कोरोना प्रसार प्रतिबंधासाठी तंबाखू, सिगारेट विक्री दुकाने व पानटप-या बंद सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांकडून 250 रूपयांची दंड वसूली
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात "साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897" ची अंमलबजावणी सुरु झाली असून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी उपाययोजना करण्याकरिता महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ हे सक्षम प्राधिकारी आहेत.
या अनुषंगाने दिनांक 15 मार्च रोजी आयुक्तांनी विशेष आदेशाव्दारे करोनाचा संसर्ग पसरू नये याकरिता खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक कार्यक्रमांची परवानगी रद्द केली असून महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडी, बालवाडी, सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस, ग्रंथालये / अभ्यासिका, सिनेमागृहे, नाटयगृहे तसेच सर्व गृहनिर्माण संस्था, हॉटेल व सार्वजनिक ठिकाणी असलेले जलतरण तलाव आणि व्यायामशाळा / जीम, मॉल्स, महापालिका बहुउद्देशीय इमारतीमधील सभागृहे तसेच खाजगी मंगल कार्यालये व सभागृहे, हॉटेल्समधील बॅक्वेंट हॉल्स, सर्व क्रीडा संकुले, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे बंद राहतील असे घोषित केले आहे. त्याचप्रमाणे सर्व उदयाने, पार्क, गार्डन ही क्षेत्रेही प्रतिबंधीत करण्यात आली आहेत तसेच मैदाने / मोकळया जागा या ठिकाणी नियोजित कोणत्याही प्रकारचे सामाजिक / सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम व महोत्सव यांच्या आयोजनास प्रतिबंध करण्यात आला आहे.
याबाबत तातडीने सर्व 8 विभाग अधिकारी आणि दोन्ही परिमंडळ उपआयुक्त यांचे समवेत आढावा बैठक घेत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी काही ठिकाणी आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणून देत सार्वजनिक हिताच्या व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने याबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
यामध्ये गर्दी होईल अशा सर्व कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही हे स्पष्ट करीत खाजगी कोचिंग क्लासेस सुरू असल्यास त्या ठिकाणी अटकाव करून त्या क्लास चालकांवर कारवाई करण्याचे सूचित केले आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांचे आदेशाच्या अनुषंगाने डिस्कोथेक्स, पब, बार, ऑर्केस्ट्रा, डी.जे., लाईव्ह बॅन्ड व तत्सम आस्थापना तसेच मालिका, जाहिराती वा चित्रपटांचे चित्रीकरण यासही पूर्णपणे प्रतिबंध करावा असे निर्देशित केले आहे.
याशिवाय तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थ यांची विक्री करणारी सर्व दुकाने व पान टप-या बंद ठेवण्यात याव्यात असेही निर्देशित करण्यात आले आहे.
यामध्ये महत्वाचे म्हणजे हा श्वसनसंस्थेशी निगडीत आजार असल्याने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर असलेल्या बंदीकडे काटेकोर लक्ष देत सार्वजनिक ठिकाणी थुकणा-यांकडून रू. 250/- इतकी दंडात्मक रक्कम वसूली केली जात आहे. आजच्या दिवसात 48 व्यक्तींकडून 12 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी घालण्यात येत असलेले निर्बंध हे नागरिकांचे आरोग्य हित नजरेसमोर ठेवून घालण्यात येत असून याकरिता सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी सर्वेतोपरी सहकार्य करावे आणि कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नये तसेच शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 19-03-2020 11:07:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update