नवी मुंबईकर नागरिकांना घरीच जीवनावश्यक साहित्य पुरविण्यासाठी 'नवी मुंबई बाजार' ॲप सज्ज
कोव्हीड 19 चा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरू असून या काळात जीवनावश्यक गोष्टींची व्यवस्थित पूर्तता व्हावी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार काळजी घेण्यात येत आहे.
या अनुषंगाने नागरिक दैनंदिन गरजेच्या जीवनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडून गर्दी होऊ नये व त्यामधून लॉकडाऊनचा मूळ उद्देश असफल होऊ नये याकरिता महानगरपालिकेमार्फत विशेष काळजी घेत नागरिकांना भाजीपाला व फळे सुलभ रितीने उपलब्ध होण्याकरिता विभागवार विक्रेत्यांची यादी मोबाईल क्रमांकासह महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
अशाचप्रकारे किराणा दुकानांमध्ये तसेच मार्केटमध्ये होणारी गर्दी पूर्णपणे थांबावी यादृष्टीने नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत घरपोच माल मिळावा यासाठी नवी मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने, मे.अल्ट्रालिएन्टट इन्फोटेक प्रा.लि. यांनी "Navi Mumbai Bazzar" (नवी मुंबई बाजार)” हे मोबाईल ॲप तयार केले असून ते सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी नागरिक आपल्या ॲपल ॲप स्टोअरमध्ये जाऊन हे अॅप डाऊनलोड करू शकतात. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in यावर देखील सदर यादी नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
या ॲप/ वेबसाईट लिकवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, दूध विक्रेते यांनी नाव, दुकानाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक यासह आपली नोंदणी करावयाची आहे. यामध्ये नागरिकांनीही आपल्या नावाची नोंदणी करावयाची असून त्यानंतर नागरिकांनी त्यांना आवश्यक असलेल्या मालाची रितसर मागणी नोंदवून आपल्या विभागातील त्या मालाचे पुरवठादार दुकानदार निवडल्यानंतर ते दुकानदार ग्राहक नागरिकांना हव्या असलेल्या मालाची ऑर्डर नोंदवून घेऊन त्या मालाची घरपोच डिलीव्हरी करतील.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांना आवश्यक असलेले साहित्य घरपोच मिळावे व यामधून लॉकडाऊनचा उद्देश सफल व्हावा आणि कोरोना प्रसाराला प्रतिबंध व्हावा याकरिता अत्यंत उपयुक्त असलेल्या या नवी मुंबई बाझार ॲप आणि लिंकच्या सुविधेचा उपयोग जास्तीत जास्त विक्रेत्यांनी व ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
सदर ॲप आपल्या स्मार्ट फोनमध्ये कार्यान्वीत करणेसाठी allow *installation from unknown resources* - yes, ही सेटिंग करून नागरिकांनी खालीलप्रमाणे कृती करावयाची आहे.
- हे ॲप आपल्या स्मार्ट फोन मध्ये डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे.
- या ॲपमध्ये इ मेल आय डी व मोबाईल क्रमांक टाकून रजिस्टर करावा.
- रजिस्ट्रेशन झाल्यावर आपल्या इमेल वर आलेला युजर आयडी व पासवर्ड ॲपमध्ये टाकून लॉगिन करावे. .
- लॉगिन केल्यावर आपल्या प्रोफाइल ची माहिती पूर्ण भरावी. यामध्ये व्यापा-यांनी दुकानाचा प्रकार ( किराणा, औषध इ.) तसेच ज्याठिकाणी मालाची पूर्तता करणे शक्य आहे त्या विभागाचे क्षेत्र (एरिया) नोंदवावे.
- व्यापारी एकापेक्षा अधिक क्षेत्राची निवड करू शकतात याची नोंद घ्यावी.
- पेंडिंग ऑर्डर मध्ये व्यापा-यांनी निवड केलेल्या क्षेत्रामधील मागण्या दिसतील. ज्या व्यापारी त्याची बिल रक्कम टाकून ॲक्सेप्ट करू शकतात व माल ग्राहकांच्या पत्त्यावर पोहोचवून बिलाची रक्कम त्यांच्याकडून घेऊ शकतात.
नवी मुंबई बाजार हा अभिनव ॲप महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चर यांचेमार्फत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी व दुकानदार विक्रेत्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. तरी याचा जास्तीत जास्त वापर करून नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घराबाहेर न पडता लॉकडाऊनचा उद्देश सफल करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 13-04-2020 09:04:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update