डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त महानगरपालिका मुख्यालयात जनजागृतीपर प्रदर्शन

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पावसाळा काळावधीमध्ये डेंग्यु आजार रोखण्याकरीता नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी माहे जुलै महिना हा डेंग्यु प्रतिरोध महिना म्हणुन साजर करण्यात येतो. त्या अनुषंगाने आज दि. 01 जुलै 2020 रोजी मुख्यालय स्तरावर डेंग्यु जनजागृतीपर प्रदर्शन संच उभारुन डास उत्पत्ती स्थानांची ठिकाणे यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे गप्पी मासे व डासांच्या अळ्या संग्रहीत करुन सदर ठिकाणी ठेवण्यात आले होते. या प्रदर्शन ठिकाणी महापालिका आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे यांच्यासह वैद्यकिय आरोग्य अधिकारी व वैद्यकिय अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट दिली
तसेच हस्तपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स इत्यादी द्वारे माहीती शिक्षण, आरोग्य जनजागृती शिबीर, प्रदर्शन संच इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये माहे जुलै 2020 हा डेंग्यु प्रतिरोध महिना साजरा करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मुख्यालय स्तरावरुन सुचना देण्यात आलेल्या आहेत. डेंग्यु रुग्ण संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत नियमित पंधरवाडा गृहभेटी देवुन डेंग्यु आजाराबाबत आरोग्य शिक्षण देण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.
त्याचप्रमाणे डेंग्यु आजाराचा पारेषण कालावधी लक्षात घेता घरांतर्गत व घराबाहेरील डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम नियमित सुरु करण्यात आलेली आहे.
गच्चीवरील, घराच्या परिसरात भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंटया, रंगाचे डबे, उघडयावरील टायर्स इत्यादी नष्ट करा, फुलदाण्या ट्रे, फेंगशुई मध्ये साचलेले पाणी आठवड्यातुन एकदा बदला, घरामधील व घराबाहेरील पाणी साठविण्याची ड्रम/टाक्या/ भांडी आठवडयातुन एकदा काढुन पुर्णपणे कोरडे करा, शक्य झाल्यास डास प्रतिबंधात्मक मच्छरदानीचा वापर करा, आपल्या घरी येणा-या आरोग्य कर्मचा-यांमार्फत व महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये/नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तापाच्या रुग्णाची मोफत रक्त तपासणी करुन घ्या, आपले घर, कार्यालय, व परिसरात पाणी साचु देवू नका, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
डेंग्यु आजाराचा रुग्ण आढळल्यास नजीकच्या नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात/ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने संपर्क साधण्यात यावा, जेणे करुन या आजारांचा प्रादुर्भाव नागरीकांच्या सहकार्याने रोखणे शक्य होईल.
Published on : 01-07-2020 15:25:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update