कोरोना लढ्यासाठी विविध संस्था, उद्योग यांच्याकडून मदतीचा ओघ
कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात असताना या कोरोना लढ्यात अनेक सेवाभावी संस्था, नागरिक स्वयंस्फुर्तीने आपले योगदान देत आहेत. यामध्ये एलजी इलेक्ट्रॉनिक्स इं.प्रा.लिमी. या मान्यताप्राप्त कंपनीच्या वतीने सुरूवातीपासूनच भरीव अशी वस्तुरूपातील मदत करण्यात आली आहे. नुकतेच कंपनीमार्फत 250 फेस शील्ड्स महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचेकडे, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या काळातही कोव्हीड 19 उपाययोजनांकरिता एलजी मार्फत 32 इंची 10 एलईडी टिव्ही, 5 रेफ्रिजेटेर, 5 वॉशींग मशीन्स, 4 एअर कंडिशनर, 100 पीपीई किट्स देण्यात आले आहेत. यामध्ये नवी मुंबई व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. प्रमोद जोशी यांनी समन्वयकाची महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.
अशाचप्रकारे विविध उपक्रमांतून मानवता आणि शांती प्रसारित करण्याचे सामाजिक कार्य राष्ट्रीय स्तरावर करणा-या युथ पीस फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेस धुवून पुन्हा वापरता येण्याजोगे 1000 मास्क देण्यात आले आहेत. युथ पीस फाऊंडेशनच्या पदाधिका-यांनी हे मास्क नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांच्याकडे सुपुर्द करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड 19 विरोधातील लढ्यात आपला सहभाग नोंदविला.
कोव्हीड 19 च्या लढ्यात ज्या स्वयंसेवी संस्था, समुह, व्यक्ती सामाजिक बांधिलकी जपत विविध प्रकारची मदत करीत आहेत त्यांचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचेमार्फत आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
Published on : 30-07-2020 12:17:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update