कोरोना विरोधातील लढ्यासाठी सुसज्ज "कोव्हीड 19 वॉर रुम" कार्यान्वित

कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच पावसाळी कालावधीमधील साथरोग परिस्थिती लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना व त्यांची अंमलबजावणी यावर निरीक्षण व नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात चौथ्या मजल्यावर सुसज्ज "कोव्हीड 19 वॉर रुम' तयार करण्यात आली आहे. आयुक्तांनी त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कोव्हीड 19 वॉर रुममधील कामकाजाचा आढावा घेतला.
कोव्हीडचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना बाधितांचा शोध घेऊन कोरोनाची साखळी खंडीत करणे सर्वात महत्वाचे आहे. यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने अगदी सुरुवातीपासूनच योग्य पावले उचलली आहेत. टेलिफोनिक संवादाव्दारे 6 लाखाहून अधिक नागरिकांशी संपर्क साधून त्यांची आरोग्यविषयक माहिती ऑनलाईन फॉर्मव्दारे संकलीत करण्यात आलेली आहे. नागरिकांसाठी 022-27567269 हा आरोग्य विषयक हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला असून यावर फोन केल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा आरोग्य विषयक सल्ला उपलब्ध होत आहे.
याशिवाय महानगरपालिकेची 23 नागरी आरोग्य केंद्रे तसेच 4 रुग्णालये या ठिकाणी 'फ्ल्यू क्लिनिक' सुरु करण्यात येऊन नागरिकांची कोव्हीड 19 विषयक प्रत्यक्ष तपासणी करण्यात येत आहे व कोव्हीड सदृष्य लक्षणे आढळल्यास महानगरपालिकेच्या चार रुग्णालयात स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू आहेत. तसेच कोरोना बाधीत मोठ्या संख्येने आढळले आहेत अशा विभागांमध्ये मास स्क्रिनींग कॅम्प आयोजित करण्यात येत असून 32 हजाराहून अधिक नागरिकांचे मास स्क्रिनींग करण्यात आलेले आहे.
अशा विविध प्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असताना याबाबतच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व 23 नागरी आरोग्य केंद्रे आणि 4 रुग्णालये त्याचप्रमाणे विविध ठिकाणी सुरु करण्यात आलेले कोव्हीड केअर सेंटर तसेच खाजगी रुग्णालयात सुरु करण्यात आलेले डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर व डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल येथील कामकाजाचे सनियंत्रण करण्यामध्ये 'कोव्हीड 19 वॉर रुम' महत्वाची भूमिका बजावणार आहे.
या ठिकाणाहून क्वारंटाईन नागरिक तसेच पॉझिटिव्ह रुग्ण यावर लक्ष ठेवणे, केंद्र व राज्य सरकारमार्फत दररोज कोरोना संदर्भात प्राप्त होणा-या माहितीचे प्रसारण करणे व त्यावरील योग्य कार्यवाहीबाबत दिशा ठरविणे, शासनाच्या विविध विभागांना दररोज सादर करावयाचे विविध प्रकारचे अहवाल विहीत वेळेत संकलित करून पाठविणे, दैनंदिन परिस्थितीचा आढावा घेऊन कार्यवाहीची रणनीती ठरविणे या दृष्टीने या 'कोव्हीड 19 वॉर रुम'ची महत्वाची भूमिका राहणार असल्याचे सांगत वॉर रुमव्दारे एकात्मिकरित्या काम होईल व निर्णय घेण्यात सुलभता येईल आणि कोव्हीड विषयक कामांमध्ये सुसूत्रता येईल असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केला आहे.
Published on : 18-06-2020 13:43:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update