पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांचेकडून वाशी एक्झीबिशन सेंटर मधील कोव्हीड रुग्णालयाची पाहणी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी, सेक्टर 30 ए येथे सिडको एक्झिबिशन सेंटर येथे उभारण्यात येत असलेल्या कोव्हीड 19 विशेष रुग्णालयाच्या कामाची आज महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांचेकडून तेथील सुविधांची सविस्तर माहिती जाणून घेतली आणि मौलीक सूचना केल्या. यावेळी पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या समवेत खासदार श्री. राजन विचारे, आमदार श्री. शशिकांत शिंदे, आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, शासनाच्या वडार समाज कल्याण समितीचे अध्यक्ष श्री. विजय चौगुले तसेच महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, उप आयुक्त श्री. अमोल यादव, श्री. किरणराज यादव, श्री. तुषार पवार, श्री.नितीन काळे, डॉ. राहुल गेठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे आणि इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
कोव्हीड रुग्णांचा विचार करून महानगरपालिकेने 1182 बेड्सची क्षमता असणारे व त्यातही 500 बेड्स ऑक्सिजन सपोर्टची व्यवस्था असणारे अतिशय चांगल्या प्रकारचे रुग्णालय अत्यंत कमी कालावधीत उभे केले आहे असे सांगत पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी एक्सरेसह इतर आवश्यक सुविधा असून लक्षणे दिसत नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तीव्र लक्षणे असणा-या कोरोना बाधीत रुग्णांसाठी येथील आयसीयू बेड्सच्या व्यवस्थेमध्ये अधिक वाढ करण्याच्या तसेच वाशी येथील डेडीकेटेड रुग्णालयातही आयसीयू बेड्स वाढवण्याच्या सूचना पालकमंत्री महोदयांनी केल्या. सद्यस्थितीतील रुग्णसंख्येच्या दृष्टीने महानगरपालिकेने केलेले नियोजन योग्य असून आवश्यकेतनुसार संख्यावाढीचा अंदाज घेऊन अधिकचे नियोजन करता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी पावसाळी कालावधी लक्षात घेऊन नॉन कोव्हीड रुग्णांसाठीही महानगरपालिकेने नेरुळच्या डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात 1200 बेड्स उपलब्ध करून घेतले असून त्याठिकाणी महानगरपालिकेच्या खर्चाने नागरिकांवर उपचार करण्यात येतील असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मेट्रोपोलीस लॅब यांच्याकडून 15 हजार आणि अपोलो यांच्याकडून 4 हजार अशा एकूण 19 हजार कोव्हीड 19 च्या स्वॅब टेस्ट महानगरपालिकेला मोफत करून मिळणार असल्याने नागरिकांची चांगली सोय होणार आहे असेही ते म्हणाले. महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयात कोव्हीड 19 विषयक प्रयोग शाळेचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळी कालावधीत कोणत्याही रुग्णाला आवश्यक उपचार मिळालेच पाहिजेत याकरीता महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांशी संपर्क साधून त्यांना तशा प्रकारचे निर्देश द्यावेत असेही त्यांनी महापालिका आयुक्तांना सूचित केले.
यावेळी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महानगरपालिका कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक राबवित असलेल्या उपाययोजनांबाबत पालकमंत्री महोदयांना सविस्तर माहिती दिली.
Published on : 06-06-2020 18:14:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update