित केलेले आहे. याशिवाय परदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांना 14 दिवस अलगीकरण कक्षात ठेवण्याची सुविधा वाशी सेक्टर 14 येथील बहुउद्देशीय इमारतीत करण्यात आलेली असून त्याठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आलेली आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली.
कोरोना विषाणू आजाराची लक्षणे ही मुख्यत्वे श्वसन संस्थेशी निगडीत असून ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखी असतात. माणसाच्या शिंकण्यातून, खोकल्यातून जे थेंब उडतात, ते थेंब पडलेल्या पृष्ठभागावर स्पर्श झाल्यानंतर हाताला चिकटून ते हात चेहरा, डोळे, नाक यांना लागल्यास हा आजार पसरतो हे लक्षात घेऊन नियमितपणे व वारंवार हात धुणे महत्वाचे आहे. तसेच शिंकताना, खोकताना नाका - तोंडावर स्वच्छ हातरुमाल धरणे गरजेचे आहे. श्वसन संस्थेचे विकार असणा-या व्यक्तींशी संपर्क ठेवताना संसर्ग न होऊ देण्याची काळजी घेणे गरजेचे असून नागरिकांनी याबाबत खबरदारी घ्यावी असे आवाहन आयुक्तांनी प्रसारमाध्यमांमार्फत नागरिकांना केले.
परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांनी 14 दिवस आपल्या घरातच थांबावे व काळजी घ्यावी असे स्पष्ट करतानाच अशा व्यक्तींच्या संपर्कात घरातील एकच व्यक्ती राहील व तिने योग्य ती काळजी घ्यावी असे आयुक्तांनी स्पष्ट केले. एन 95 मास्कचा वापर केवळ कोरोना रुग्ण तसेच कोरोना रुग्णांवर तपासणी करणा-या डॉक्टर व स्टाफ आणि संपर्कातील व्यक्तींनी करावा असे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेने याकरिता विभागनिहाय 24 शीघ्र प्रतिसाद पथके कार्यान्वित केली असून त्यामध्ये वैद्यकिय अधिकारी, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ तसेच बहुउद्देशीय कर्मचारी यांचा समावेश आहे. शीघ्र प्रतिसाद पथकातील वैद्यकिय अधिका-यांचे दूरध्वनी क्रमांक नागरिक संपर्कसाठी जाहीर करण्यात आले आहेत. परदेशातून येणा-या प्रवाशांची माहिती संकलीत करून तपासणी करण्यात येत आहे व कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या व्यक्तींना कस्तुरबा रुग्णालय मुंबई येथे संदर्भित करण्यात येत आहे. अशा व्यक्तींच्या सहवासीतांचे अलगीकरण करून त्यांना 14 दिवस नियंत्रणाखाली ठेवण्यात येत असून संबंधीत वैद्यकिय अधिकारी हे त्यांच्या प्रकृतीकडे नियमित लक्ष ठेवून आहेत.
अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे यांच्यासह महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्ष यांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील सुविधांचा व औषध साठ्याचा आढावा घेतला.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी आवश्यक काळजी घेतली असून नागरिकांनीही घाबरुन न जाता व अफवांवर विश्वास न ठेवता सावधगिरी बाळगून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व आपल्या आणि इतरांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 17-03-2020 16:34:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update