सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असल्यास अँटीजेन टेस्ट करून घेण्याबाबत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे नागरिकांना आवाहन
'मिशन ब्रेक द चेन' च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोरोना बाधितांचा शोध, तपासणी व योग्य उपचार ही त्रिसूत्री प्रभावीपणे राबविण्यासाठी ज्या घटकांमार्फत याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते अशा विभाग कार्यालय स्तरावर आढावा बैठका घेऊन या कामकाजाला महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी गती देण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने आयुक्तांनी बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रातील कोव्हीड 19 स्थितीचा व तेथे करण्यात येणा-या उपाययोजनांचा बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच सीबीडी बेलापूर, एन.आर.आय. व बेलापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच करावे, सेक्टर 48, सी.बी.डी. बेलापूर नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचेकडून सविस्तर आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कन्टेनमेंट झोनची योग्य आखणी व त्यामध्ये प्रभावीपणे करावयाचा प्रतिबंध याविषयी स्पष्ट निर्देश दिले. विशेषत्वाने ज्या भागात 5 पेक्षा अधिक रूग्ण सापडतात अशा क्षेत्रात तिस-या प्रकारचा कन्टेनमेंट झोन करताना तेथील परिस्थितीचा विचार करावा व ते क्षेत्र ये-जा करण्यासाठी पूर्णपणे प्रतिबंधित करता येईल अशाप्रकारे बॅरेकेटींग लावून कन्टेनमेंट झोन बनवावा असे सूचित केले. तिस-या प्रकारचे कन्टेनमेंट झोन जाहीर करताना पोलीस विभागासह स्थानिक स्थितीचा विचार करून तेथील परिस्थितीचे नियोजन करता येईल अशाप्रकारे झोन तयार करावा व त्याठिकाणी प्रवेशाच्या मर्यादित जागा व 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवून वैद्यकीय आवश्यक स्थिती तसेच अत्यावश्यक कामासाठी जाणा-या व्यक्ती याशिवाय पूर्णत: प्रवेश प्रतिबंधीत करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
आपल्या विभागात कोरोना बाधितांचे मृत्यू का होत आहेत? याचा शोध वैद्यकीय अधिकारी यांनी घ्यायला हवा असे स्पष्ट करत आयुक्तांनी ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, ब्लडप्रेशर, ह्रदय विकार, किडनीचे आजार अशाप्रकारचे आजार असणा-या व्यक्तींकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे असे सांगितले. स्क्रिनींग करताना ज्या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे अशा भागावर विशेष लक्ष द्यावे असे सांगत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील खाजगी व्यावसायिकांकडून तापाचे रुग्ण तसेच मधुमेह, ब्लडप्रेशर व इतर आजार असणा-या व्यक्तींची माहिती संकलीत करावी व त्यांची अँटीजेन टेस्ट करावी अशा सूचना दिल्या.
सर्वसाधारणपणे नागरिकांमध्ये ताप, खोकला असला तरी लक्षणे लपवून ठेवण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे लक्षणे असणा-या नागरिकांनी मोफत उपलब्ध असलेली अँटिजेन टेस्ट करून घ्यावी याविषयी अधिक जनजागृती करण्याबाबत आयुक्तांनी सूचना केल्या. तसेच याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांची मदत घेण्यास सांगितले.
अँटिजेन टेस्टमुळे रुग्ण संख्येत काहीशी वाढ होताना दिसत असली तरी चिंतीत न होता रुग्ण लवकर सापडणे हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर आहे हे लक्षात घेऊन रुग्ण शोध मोहिम प्रभावीपणे राबविण्यावर व त्यातून कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर अधिकाधिक भर द्यावा असेही आयुक्तांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद देत सर्दी, ताप, कोरडा खोकला, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असल्यास त्वरीत जवळच्या महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधून आपली विनामुल्य अँटीजेन टेस्ट करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 01-08-2020 07:45:58,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update