इंडिया बुल्स येथील कोव्हीड केअर सेंटरची आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
कोव्हीड 19 चा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या असताना पनवेलजवळ इंडिया बुल्स याठिकाणी असलेल्या महानगरपालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरला महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी संबंधित अधिकारी यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
इंडिया बुल्स येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये दोन स्वतंत्र इमारतींत प्रत्येकाला एक रूम याप्रमाणे 1000 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याठिकाणी एका स्वतंत्र इमारतीत सौम्य स्वरूपाची लक्षणे असणा-या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दुस-या स्वतंत्र इमारतीत पॉझिटिव्ह नागरिकांचा संपर्क आल्याने क्वारंटाईन करणे गरजेचे असलेल्या सर्वसाधारण नागरिकांना अलगीकरण (Quarantine) करून राहण्याची व्यवस्था केलेली आहे.
याठिकाणी एका स्वतंत्र इमारतीत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. येथील बाह्यरूग्ण तपासणी कक्षात डॉक्टरांनी 24 तास उपस्थित रहावे व तेथील पॉझिटिव्ह आणि क्वारंटाईन व्यक्तींशी दूरध्वनी व सुरक्षेची काळजी घेत सोशल डिस्टन्सींग पाळून संपर्कात रहावे असे आयुक्तांनी यावेळी निर्देश दिले. यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय करू नये अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुस-या स्वतंत्र इमारतीत केवळ पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईन करून राहणे आवश्यक असलेल्या सर्वसाधारण व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. या सर्वसाधारण व्यक्तींना कोणतीही लक्षणे नसल्याने औषधांची आवश्यकता नाही. तथापि या क्वारंटाईन व्यक्तींचा आमच्यावर कोणताही औषधोपचार केला जात नाही असा समज झाला असून त्यांना औषधोपचाराची आवश्यकता नाही ही वस्तुस्थिती समजवून सांगण्याच्या सूचना आयुक्तांनी डॉक्टरांना दिल्या. तसेच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींप्रमाणेच क्वारंटाईन केलेल्या नागरिकांशीही संवाद साधत रहावे असे आयुक्तांनी सूचित केले.
काल रात्री इंडिया बुल्स येथून कोरोना पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त होऊन बरे झालेल्या 80 व्यक्तींना तसेच त्यांच्यासोबत क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेल्या 303 अशा एकूण 383 नागरिकांना आवश्यक आरोग्य तपासणी करून एन.एम.एम.टी. बसेसमधून सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत घरी पाठविण्यात आले आहे. त्याचाही आढावा आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी घेतला. आजतागायत पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त होऊन बरे झालेल्या 155 व्यक्ती घरी परतल्या आहेत.
याठिकाणी असलेल्या प्रत्येक नागरिकाची व त्यातही विशेषत्वाने लहान मुलांची काळजी घ्यावी असे आदेशित करतानाच सुविधा पुरविताना कोणत्याही प्रकारची काटकसर करू नये असे सक्त निर्देश आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी संबंधित अधिकारी यांस दिले. त्याचप्रमाणे वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधण्याकरिता 022-35155012 हा क्रमांक सर्वांना देण्यात यावा असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
इंडिया बुल्स याठिकाणी प्रत्येक रूममध्ये गिझरची व्यवस्था असून सकाळी नाश्ता, दोन वेळचे जेवण, दोन वेळा चहा व बिस्कीट तसेच मुलांना दूध व फळे दिली जात आहेत. त्याच्या नियमित वेळेकडे व स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये याकरिता अहोरात्र काम करीत असून जे.जे.रूग्णालयातून 24 तासात रिपोर्ट मिळावेत यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने स्वॅब तपासणीसाठी वेगळी रक्कम अदा करून वेगळा स्लॉट घेण्याचाही विचार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
Published on : 11-05-2020 07:19:00,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update