महापौर श्री. जयवंत सुतार व आमदार श्री. गणेश नाईक यांनी केली कोरोना विलगीकरण व अलगीकरण कक्षाची पाहणी

कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये याकरिता नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करतानाच नवी मुंबई महानगरपालिकेने शासन निर्देशानुसार उपाययोजनांबाबत महापालिका आयुक्त तथा साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897 ची अंमलबजावणी करणारे सक्षम प्राधिकारी श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पावले उचललेली आहेत.
याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात 38 बेड्स व आवश्यक व्हेंटिलेटर्सची सुविधा असणारा विलगीकरण कक्ष स्थापित करणयात आला आहे. त्याचप्रमाणे नेरूळ येथील डॉ. डि.वाय.पाटील रुग्णालयातही विलगीकरण कक्ष सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आलेली आहे. याशिवाय महानगरपालिका क्षेत्रातील इतर मोठ्या रुग्णालयांना विलगीकरण कक्षाचे नियोजन करण्यास व तयार राहण्यास सूचित करण्यात आलेले आहे.
त्यासोबतीनेच परदेशातून भारतात आलेल्या नवी मुंबईतील प्रवाशांना 14 दिवस अलगीकरण कक्षात ठेवण्याची सुविधा वाशी सेक्टर 14 येथील बहुउद्देशीय इमारतीत करण्यात आलेली असून त्याठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांच्यासह या विलगीकरण व अलगीकरण कक्षाची पाहणी करून त्यामधील सुविधांबाबत मौलीक सूचना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समितीच्या सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे उपस्थित होते.
परदेशातून आलेल्या प्रवाशांव्दारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याचे लक्षात घेऊन महानगरपालिकेने सर्व टुर्स आणि ट्रॅव्हल्स एजंट यांच्याकडून परदेशी प्रवास करून आलेल्यांची माहिती संकलीत केली असून यापुढील काळात कोणतीही व्यक्ती परदेश प्रवास करणार नाही याविषयी काटेकोर निर्देश दिलेले आहेत.
या टुर्स व ट्रॅव्हल्स एजन्ट कडून तसेच सोसायटीचे पदाधिकारी व जागरूक नागरिक यांच्याकडून प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार महानगरपालिकेने स्थापन केलेले शीघ्र प्रतिसाद पथक संबंधीतांकडे त्वरीत पोहचत असून ती व्यक्ती नवी मुंबईत परत कधी आली, त्यांना सर्दी, खोकला किंवा ताप आहे अथवा नाही अशी त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती घेत आहे. सध्या प्रकृती सर्वसाधारण असली तरी या प्रवाशांना 14 दिवस अलगीकरण करून राहणे गरजेचे असल्याचे पटवून दिले जात असून त्यांच्या संपर्कात घरातील एकाच व्यक्तीने पुरेसे अंतर ठेवून त्यांची व स्वत:ची काळजी घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे. अशा प्रवाशांशी दररोज त्या विभागातील शीघ्र प्रतिसाद पथक संपर्क साधून त्यांचे निरीक्षण करीत आहे व काळजी घेत आहे. जे प्रवासी अशाप्रकारे घरातच 14 दिवस अलगीकरण करून राहण्यास तयार होत नाहीत त्यांचे विभाग कार्यालय व पोलीसांच्या मदतीने त्यांच्या घरातच अलगीकरण कार्यवाही करून घेण्यात येत आहे. नागरिकांनीही अशा शेजारी राहणा-या प्रवाशांना सहकार्य करावे व स्वत:चीही काळजी घ्यावी असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार हा संसर्गातून होत असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच कामाशिवाय घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे घाबरून न जाता स्वत:ची व इतरांची काळजी घ्यावी. खोकताना, शिकताना हातरूमालाचा वापर करावा. आपले हात साबण व पाण्याने वारंवार स्वच्छ धुवावेत तसेच श्वसनसंस्थेचे विकार असणा-या व्यक्तीशी संपर्क ठेवताना अधिक काळजी घ्यावी असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 19-03-2020 11:04:35,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update