सिडको एक्झिबिशन सेंटर व इंडिया बुल्स येथील रुग्णालयीन सुविधांची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली पाहणी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना व पावसाळी साथ रोग नियंत्रण या अनुषंगाने आरोग्य विभागाचा सर्वांगीण आढावा घेतानाच आज वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे महानगरपालिकेने उभारलेल्या कोव्हीड रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्था आणि सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.
याठिकाणी 1132 बेड्सची क्षमता असून त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 500 ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सध्या ऑक्सिजन बेड्सची आवश्यकता लक्षात घेऊन याठिकाणी दुस-या टप्प्यात आणखी 500 बेड्स ऑक्सिजन बेड्समध्ये रुपांतरीत करून एकूण 1000 ऑक्सिजन बेड्सचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
त्याचप्रमाणे येथे नियोजित आयसीयू सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असलेल्या जागेचीही डॉक्टरांच्या टिमसह आयुक्तांनी पाहणी केली व पहिल्या टप्प्यात 100 आयसीयू बेड्स उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरु करण्याचे आदेशीत केले. यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णालय व्यवस्थापन (क्लिनीकल मॅनेजमेंट) करीता मदत होणार असून पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन व आयसीयू बेड्स उपलब्ध होऊन यातील अडचण दूर होणार असल्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्याठिकाणी दाखल कोरोना बाधीत व्यक्तींशी संवाद साधत आयुक्तांनी त्यांचे अभिप्राय जाणून घेतले. तसेच डॉक्टर व नर्सेस यांच्याशीही बोलून त्यांच्या सूचना, अडचणी जाणून घेतल्या व यामधून विनाविलंब मार्ग काढला जाईल असे त्यांना आश्वासीत केले व याबाबतचे निर्देश संबंधित अधिकारी वर्गाला दिले.
इंडिया बुल्स येथील कोव्हीड केअर सेंटरचीही क्षमता वाढविणार
अशाचप्रकारे कोन, पनवेलमध्ये इंडिया बुल्स येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थेची व सुविधांची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी बारकाईने पाहणी केली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या कोव्हिड केअर सेंटरमध्ये केवळ 18 ते 50 या वयोगटातील पुरुष कोरोनाबाधित व्यक्ती अथवा कोरोना बाधीतांच्या निकटच्या संपर्कातील अती जोखमीच्या पुरूष व्यक्ती यांनाच विलगीकरणासाठी ठेवले जात असून या सेंटरवर व्यक्ती आल्यानंतर नोंदणी होण्यापासून त्याची निवास व इतर व्यवस्था, उपचार पध्दती ते डिस्चार्ज होऊन जाईपर्यंतच्या सर्व गोष्टींची आयुक्तांनी सविस्तर माहिती घेतली.
तसेच त्याठिकाणच्या स्वच्छतेची पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधत जेवण, चहा, अल्पोपहार याबाबतचे अभिप्राय जाणून घेतले. तसेच रुग्णांप्रमाणेच डॉक्टर्स आणि कर्मचा-यांशी संवाद साधून त्यांच्याही अडचणी जाणून घेतल्या. सिडको एक्झिबिशन सेंटरप्रमाणेच इंडिया बुल्स येथेही उपलब्ध करून दिल्या जाणा-या सुविधांचा दर्जा चांगला असल्याचे अभिप्राय आयुक्तांनी यावेळी व्यक्त केले.
इंडिया बुल्स येथे कोव्हीड 19 संशयित तसेच कोरोना बाधीत व्यक्तींना विलगीकरणासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे दाखल व्यक्तींचे कोव्हीड 19 तपासणी अहवाल त्वरीत प्राप्त व्हावेत यादृष्टीने याठिकाणी ॲन्टीजेन टेस्ट सुविधा त्वरीत सुरु करण्यात येईल असे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे इंडिया बुल्स येथील कोव्हीड केअर सेंटर मधील बेड्सची 3000 पर्यंत क्षमता वाढवून याठिकाणीही काही ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देऊन एखाद्या रुग्णाची आरोग्य स्थिती अचानक बिघडल्यास त्यांना दुसरीकडे स्थलांतरीत करण्यापूर्वी त्याला आवश्यक ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून देणे सोयीचे होईल यादृष्टीनेही कार्यवाही करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
यावेळी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उपायुक्त डॉ. राहुल गेठे, उपायु्क्त श्री. योगेश कडुसकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
कोव्हीड 19 चा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबरोबरच नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयीन क्षमता वाढीकडेही विशेष लक्ष देत असून यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सिडको एक्झिबिशन सेंटर येथील कोव्हीड रुग्णालय तसेच इंडिया बुल्स पनवेल येथील कोव्हीड केअर सेंटर यांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुधारणांचे व क्षमतावाढीचे निर्देश दिले.
Published on : 17-07-2020 16:57:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update