खाजगी रुग्णालयातील दर व महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीकरीता समिती गठीत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना उपचारांचा लाभ मिळावा यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केले आहेत. तसेच खाजगी रुग्णालये/ दवाखाने / नर्सिंग होम यांच्याकडून विविध प्रकारचे वैदयकिय उपचार/ आरोग्य सेवा याकरीता आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर निर्बंध आणण्यात आले आहेत व त्याकरीता दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करणे, सनियंत्रण करणे व या प्रकरणी तक्रार असल्यास त्यावर कार्यवाही करण्याकरीता महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी महानगरपालिका स्तरावर समिती गठीत केली आहे.
अतिरिक्त आयुक्त (1) श्रीम. सुजाता ढोले यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती कार्यवाही करणार असून वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे आणि अधिक्षक श्री. उत्तम खरात हे या समितीचे सदस्य आहेत.
ही समिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करील व याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्त यांना सादर करेल.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना खाजगी रुग्णालय / दवाखाने / नर्सिंग होम येथील वैदयकिय उपचार/सेवेकरीता आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत वा दरांबाबत काही तक्रार असल्यास अथवा महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभाबाबत काही अडचणी असल्यास नवी मुंबई महानगरपालिका स्तरावरील या सनियंत्रित समितीकडे moh@nmmconline.com या इ मेल वर अथवा प्रत्यक्ष अर्ज सादर करावा तसेच याविषयी अधिकच्या माहितीसाठी 022-27567261 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 30-06-2020 15:05:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update