अँटीजेन टेस्ट मधून रूग्णशोध लवकर होऊन कोरोनाची साखळी खंडीत करण्याचा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा निर्धार 11 ठिकाणी अँटीजेन टेस्ट केंद्रे सुरू – 3000 हून अधिक व्यक्तींचे अँटीजेन टेस्टींग
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड १९ नियंत्रणासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून ‘मिशन ब्रेक द चेन’ राबविण्यास सुरुवात झाली असून तपासणी, विलगीकरण आणि उपचार ही त्रिसूत्री नजरेसमोर ठेवून तत्पर कार्यवाही करण्यात येत आहे. या अनुषंगाने १६ जुलैपासून रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या तपासणी केंद्रांमध्ये व तपासण्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे.
काल २३ जुलै रोजी एका दिवसात १७४२ व्यक्तींची कोविड १९ तपासणी करण्यात आली आहे. एका दिवसातील मुंबई महानगरक्षेत्रातील या आजवरच्या सर्वाधिक तपासण्या आहेत. १६ जुलैपासून केवळ आठवडाभरात ३००० पेक्षा जास्त व्यक्तींची अँटीजेन टेस्ट करण्यात आलेली आहे.
सुरुवातीला महानगरपालिकेच्या ४ रुग्णालयात स्वॅब टेस्टिंग सुविधा उपलब्ध होती. त्यामुळे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पदभार स्विकारल्यानंतर टेस्टींग केंद्रांची संख्या वाढविण्याकडे विशेष लक्ष दिले आणि तत्परतेने अर्ध्या तासात अहवाल प्राप्त होणा-या अँटीजेन टेस्ट सुरु करण्यावर भर दिला.
आजमितीस नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वाशी, नेरुळ, ऐरोली व बेलापूर येथील रुग्णालयांसोबतच तुर्भे रुग्णालय आणि इलठणपाडा दिघा, सेक्टर ५ कोपरखैरणे बहुउददेशीय केंद्र, नोसिल नाका नागरी आरोग्य केंद्र, घणसोली नागरी आरोग्य केंद्र, वाशीगांव नागरी आरोग्य केंद्र तसेच डॉ. डी. वाय.पाटील रुग्णालय, सेक्टर ५ नेरुळ अशा ११ ठिकाणी अँटीजेन टेस्ट केल्या जात आहेत. या केंद्रांमध्ये दिवसागणिक वाढ करण्याचे नियोजन आयुक्तांच्या निर्देशानुसार करण्यात आले असून सर्वच्या सर्व २३ नागरी आरोग्य केंद्रात अँटीजेन टेस्ट सुविधा लवकरच उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजनांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठया प्रमाणावर अहोरात्र कार्यरत असतात. अशा वेळी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हि तितकेच गरजेचे असल्याचे लक्षात घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर यांनी नवी मुंबई पोलिस मुख्यालयात विशेष तपासणी शिबीर आयोजित करुन दोन दिवसात १२०० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची तपासणी पोलीस आयुक्तालयाच्या सहकार्याने करुन घेतली आहे. त्याचप्रमाणे महापालिका अधिकारी – कर्मचारी यांचीही रॅपिड अँटीजेन टेस्ट करुन घेण्यात येत आहे.
रॅपिड अँटीजेन टेस्ट ही आरटी - पीसीआर टेस्टच्या तुलनेत प्रक्रियेच्या दृष्टीने सुविधाजनक व सोप्या पध्दतीची टेस्ट असून याव्दारे साधारणत: ३० मिनिटात तपासणी अहवाल प्राप्त होत असल्याने रुग्ण शोधासाठी व पॉझिटीव्ह रुग्णाचे त्वरीत विलगीकरण करुन पुढे प्रसारित होणारी संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. याशिवाय अँटीजेन टेस्टव्दारे त्वरीत अहवाल प्राप्त होत असल्याने तपासणी केंद्रावर होणारी गर्दी टाळली जाते, नागरिकांचा वेळ वाचतो व लवकरात लवकर टेस्ट झाल्याने जास्तीत जास्त व्यक्तींच्या तपासण्या करणे शक्य होते.
महापालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर यांनी महानगरपालिकेच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करुन घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीची अँटीजेन टेस्ट करण्यात यावी यांनी निर्देशित केले असून त्यासोबतच प्रतिबंधित क्षेत्रात मोठया प्रमाणावर घरोघरी जाऊन स्क्रिनींग करण्यात येत आहे. त्याठिकाणी कोरोनाशी संबंधित लक्षणे आढळणा-या व्यक्तींची अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे.
कोविड १९ ची साखळी खंडीत करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका नियोजनबध्द उपाययोजना राबवित असून नवी मुंबईकर नागरिक यामध्ये सकारात्मक प्रतिसाद देत संपूर्ण सहकार्य करतील असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर यांनी व्यक्त केला आहे.
Published on : 24-07-2020 16:43:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update